
गेल्या वर्षी खगोल अभ्यासकांच्या उत्साही करणाऱ्य़ा अनेक घटना अवकाशात घडल्या. 21 जून 2020 रोजी उत्तर हिंदुस्थानातून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले. अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत देशातून दिसलेले ते दुसरे कंकणाकृती सूर्यग्रहण होते. उटी येथून दिसलेल्या अशा ग्रहणाचा आनंद आणि अभ्यासाचा अनुभव खगोल अभ्यासकांना आला होता. त्यामुळे जूनमध्ये आपल्याकडे पाऊस असला तरी उत्तर हिंदुस्थानातून कंकण सूर्याचे दर्शन घेण्याची तयारी अनेक खगोल संस्थांनी आणि व्यक्तींनी केली होती, पण पावसाआधीच कोरोनाने सगळय़ावर पाणी ओतले.
अनेक खगोलीय घटना समूहाने पाहायच्या आणि दाखवायलाही राहून गेल्या. त्याला नाइलाज होता. 2020 संपता संपता 21 डिसेंबरला सर्वात लहान ‘दिवस’ असलेल्या सायंकाळी गुरू आणि शनी ग्रहांच्या युतीने मात्र मनोहारी दर्शन दिले. आकाश स्वच्छ असल्याने डिसेंबरमध्ये रोजच दिसत होते. 21 डिसेंबरला त्यांच्यातले अंतर इतके कमी झाले की, नुसत्या डोळय़ांनी फक्त तेजस्वी गुरूच दिसू शकत होता.
किनेत्री (बायनॉक्युलर्स) किंवा दुर्बिणीतून (हेलिस्कोप) याचा वापर करून ज्यांना 21 डिसेंबरच्या आधी आणि नंतरच्या दोन-तीन दिवसांत गुरू-शनि युती पाहायची संधी लाभली त्यांना गॅलिलिओइतकाच आनंद झाला असेल. कारण अशा दुर्मिळ युतीचे दर्शन 1623 मध्ये झाले होते. त्यानंतर आलेली ही पर्वणी आम्हीही ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळून अनुभवली. चार-पाच इंच व्यासाच्या परावर्ती दुर्बिणीतून दोन्ही ग्रह अप्रतिम दिसले आणि शनीची कडी व गुरूचे चंद्र पाहता आले. त्याचवेळी आकाशमाध्यमावर लाल मंगल तळपत होता त्याचेही चकतीसारखे ठळक दर्शन दुर्बिणीतून घडले.
1980 पासून 2020 पर्यंतच्या 40 वर्षांत आपल्या देशातून खगोल अभ्यासकांना प्रोत्साहन देणाऱ्य़ा आणि जनसामान्यांमध्ये विज्ञानाचे कुतूहल वाढवणाऱ्य़ा अनेक घटना घडल्या. खग्रास तसे खंडग्रास आणि कंकणाकृती सूर्यग्रहण, अनेक धूमकेतू, ग्रहांच्या युती तसेच कितीतरी धूमकेतू पाहता आले.
गेल्या वर्षी ठळकपणे दिसलेला धूमकेतू म्हणजे लिओवाहन. त्याशिवाय सुपरमून ब्लू मून आणि चंद्रग्रहणे होतीच. या वर्षीचे अवकाश आपल्यासाठी विशेष महत्त्वाची सूर्यग्रहण आणणारे नाही. 26 मे रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे ते पाहता येईल, पण 10 जूनचे कंकणाकृती सूर्यग्रहण उत्तर अमेरिकेत दिसेल. आता या वर्षी अवकाश संशोधनातले कोणते प्रकल्प मार्गी लागतात ते मात्र पाहायचे. कारण ते आपल्या संशोधकांच्या सल्ल्यानुसार कार्यान्वित होणारे आहेत. त्यात निसर्गाचा प्रत्यक्ष सहभाग नसेल. यातला एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे गेल्या वर्षीपासून उड्डाण लांबलेली जेम्स वेब ही अवकाश-दुर्बिण अवकाशात झेप घेते का ते पाहायचे.
आजवर ‘हबल’ अवकाश दुर्बिणीने आपली बरीच सेवा केली आहे. पाव शतकाहून अधिक काळ ही दुर्बिण अवकाशस्थ वस्तूंची, अभ्यासाला उपयुक्त अशी माहिती आणि छायाचित्रे पाठवत आहे. अमेरिकेची ‘अपोलो’ मोहीम सुरू झाली त्या काळात म्हणजे 1961 ते 68 या कालावधीत जेम्स वेब हे नासातील अंतराळतज्ञ होते. त्यांच्या नावे अवकाशात जाणारी नवी दुर्बिण ‘हबल’ दुर्बिणीला पर्याय असेल. ‘हबल’ने खूप काम केलेय. या दुर्बिणीची यशस्वी दुरुस्तीही अनेकदा झाली आहे आणि आता अवकाश तंत्रज्ञानानेही बरेच प्रगत झाले आहे. त्यामुळे नव्या शक्तिशाली अशा 21 फुटी आरशाची जेम्स वेब दुर्बिण आर्थिक प्रभावीपणे अवकाश ‘टिपण्याचे’ काम करेल असा विश्वास वाटतो.
षटकोनी आकाराचे 4 फूट चार इंचाचे 18 आरसे मिळून हा मोठा ‘मिरर’ तयार होईल. ‘हबल’च्या 10 फुटी आरशापेक्षा तो अर्थातच चांगल्या प्रतिमा पाठवेल. तो अतिशय थंड ठेवला जाईल तसा अवरक्त (इफ्रारेड) प्रतिमा पाठवू शकेल. नासासह युरोपीय स्पेस एजन्सी आणि कॅनडाच्या अवकाश यंत्रणेच्या सहयोगाने ही दुर्बिण बनवण्याचे काम 1996 मध्येच सुरू झाले आणि 2016 मध्ये पूर्णत्वाला गेले, मात्र त्याचे प्रक्षेपण वारंवार रखडले. गेल्या वर्षी ‘कोरोना’ने अडथळा आणला.
आता 2021 मध्ये हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अवकाशमार्गी लागतो का ते समजेल. आपल्या दृष्टीने अधिक महत्त्वाची घटना असेल ती आपल्या ‘गगनयान’च्या उड्डाणाची. हिंदुस्थानच्या अवकाश संशोधनातील तो एक उज्ज्वल टप्पा असणार आहे. अशा काही मानवी प्रकल्पांसह नैसर्गिकरीत्या अवकाशातून होणारे विविध राशींच्या पार्श्वभूमीवरचे उल्का वर्षाव आणि काही खगोलीय घटना अनुभवता येतील, परंतु त्यासाठी अवकाशाची ओळख करून देणारी ‘तारांगण’सारखी पुस्तके वाचली तर उत्तम. आपल्याकडे गेल्या तीन दशकांत खगोलशास्त्रावर मराठीतही भरपूर लेखन झाले आहे. या शास्त्रास्त्राचा सखोल अभ्यास जमला नाही तरी त्याचा परिचय, आपले ‘विश्वरूप’ कसे आहे ते जाणून घ्यायला मदत करेल.

























































