
मराठीखेरीज इतर भाषिक रंगभूमींनीही मला रंगभूषेचे प्रत्येक अंग शिकवले… सांगत आहेत रंगभूषाकार आनंद परमार
रंगभूषा या कला व्यापक आहे. यामध्ये अनेक प्रकार आहेत. नाटक, टीव्ही, मालिका, सिनेमा या सर्व माध्यमांसाठी वेगवेगळ्या प्रकारे रंगभूषा केली जाते. शिवाय विवाह, समारंभ यासाठी एक वेगळ्या प्रकारची रंगभूषा असते. नाटकासाठी केल्या जाणाऱया रंगभूषेत फक्त चेहरा सजवणे हा हेतू नसतो, तर प्रत्येक व्यक्तिरेखेप्रमाणे कलाकाराची रंगभूषा बदलते. भूमिकेप्रमाणे रंगभूषाकाराला कलाकाराची रंगभूषा साकारावी लागते. काही वेळा तरुण कलाकाराला वृद्ध बनवावे लागते, तर ज्येष्ठांना तरुणही करावे लागते, हे या रंगभूषेचं वैशिष्टय़ आहे.
पूर्वी मी गणपतीच्या मूर्तींचे रंगकाम करण्यासाठी जात असे. इथूनच मला रंगभूषेची प्रेरणा मिळाली. ती अशी की, मी जर एका मातीच्या मूर्तीला सुंदर बनवू शकतो, तर एखाद्या व्यक्तीलाही नवे रूप देऊ शकतो. त्यामुळे रंगभूषेचे काम मी आजपर्यंत करत आलो आहे. यामध्ये मला खूप आनंद मिळतो. आतापर्यंत गुजराती, हिंदी, इंग्रजी आणि बंगाली नाटक, मालिका आणि सिनेमा यासाठी रंगभूषा केली आहे. सध्या ‘तारक मेहता का उलटा चष्मा’या मालिकेतील कलाकारांची रंगभूषा करत आहे.
‘अभिनय सम्राट’ हे गुजराती नाटक रंगभूमीवर गाजले. या नाटकाचेच मराठी नाव ‘तो मी नव्हेच’. या नाटकात एका अभिनेत्याने नऊ वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारल्या होत्या. या नऊ व्यक्तिरेखा रंगभूषेद्वारे नाटक सुरू असताना साकारणं हे माझ्यासाठी एक आव्हान होतं. तरीही या कामात मला आनंद मिळायचा.
रंगभूषा करण्यासाठी क्रायलीन, लॅक्मे, मेबलीन या कंपनीचे रंगभूषेचं सामान वापरल्याने त्वचेची कोणत्याही प्रकारची हानी होत नाही, हे अनुभवामुळे लक्षात आले आहे. प्रत्येकाच्या त्वचेचा पोत वेगवेगळा असल्यामुळे सगळ्याच व्यक्तींसाठी एकाच कंपनीचे साहित्य आम्ही वापरत नाही. रंगभूषा ही कला म्हणजे माझ्या पोटापाण्याचा व्यवसाय असला तरीही या कलेमुळे मला नाव, आदर, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. हीच कला मी कायस्वरूपी जपण्याचा, त्यामध्ये सतत काहीतरी नावीन्य आणण्याचा माझा प्रयत्न असेल. आज मोठमोठय़ा व्यावसायिक प्रशिक्षण संस्था रंगभूषेचं प्रशिक्षण देत आहेत. ही कला आत्मसात करणाऱया नव्या मुलांना मी सांगू इच्छितो की, या कलेचा मनापासून स्वीकार करा. नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करा. त्याचा रंगभूषेत वापर करून पुढे जात राहा.


























































