लेखिका… अभिनेत्री… दिग्दर्शिका!

173

>> नमिता वारणकर

वर्षा दांदळे… महानगरपालिकेच्या शाळेतील शिक्षिका ते अभिनेत्री आणि आता लेखिका व दिग्दर्शिका हा प्रवास खरंच मेहनतीचा… जिद्दीचा.

लेखन करणं हा लेखकाने स्वतःशी केलेला संघर्ष असते. अनेक तर्कवितर्क, शक्कल लढवत नाटकाचे संवाद लिहिताना मी स्वतःशीच रमायचे. दिग्दर्शन करताना प्रत्येक कलाकाराच्या गुण-दोषाशी जुळवून घ्यावं लागलं. या नाटकातील प्रत्येक कलाकार नवीन होता. त्यामुळे त्यांच्याकडून पाठांतर करून घेणं… सगळी तालीम झाल्यावर नाटक उभं राहतं तेव्हा प्रकाशयोजना, संगीत, संवादाच्या वेळेच गणित जुळलंय का हे पाहणं ही सगळी दिग्दर्शकाचं काम… हा सगळा दिग्दर्शकीय अनुभव खूपच कठीण वाटला.

मराठी-हिंदी मालिका, नाटक, सिनेमा या क्षेत्रांत आपल्या कसदार अभिनयाची चुणूक दाखवत घराघरांत पोहोचलेल्या वच्छी आत्या… अर्थात अभिनेत्री वर्षा दांदळे लेखन-दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण करत आहेत. ‘टार्गेट’, ‘मीनाक्षी गोडबोले’ या नाटकांच्या लेखनानंतर प्रायोगिक रंगभूमीवरील त्यांनी नुकतेच लेखन आणि दिग्दर्शित केलेले ‘सवेरेवाली गाडी’ हे एक वेगळय़ाच विषयावरील नाटक. या नाटकात त्या मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत. हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवरही सादर होण्याच्या प्रतीक्षेत आहे.

महानगरपालिका नाटय़ स्पर्धेसाठी या वर्षी ‘सवेरेवाली गाडी’ हे नाटक वर्षा दांदळे यांनी लिहिले. प्रत्येक कलाकाराला संघर्ष करावाच लागतो. तरीही जगण्याच्या वाटेवर आपल्या वाटय़ाला आलेले काम मनापासून, जीव ओतून करणे, कामाचं सोनं करण्यासाठी त्यावर प्रेम करणे, त्यासाठी आवश्यक असणाऱया इतर विषयांचाही अभ्यास करणे हे प्रत्येक कलाकाराला कळायला हवे. कारण कलेचा संबंध थेट मनाशी येतो. अशा प्रकारे कलाकाराच्या कानात कलेचा मंत्र फुंकणारी ‘सवेरेवाली गाडी’ ही कलाकृती आहे.

आपल्या या नाटय़ कलाकृतीविषयी वर्षा दांदळे सांगतात, ‘माझ्या नाटकातली मध्यवर्ती भूमिका करणारी ‘सुलू’ सांसारिक जीवनात स्थिरस्थावर झाल्यावर पुन्हा अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवते. चित्रीकरण शिकण्याच्या निमित्ताने तिला आलेले कडू-गोड अनुभव, या क्षेत्रातले अचंबित करणारे धक्के, काम मिळवण्यासाठी गोड बोलून केलेली फोनाफोनी असा कामाचा संघर्ष करताना एक दिवस उशीर झाल्याने तिची शेवटची गाडी सुटते आणि त्या रात्री तिला रेल्वे स्थानकावर एक वेश्या भेटते. ती वेश्या तिला आपल्या कामाचे सगळे बारकावे सांगते. तेव्हा सुलू तिने सांगितलेल्या तिच्या कामातल्या बारकाव्यांचा स्वतःच्या कलेच्या दृष्टीने अभ्यास करते. वेश्येचं बोलणं सुलू शिकवण म्हणून घेते आणि या गप्पा सुरू असतानाच गाडी येते. यातूनच ‘सवेरेवाली गाडी’ साकार होतं.

वर्षा दांदळे पुढे म्हणतात, ‘सुलोचना’ म्हणजेच ‘सुलू’ ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा मी करतेय. सतत स्वतःची ओळख करून घेणे, प्रत्येकाशी आपलेपणाने बोलणे, मनापासून संवाद साधणे यातून ती शिकत असते. पहिल्यांदा सेटवर आल्यावर होणारं भांबावलेपणे, धांदरटपणा, थोडंसं भूमिकेतलं गांभीर्य आणि हलकंफुलकं वातावरण या नाटकात उभं केलंय असं त्या स्पष्ट करतात.

मालिका, नाटक, सिनेमा या माध्यमांपैकी एक अभिनेत्री म्हणून त्यांना नाटकात रमायला जास्त आवडतं. कारण मालिकेची तयारी करायला खूपच कमी वेळ मिळतो. म्हणून या नाटकात दिग्दर्शक, सहदिग्दर्शक, हेअर ड्रेसर्स, अभिनेत्री… प्रत्येकाची वेगवेगळी दुःखं… एकूण बारा पात्रांच्या या नाटकातून मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.

नाटकाच्या वेगळेपणाविषयी त्या म्हणतात, नेहमी घर, मुलं, संसार, राजकारण असे विषय रंगभूमीवर येतच असतात. यापेक्षाही प्रत्येक व्यक्तीच्या मनाला स्पर्श करणारा हा एक वेगळाच विषय आहे. या नाटकात प्रेक्षकांना मालिकेचं वातावरणही अनुभवता येईल. शिवाय प्रेक्षक नाटक पाहताना स्वतःला पात्रांच्या जागी अनुभवतील. विशेष म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात ही ‘सवेरेवाली गाडी’यावी, असं वाटतं कारण वय वाढलं तरीही जगण्याचं गमक कळतंच असं नाही. प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींवर प्रेम करावं, हे रसिकांना कळलं तर हे नाटक खऱया अर्थाने यशस्वी होईल.

दिग्दर्शनात पहिलं पाऊल
गेली २ वर्षे स्पर्धेसाठी नाटक लिहितेय. लेखन करताना त्या कलाकाराचं विचार करणं, उठणं, बसणं, बोलणं… प्रत्येक गोष्ट शब्दांत उतरवताना स्वतःशी रमायला होतं. ही लेखनातली गंमत आहे. लेखन प्रक्रियेत आपण एकटेच असल्याने ही मजा अनुभवता येते, तर दिग्दर्शन करताना कलाकारांच्या स्वभावाशी जुळवून घ्यावं लागतं. त्यांच्या वेळा, अडचणी समजून घ्याव्या लागतात. त्यांना मानसिक आधार द्यावा लागतो. याबरोबर संगीत, नेपथ्य आणि इतर अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे दिग्दर्शकाकडे खूप ताकद असायला हवी, असे त्या आपल्या दिग्दर्शनाच्या अनुभवाविषयी सांगतात.

उत्कृष्ट लेखिकेचा पुरस्कार
मुंबई महानगरपालिकेतर्फे या वर्षी ३५ प्रायोगिक नाटके सादर झाली. त्यापैकी ‘सवेरेवाली गाडी’ हे नाटक प्रथम क्रमांकाने यशस्वी झाले. तसेच अभिनेत्री वर्षा दांदळे यांना उत्कृष्ट लेखिका, दिग्दर्शक आणि अभिनेत्री ही तीन पारितोषिके मिळाली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या