ठसा: ऍड. अस्लम मिर्झा

128

>> प्रशांत गौतम

गरुड जाहिरात संस्थेचे संस्थापक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘गोविंद सन्मान’ पुरस्कार दखनी भाषेचे अभ्यासक तथा उर्दू लेखक ऍड. अस्लम मिर्झा यांना घोषित झाला आहे. संभाजीनगरातील कलश मंगल कार्यालयात 28 मार्च रोजी मिर्झा यांना पुरस्काराचे वितरण झाले. अनुवाद, समीक्षा, शोधनिबंध आणि शायरी या क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे मिर्झा यांचे उर्दू साहित्यात लक्षणीय योगदान आहे. अस्लम मिर्झा यांची ‘आईना- ए- मानिनुमा’, ‘इत्र- ए- गुल-ए- मेहताब’, ‘गुलदस्ता- ए- खुशबास’ ही संशोधनात्मक लेखनाची पुस्तके प्रसिद्ध असून ‘गीले पत्तों की मुस्कान’ हा कवितासंग्रह तसेच ‘हम जंजीरे मे रहते है’, ‘लुकनात’, ‘पश्तों के अवावी नगमे’ आदी उर्दू भाषांतरित कवितांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘सिराज औरंगाबादी’ (जीवन, व्यक्तित्व आणि संकलित गजल) हे मिर्झा यांचे नवीन पुस्तक प्रकाशित झाले आहे. मिर्झा यांचे बालपण नगरमध्ये गेले. वकिली व्यवसायाच्या निमित्ताने पुढील वीस वर्षे मुंबईत गेली. 1977-78 पासून मिर्झा हे संभाजीनगर शहरात वास्तव्यास आहेत. मिर्झासाहेबांचे वडील कॅप्टन मोहंमद इस्माईल आणि आजोबांना उर्दू व फारसी शायरीत रस होता, वडिलांचे दोन चुलतभाऊ मिर्झा युसूफ हे ‘उम्मीद’ नावाने तर मिर्झा अख्तर हुसेन हे ‘अख्तर’ नावाने शायरी करीत असत. अस्लम यांची आई नूरजहाँ बेगम आणि भाऊ म्हणजे इस्माईल कैसर यांनी नगर येथे कविता- गझल क्षेत्र एकेकाळी गाजवले होते. म्हणजे असे की, अस्लम यांच्या आई- वडिलांच्या घरी शेरो शायरीचे भारावलेले वातावरण होते. पेशाने वकील असलेल्या मिर्झा साहेबांचा उत्साह 74 व्या वर्षीही पूर्वीसारखाच ताजा टवटवीत आहे. त्यांचे विचार आणि लेखणी मजबूत असून उर्दू भाषेवर कमालीचे प्रभुत्व आहे. अनुवादाच्या संदर्भात मिर्झा म्हणतात, कोणत्याही अनुवादासाठी पार्श्वभूमी ही आवश्यक असते. शब्दांची निवड रंग आणि छटा पाहून करावी लागते. मोत्याप्रमाणेच वेचून-वेचून एक एक शब्द गुंफावा लागतो. परकाया प्रवेश यानुसार कवितांचे अनुवाद तर त्या त्या कवीची प्रकृती पाहूनच करावे लागतात. अनुवाद करणे म्हणजे नवीन आयुष्य जगण्यासारखे असते. मूळ आशयाला धक्का न लावता अनुवाद करणे आणि तो वाचकांना आवडला पाहिजे. खरेतर अशा प्रकारचे कार्य करणे कितीही अवघड असले तरी मनाला आनंद आणि समाधान देणारे असते. आजपर्यंत अस्लम मिर्झा यांनी मराठीतील पाचशे कवींच्या कविता उर्दूत अनुवादित केल्या आहेत. ज्ञानेश्वरीतील ओव्या, समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक (मनसमझावन), संत नरहरी सोनार यांचे अभंग उर्दूत अनुवादित केले आहेत. ज्ञानेश्वरांच्या ओव्यातील काही शब्द पर्शियन असून त्याचा दाखला म्हणून मिर्झा ‘अंगुष्ठरी’ या शब्दाचा उल्लेख करतात. अनुवादक हा दोन भाषांमध्ये सेतू बांधणारा असतो. आणि या कार्यामुळे भाषाही समृद्ध होते. त्या-त्या भाषेतील शब्दांची देवाण- घेवाण होते. उर्दूत मी अन्य साहित्य प्रकारात लिहीत असलो तरी माझ्यासाठी अनुवादाचे क्षेत्र हे अधिक आवडीचे असल्याचे मिर्झा सांगतात. दखनी भाषेचे अभ्यासक असलेले मिर्झा म्हणतात, दखनी भाषा तर दौलताबाद परिसरात घडली आहे. मराठवाडय़ात जन्मलेल्या दखनीचे वेगळे स्थान आहे. मराठी भाषेत दखनीचे शब्द आणि दखनी भाषेत मराठीचे शब्द आहेत. त्यामुळे मराठी-दखनी या जुळय़ा भाषा भगिनी आहेत. या क्षेत्रातील लेखन, अनुवाद कार्यासाठी मिर्झा यांना उर्दू साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त झाला. सेतू माधवराव पगडी पुरस्कारानेही सन्मान झाला. या पुरस्कारांच्या प्रवासात गोविंदराव देशपांडे स्मृतिपुरस्कार गोविंद सन्मानाची भर पडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या