
>> अभिषेक भटपल्लीवार
विधायक कामाचा वसा घेतलेल्या दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातील ऍड. दीपक यादवराव चटप हा तरुण वकील ब्रिटिश सरकारचा ‘चेव्हनिंग ग्लोबल लीडर’ ठरला आहे. ब्रिटिश सरकारतर्फे देण्यात येणाऱया ‘चेव्हनिंग’ या जागतिक प्रतिष्ठेच्या 45 लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचा मानकरी होण्याचा मान दीपकला मिळाला आहे. अवघ्या 24 व्या वर्षी ही शिष्यवृत्ती मिळवणारा देशातील तो पहिला तरुण वकील ठरला आहे.
सामाजिक नेतृत्व करू इच्छिणाऱया जगभरातील युवकांना ब्रिटिश सरकार ही शिष्यवृत्ती देते. लंडनच्या ‘एसओएएस’ या जगातील सर्वोत्तम विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी दीपकची निवड झाली. त्याच्या कामाची दखल घेत शिक्षणाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी ब्रिटिश सरकारने घेतली आहे. मूळचा आदिवासीबहुल दुर्गम अशा लखमापूर (ता. कोरपना, जि. चंद्रपूर) येथील रहिवासी असलेला दीपक ‘पाथ’ या सामाजिक संस्थेचा संस्थापक आहे. या माध्यमातून राज्यातील दुर्बल घटकांच्या मूलभूत प्रश्नांना कायद्याने वाचा फोडण्याचे विधायक काम करत आहे. शेतकरी नेते ऍड. वामनराव चटप, पद्मश्री डॉ. अभय बंग, विधिज्ञ असीम सरोदे व तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्या समवेत सामाजिक व विधीविषयक केलेले दीपकचे काम दखलपात्र ठरले. दीपक हा यादवराव व हेमलता चटप या शेतकरी दांपत्याचा मुलगा आहे. कुटुंबातील विदेशात उच्च शिक्षण घेणारा पहिला तरुण! प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत व माध्यमिक शिक्षण गडचांदूर येथे पूर्ण केले. पुढे विद्येचे माहेरघर पुणे येथील नामांकित आयएलएस विधी महाविद्यालयातून कायद्याची पदविका प्रथम श्रेणीत मिळवली. शिक्षण घेताना मुंबई येथील अरबी समुद्रातील प्रदूषणाची याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात दाखल केली. शेतकरी आत्महत्येविषयक मानवाधिकार आयोगात तक्रारी दिल्या. विधिमंडळ अधिवेशन काळात लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून दुर्गम भागातील प्रश्न सभागृहात मांडले. शेती व विधीविषयक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदविला. शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न इतरांप्रमाणे दीपक यानेही बाळगले होते. मात्र, परदेशात शिक्षणासाठी लागणारा खर्च आवाक्याबाहेर होता. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला शिक्षण घेणारा मित्र प्रवीण निकम, लंडन विद्यापीठातील सोहेल भट्ट, भाऊ डॉ. जयदीप चटप यांनी दीपकला प्रेरणा दिली. राजू केंद्रे, अविनाश पोईनकर, बोधी रामटेके, वैष्णव इंगोले आदी मित्रांनी साथ दिली. त्यामुळे जिद्द आणि चिकाटी त्याला काही स्वस्थ बसू देत नव्हती. दीपकने परदेशात शिक्षणासाठी जाण्याचे पाहिलेले स्वप्न ब्रिटिश सरकारच्या या मानाच्या शिष्यवृत्तीने आता पूर्ण होणार आहे. पुढील कार्यामुळे ऍड. दीपक यांची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली.
- ‘लढण्याची वेळ आलीय’ हा काव्यसंग्रह वयाच्या 18 व्या वर्षी तर ‘कृषी कायदे – चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज’ हे दीपकने लिहिलेले पुस्तक चर्चेत राहिले.
- गडचिरोली व चंद्रपूर जिह्यातील आदिम कोलाम व माडिया समाजाच्या मूलभूत प्रश्नांवर मानवाधिकार आयोग व उच्च न्यायालयात याचिका दाखल संविधानिक नैतिकता हा ऑनलाइन कोर्स तयार करून राज्यातील 1200 विद्यार्थ्यांना संविधानविषयक प्रशिक्षण दिले.
- कोरोना काळात सामाजिक संस्थांना सोबत घेऊन जवळपास 1300 कोलाम कुटुंबांना रेशन किट्स वितरण, तर चंद्रपूर जिह्यातील दुर्गम भागातील कुपोषित बालकांना पोषण आहार किट्स देऊन नवसंजीवनी दिली.
- कृषी न्यायाधिकरण कायद्याचे अशासकीय विधेयक तत्कालीन खासदार राजीव सातव यांनी 2018 ला लोकसभेत मांडले. या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात दीपकची महत्त्वाची भूमिका.
- कोरो इंडिया फेलोशिपच्या माध्यमातून तळागाळात मूलभूत संविधानिक हक्कांवर काम.
- समाजातील दुर्बल घटकांच्या प्रश्नांवर मोफत वकिली, शेतकरी आंदोलनांत सक्रिय सहभाग.
शेतकरी चळवळीने अन्यायाविरुद्ध बंड करायला शिकविले. लखमापूर ते लंडन हा आपला शैक्षणिक प्रवास ग्रामीण भागातील शेतकरी व दुर्बल घटकांतील पुत्रांना ऊर्जा देणारा ठरेल. जिल्हा परिषदेच्या शाळेपासून सुरू झालेले आपले शिक्षण लंडनच्या विद्यापीठापर्यंत मजल गाठता येणे हे आई-वडील, भाऊ, काका व मित्रांनी दिलेली खंबीर साथ यामुळेच पूर्णत्वाकडे वाटचाल करणारे आहे. येणाऱया काळात शेतकरी व समाजातील दुर्बल घटकांतील तरुणांना उच्च शिक्षण घेत आपल्या समाजासाठी झटावे लागणार आहे. ब्रिटिश सरकारने दाखविलेला विश्वास मोलाचा असून उच्च शिक्षण घेतल्यानंतर हिंदुस्थानात परत येऊन शेतकरी, आदिवासी व दुर्बल घटकांसाठी रचनात्मक काम उभे करेल. हिंदुस्थानात येणारा काळ हा आमचा असेल, असा विश्वास ऍड. दीपक चटप व्यक्त करतो.






























































