मंथन – जाहिरातींमधील नीतिमत्ता

>> धनंजय देशपांडे

ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असलेल्या एका क्रिकेटपटूने केलेल्या व नंतर कंपनीतर्फे मागे घेण्यात आलेल्या जाहिरातीवरून एक नवा वाद मध्यंतरी पाहायला मिळाला. मी स्वतः याला ‘वाद’ असे न मानता ‘संवाद’ समजतो. कारण संवादातूनच ‘साधक’ दिशा मिळते. नुसत्या वादातून ‘बाधक’च बाहेर येतं, तर जाहिरात क्षेत्रातील सुमारे 25 वर्षांचा अनुभव घेऊन जे जे उमजले ते अगदी साध्यासोप्या, नर्मविनोदी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.

जाहिरातीच्या ब्रॅण्ड ऍम्बॅसेडर संदर्भातील जो विषय आहे त्याचे तीन भाग आहेत. एक म्हणजे समाजाची भूमिका, दुसरं संबंधित कंपनीची प्रतिक्रिया आणि तिसरं म्हणजे याप्रकरणी न्यायालयाने केलेली अपेक्षा! मात्र चौथा एक घटक दुर्लक्षित आहे, तो म्हणजे त्या उत्पादनाची जाहिरात तयार करणारी संबंधित एजन्सी!

पहिलं म्हणजे समाजाची भूमिका, तर त्यातसुद्धा दोन मतप्रवाह आहेत. काही जण म्हणतात की, ‘सेलिब्रेटी’ ऍम्बेसेडर लोकांनी नैतिकता पाळली पाहिजे अन् काही विपरीत घडलं असेल तर जबाबदारी स्वीकारली पाहिजे. काही जण म्हणतात की, सेलिब्रेटी लोकांचे ते प्रोफेशन आहे. त्यात त्यांची चूक? वरवर पाहता दोन्ही बाजू बरोबर वाटतात, मात्र तसे नाही.

एकदा का सेलिब्रेटी लोकांचे ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ होणे हा त्यांच्या प्रोफेशनचा भाग आहे असं समजलं तर सगळं सोपं होईल. एक किस्सा सांगतो, एक अत्यंत लोकप्रिय अभिनेता मागे कधीतरी चित्रपट निर्माता के. सी. बोकाडियांच्या सिनेमात काम करत होता. सिनेमा पूर्ण झाला, मात्र उरलेल्या मानधनापैकी काही रक्कम देणे बोकाडियांना बाकी होते. ते त्याला म्हणाले, इच्छा असूनही सध्या परिस्थिती नसल्याने ते पैसे देऊ शकत नाही. त्यावर तो अभिनेता म्हणाला, टेन्शन घेऊ नका. उरलेले पैसे नाही दिले तरी चालतील. मी काय, एखाद्या उद्योगपतीच्या घरच्या लग्नाला गेस्ट म्हणून जाऊन तासाभरात तितके पैसे मिळवेन.

याचा अर्थ… त्या अभिनेत्याने स्वतःला ब्रॅण्ड केलेलं आहे अन् त्यातून तो असे लग्नाला जाऊन, एखाद्या गाण्यावर डान्स करूनदेखील पैसे कमवू शकतो. मग त्याने असं करणं चूक की बरोबर? माझ्या मते तो त्याचा प्रोफेशनचा भाग आहे. ‘‘त्याला हे शोभतं का?’’ असं आपण विचारण्यात अर्थ नाही. असे पैसे कमावणे चूक नाही. कारण तो त्यांचा घटनेनुसारही मूलभूत हक्क आहे. वाद कुठे होतो तर अभिनेत्याने एखाद्या ब्लॅक लिस्टेड उद्योगपतीच्या लग्नाला हजेरी लावून पैसे मिळवल्यावर! आता इथं प्रश्न असा की, अनेकांना ते माहीत नसतं. सगळ्या जगभरच्या घडामोडींसंदर्भात ‘अपडेट’ राहायला ते थोडेच मीडियापर्सन आहेत? जसे एखाद्या राजकीय नेत्याच्या स्टेजवर मागच्या रांगेत कोण कोण बसलं आहे अन् त्यांचे चारित्र्य काय आहे हे 100 टक्के खात्रीने त्या नेत्याला तरी कुठे माहीत असते? मग पेपरमध्ये तो फोटो छापून आला की, ‘त्या’ व्यक्तीच्या भोवती ठळक लाल वर्तुळ दाखवून ‘याचे संबंध त्या नेत्याशी कसे?’ अशी बातमी झळकते. अगदी तसेच कोणत्या तरी कंपनीचे ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ होऊन त्याची जाहिरात करणाऱया या सेलिब्रेटीला दोषी ठरवणे तितके संयुक्तिक नाही. फार तर आपण आदर भावना बाळगूनच निषेध नक्की नोंदवू शकतो.

याच्या उलट अनेक अशी उदाहरणे मी देईन की, ज्यात प्रॉडक्ट चांगलेच आहे, पण ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ म्हणून सेलिब्रेटी जेव्हा त्याची जाहिरात करतात तेव्हा आपल्याला खरे तर हसायला यायला हवं. चित्रपटाचा शहेनशहा मानला गेलेला अभिनेता ‘‘अमुक दंतमंजन वापरा, मी पण वापरतो’’ असे म्हणतो तेव्हा काय म्हणावं? एकेकाळी दहा-बारा वर्षे पत्रकारिताही मी केलेली असल्याने या सेलिब्रेटींपैकी काहींचे जीवन जवळून पाहिले आहे. त्यामुळे ती मंडळी ज्या वस्तू ‘वापरा’ म्हणतात त्या वस्तू स्वतः ते कधीच वापरत नसतात. ड्रीम गर्ल ज्या वॉटर फिल्टरची तारीफ करत असते, तो तिच्या स्वतःच्या घरी असतो का? आता तुम्हाला आठवून हसू येत असेल की, अरेच्या, आपुन को उल्लू बनाया यार असं! नीतिमत्ता पाळायचीच असेल तर अशा ठिकाणी समाजाने आग्रहाने त्या त्या सेलिब्रेटींना वाटल्यास जाब विचारावा, पण अमुक एक तेल वापरल्याने कॉलेस्टेरॉलवर नियंत्रण होते असा दावा केलेल्या जाहिरातीत ‘क्रिकेटपटू’ असेल तर मला सांगा, त्याच्या तरी घरी ते तेल वापरले जात असेल का? मग त्यालाच का कॉलेस्टेरॉल वाढल्याने दवाखान्यात दाखल व्हावे लागले? शिवाय तो काही तेल क्षेत्रातील तज्ञ नाही की, निर्मात्याकडे त्या तेलाचे सगळे गुणधर्म समजून घेऊन ते दावे खरे आहेत का हे पडताळून पाहील.
सहज आठवलेलं सांगतो, मीही डोक्यावरील केसांविषयी संशोधन व उपचार करणाऱया एका राष्ट्रीय पातळीवरील आयुर्वेदिक कंपनीचा ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ आहे. आता त्यांची ती सगळी संशोधन उपचार प्रणाली चेक करायची म्हटलं तर किमान दोन महिने नुसते समजून घेण्यातच जातील. ते शक्य नाही. अशा वेळी ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ काय करतात, तर ज्या कंपनीची ऑफर आलीय त्याचा एकंदर आढावा घेतात. ज्याने ऑफर दिलीय त्या व्यक्तीची विश्वासार्हता थोडक्यात पाहतात अन् ‘होकार’ देतात. त्यामुळे पूर्ण दोष ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ लोकांवर ढकलता येत नाही.

आता दुसऱया मुद्दय़ावर येऊ की, अशावेळी संबंधित उत्पादक कंपनीची भूमिका काय असावी? यावर आता एक गंमत आहे. मुळात उत्पादक कंपनी शक्यतो स्वतःचा ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ स्वतः ठरवत नाही. त्यासाठी मी जे सुरुवातीला म्हणालो की, या एकूण साखळीतला एक दुर्लक्षित घटक म्हणजे तशा जाहिराती तयार करणारी जाहिरात एजन्सी! तर ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ ठरवताना संबंधित उत्पादक कंपनी आधी त्यांच्या जाहिरात एजन्सीला गाठते अन् आमचे अमुक अमुक प्रॉडक्ट आहे, त्याच्या जाहिराती करा सांगते, मग ती एजन्सी सर्व्हे करून कोणती सेलिब्रेटी योग्य होईल अशा तीन-चार जणांची लिस्ट कंपनीला देते व त्यातून एकाची ‘बजेट’नुसार निवड होते. त्यामुळे खरे तर जाहिरात एजन्सीनेदेखील ‘सावधानता’ बाळगावी असं मात्र मी नक्की म्हणेन!

चारपैकी तीन घटक पाहिल्यावर आता पाहू न्यायालयाची भूमिका! लॉजिकली त्यांचे मत नक्कीच स्वागतार्ह आहे. उलट त्यांनी भविष्यात किमान सेलिब्रेटी लोकांनी जाहिराती स्वीकारताना ‘दक्ष’ राहावे असा सकारात्मक जणू संदेश दिला आहे. तो आपण त्याच दृष्टीने पाहून त्याचे स्वागत केले पाहिजे.

याउलट समाज जीवनावर चांगला प्रभाव टाकणाऱया जाहिरातीदेखील आठवूया ना! अमूलची जाहिरात हमखास दाद मिळवून जाते. कारण त्यात देशभक्ती पुरेपूर असते. मी स्वतः माझ्या एका साडी विक्रेत्या मोठय़ा फर्मच्या जाहिरातीत मॉडेल म्हणून चक्क झाशीची राणी, बालगंधर्व तर फुटवेअरच्या जाहिरातीत हिंदुस्थानी सैनिकांना सॅल्यूट करून व त्यांच्या कार्याचे स्मरण व वंदन केलेल्या जाहिराती केल्यात, ज्या सर्वात जास्त हिट झाल्या. जाहिराती म्हटल्या की, हिरॉईनच कशाला हवी? नाही का?

‘शोले’ सुपरहिट झाला तेव्हा पार्लेच्या जाहिरातीत गब्बरसिंग ‘ब्रॅण्ड ऍम्बेसेडर’ म्हणून होता. याला काय म्हणाल? पार्ले खाल्ल्याने शक्ती येते, मग ती काय व्हिलन म्हणून वापरायची का? तर तसे नसते. इतकं जरी आपण समजून घेतलं, म्हणजे आजच्या भाषेत ‘थोडं हलकं घेतलं’ तर डोक्याचा गोइंदा होणार नाही.

शेवटी इतकंच की…. ‘विषय गंभीर, पण आपण खंबीर’ असं ठरवलं ते जास्त चांगलं ना?

आपली प्रतिक्रिया द्या