
>> प्रिया कांबळे
विद्यार्थ्यांच्या तार्किक व बौद्धिक शक्तीचा विकास व्हावा याकरिता नागपूरमधील वडधामना येथे देशातील ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित पहिल्या अंगणवाडीचा शुभारंभ झाला. नागपूर जिल्हा परिषदेच्या या अंगणवाडीतील चिमुकल्यांना आता ‘एआय’च्या माध्यमातून बडबडगीत, चित्रकला, नृत्य शिकवले जात आहेत.
सध्याच्या डिजिटल युगात लहानपणीच मुलांना तंत्रज्ञानाचे धडे मिळावेत आणि त्यांच्या कल्पानाशक्तीला चालना मिळावी याबरोबरच ग्रामीण भागातील मुलांचाही सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीने ‘मिशन बाल भरारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नुकताच त्याचा शुभारंभ नागपूरमधील वडधामना येथे झाला. देशातील पहिली एआय तंत्रज्ञान आधारित ही पहिली अंगणवाडी आहे. आता या अंगणवाडीतील चिमुकल्यांना एआय या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बडबडगीत, चित्रकला, नृत्य शिकवले जात आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या तार्किक व बौद्धिक शक्तीचा विकास व्हावा यासाठी एआय व्हीआर सेटच्या माध्यमातून आभासी घटनेची प्रत्यक्ष अनुभूती देणारे शिक्षण दिले जाते.
अंगणवाडीतील ताईंनाही याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून या सिस्टम प्रणालीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला दिलेले शिक्षण त्या विद्यार्थ्याने किती आत्मसात केले, याची नोंद ठेवली जाते. एआय तंत्रज्ञानआधारित अभ्यासक्रमामुळे चिमुकले विद्यार्थीही मोठय़ा उत्साहाने वर्गात बसत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत किती बदल आला हेदेखील तपासता येणार आहे.
हे पायलट सेंटर आर्टिफिशल इंटेलिजन्स डॅशबोर्ड, व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) हेडसेट आणि इंटरअॅक्टिव्ह कंटेंटसारखी अत्याधुनिक डिजिटल साधने वापरते. ज्यामुळे लहान मुलांसाठी भविष्यकालीन आकर्षक अनुभव तयार होत आहे. तसेच आगामी काळात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनाही एआय तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्यावर भर दिला जाईल.
भारतामधील पहिली योजना
‘मिशन बाल भरारी’ हा उपक्रम भारतामधील पहिला असा उपक्रम आहे, ज्यात लहान मुलांच्या शिक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे यासाठी अंगणवाडी ताईंना या स्मार्ट साधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. ग्रामीण आणि शहरी शिक्षणातील दरी मिटवून प्रत्येक मुलाचा उत्साह वाढावा आनंद आणि कुतूहलाने त्याला शिकता यावे हा या उपक्रमामागील संकल्प आहे. हा संकल्प महाराष्ट्रातील बालशिक्षणामध्ये ऐतिहासिक बदल घडवेल आणि मुलांनाही बालवयातच नव्या तंत्रज्ञानाची गोडी लागेल.
अंगणवाडी ठरतेय सरस
भारताची पहिली एआयसक्षम अंगणवाडी म्हणून गणना होणाऱया हिंगणा तालुक्यातील वडधामना येथे सुरू करण्यात आलेल्या मुलांना यातून कविता, गाणी आणि अभ्यासक्रम शिकविण्यासाठी व्हीआर हेडसेट्स, एआयसंलग्न स्मार्ट डॅशबोर्डस् आणि इंटरॅअक्टिव्ह डिजिटल कंटेंट यांसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ही सोय प्रीमियम खासगी बालवाडय़ांमध्येही उपलब्ध नाही, असे वैशिष्टय़ या प्रकल्पात आहे. त्यामुळे ही अंगणवाडी खासगी बालवाडीपेक्षाही सरस ठरत आहे.
नागपूर जिल्हा परिषदेच्या नेतृत्वाखाली आता ‘मिशन बाल भरारी’अंतर्गत अशा 40 एआय अंगणवाडय़ा सुरू करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.