
>> दा कृ. सोमण
नासाच्या नाणावलेल्या शास्त्रज्ञांनी विधान केले आहे, एलियन्स पृथ्वीवर आलेही असतील… खरोखर आली असतील का ही परग्रहावरची माणसंच…
एलियन्स म्हणजे परग्रहावरची माणसे! नासाचे संगणक शास्त्रज्ञ सिल्व्हानो कोलोन्बानो यांनी नुकतेच एक चकित करणारे विधान केले आहे. नासाचे संगणक शास्त्रज्ञ म्हणजे कोणी साधीसुधी व्यक्ती नाही. सिल्व्हानो कोलोम्बानो हे ‘नासा’ या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेमध्ये काम करीत आहेत. ते म्हणाले, यापूर्वीच एलियन्स म्हणजे परग्रहावरची माणसे पृथ्वीवर येऊनही गेली असतील! परग्रहावरच्या माणसासंबंधी आपली गृहितके बदलण्याची गरज आहे. परग्रहावरची माणसे कदाचित आपल्यासारखीच हाडामांसाची असतील. कदाचित त्यांची विमानेही आपल्या विमानांसारखी असतील. त्यामुळे कदाचित ती परग्रहावरची माणसे पृथ्वीवरच्या लोकांना ओळखता आली नसतील. मागील 500 वर्षांतच पृथ्वीवर वैज्ञानिक प्रगती झालेली आहे. कदाचित त्यापूर्वीही एलियन्स म्हणजे परग्रहावरची माणसे पृथ्वीवर येऊन गेली असतील.
परग्रहावरची माणसे
परग्रहावरच्या जीवसृष्टीसंबंधी आपण माहिती करून घेण्यापूर्वी आपण या विश्वामध्ये कुठे आहोत ते पाहूया. आपली पृथ्वी आपल्या सूर्यमालेत आहे. आपली सूर्यमाला आपल्या आकाशगंगेमध्ये आहे. या आपल्या आकाशगंगेमध्ये अनेक सूर्यमाला आहेत. आपली आकाशगंगा आकाशगंगांच्या एका गटामध्ये आहे. आकाशगंगांचे असे अनेक गट आहे. विश्वाचा हा पसारा पाहिला की, अमर्याद विश्वाची मर्यादा आपल्या लक्षात येते. आपल्या आकाशगंगेमधील एखाद्या सूर्यमालेतील ग्रहावर पृथ्वीवरच्या जीवसृष्टीसारखी जीवसृष्टी असू शकेल. समजा आपल्या आकाशगंगेमधील सूर्यमालेत पृथ्वीसारखा जीवसृष्टी असलेला ग्रह नसला तर दुसऱया एखाद्या आकाशगंगेतील सूर्यमालेमध्ये असेल! आपल्या सूर्याचा जन्म पाच अब्ज वर्षांपूर्वी झाला. आपली पृथ्वी 4.6 अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाली. समजा असा पृथ्वीसारखा एखादा ग्रह जर 5.6 अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झाला असेल तर एक अब्ज वर्षांनी पृथ्वीवर विज्ञान जेवढे प्रगत होईल, तेवढी प्रगती आता त्या ग्रहावर झालेली असेल असेही सांगता येईल. समजा एक हजार वर्षांपूर्वी परग्रहावरची माणसे पृथ्वीवर येऊन गेली असतील तर आपल्याला आता ते कसे कळेल?
शरीराची रचना
पृथ्वीवरच्या माणसाची शारीरिक रचना जशी आहे त्यापेक्षा वेगळी रचना परग्रहावरच्या माणसाची असलीच पाहिजे असे कसे म्हणता येईल? कदाचित परग्रहावरची माणसे आपल्यासारखे अवयव असणारीही असू शकतील! आनंद, दुःख, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर अशा भावनाही त्यांना असू शकतील! परग्रहावरची माणसे कदाचित वेगळी शरीर रचना असणारी आणि वेगळ्या भावना असलेलीही असू शकतील!
समजा परग्रहावरची माणसे जर निर्जन ठिकाणी उतरली तर ती काय समजतील? या ग्रहावर जीवसृष्टी नाही! परग्रहावरची माणसे कशी असतील? ती प्रगत असल्यामुळे चांगल्या स्वभावाचीच असतील! ती आपल्याला मदत करतील की आपल्यावर हल्ला करतील? ती कोणत्या अन्नावर जगत असतील? ती कोणत्या वायूंवर जगत असतील? ती आपल्यासारखेच कपडे घालीत असतील का? एक ना अनेक प्रश्न मनात निर्माण होतात.
यूएफओ म्हणजे अन् आयडेंटीफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट! मराठीत आपण त्याला ‘उडत्या तबकडय़ा’ म्हणतो. पूर्वी अशा उडत्या तबकडय़ा दिसल्या होत्या. परंतु प्रत्येकवेळी त्यात काहीही तथ्य नसल्याचे आढळून आले होते. परग्रहावरच्या जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी मध्यंतरी ‘सेती’ प्रकल्प हाती घेण्यात आला होता. ‘सेती’ म्हणजे ‘सर्च फॉर एक्ट्राटेरेस्ट्रिअल इन्टेलिजन्स’. आकाशगंगेतील प्रगत संस्कृतीचा अंदाज घेणारे ‘ड्रेक समीकरण’ 1960 मध्ये शास्त्रज्ञ फ्रँक ड्रेक या शास्त्रज्ञांनी तयार केले. ‘ओझ्मा’ प्रकल्पही राबविला, परंतु परग्रहावरच्या जीवसृष्टीशी संपर्क होऊ शकला नाही!
खरोखर, प्रगत एलियन्स जर पृथ्वीवर आले तर काय होईल? खूप मज्जा येईल! एक हजार वर्षांनी पृथ्वीवर लागणारे शोध आपल्याला आताच मिळू शकतील! पृथ्वीवरच्या माणसांसमोरील सर्व प्रश्न सुटण्यास मदत होईल. असे प्रगत एलियन्स जर मला भेटले तर मी एकच मागणे त्यांच्यापाशी मागेन की, तुम्ही असे काहीतरी औषध पृथ्वीवरच्या सर्व माणसांना द्या की यापुढे पृथ्वीवरची सर्व माणसे माणसासारखी वागतील!
प्रश्न सुटतील?
परग्रहावरची जीवसृष्टी प्रगत नसेल तर ती माणसे पृथ्वीपर्यंत येऊच शकणार नाहीत, पण ती जर प्रगत असतील तर ती नक्कीच पृथ्वीपर्यंत येऊ शकतील. मध्यंतरी पृथ्वीवरच्या शास्त्रज्ञांनी परग्रहावरच्या जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी रेडिओ संदेश पाठवले आहेत. आपण कुठे आहोत हे त्यांना कळावे हा त्यामागचा उद्देश होता. शास्त्रज्ञ जेम्स क्लार्क यांनी नुकत्याच प्रकाशित झालेल्या नियतकालिकात वेगळेच मत मांडले आहे. ते म्हणतात की, पृथ्वीवरून जर इन्फ्रारेड किंवा लेझर बीम अंतराळात सोडले तर जीवसृष्टी असलेली आपली पृथ्वी नेमकी कुठे आहे हे परग्रहावरच्या एलियन्सना कळू शकेल! हे कठीण वाटले तरी अशक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.





























































