ठसा – श्रीनिवास ठाणेदार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रशांत गौतम

अमेरिकेत ज्यो बायडन यांची अध्यक्षपदी झालेली निवड, डोनाल्ड ट्रम्प यांचा झालेला पराभव या बाबी जागतिक राजकारणात कमालीच्या उत्सुकतेच्या ठरल्या. पण त्यातही श्रीनिवास ठाणेदार या बेळगावच्या मराठी माणसाने अमेरिकेतील मिशिगन प्रांतात थर्ड डिस्ट्रिक्ट या मतदारसंघात 93 टक्के मते घेऊन धडाकेबाज, जिगरबाज विजय संपादन केला. अमेरिकेतल्या या मराठी माणसाने मिळविलेल्या घवघवीत यशामुळे समस्त मराठी जनांची मान नक्कीच ताठ झाली असेल यात कोणतीही शंका नाही. ठाणेदार थर्ड डिस्ट्रिक्ट मतदारसंघातून ‘स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह’ म्हणून 93 टक्के मतांची पसंती घेऊन निवडून आले आहेत. हे पद म्हणजे आपल्याकडच्या आमदार पदाशी समकक्ष असलेले पद होय. मिशिगन प्रांताच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजे तिथल्या विधानसभेत ठाणेदार हे आमदार असणार आहेत. या विजयानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. ते म्हणतात, ‘‘मी आज या देशाच्या कृपेने धनवान झालो असलो तरी दारिद्रय़ म्हणजे काय आणि संधीचा अभाव किती क्लेषदायक असतो ते मी अनुभवले आहे. अमेरिकेत कोणत्याही पक्षप्रमुखापेक्षा जनतेलाच जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे स्थानिक समस्या सोडवण्यास मी प्राधान्य दिले म्हणून मला जनतेने संधी दिली आहे.’’ ज्या मतदारसंघात ठाणेदार निवडून आले तिथे कृष्णवर्णीय, गौरवर्णीय, हिस्पॅनिक, आशियाई असे बहुसंख्य असलेली पार्श्वभूमी आहे. ठाणेदार मूळ तिथल्या मातीतले नसले तरी तेथील विविध समाजघटकांनी आपल्या 93 टक्के मतदानातून जो विश्वास दाखवला तो ठाणेदार यांनी सार्थ केला, असे म्हणावे लागेल. ठाणेदार म्हणतात, ‘‘माझा मतदारसंघ अमेरिकेतल्या गरीबांचा आहे. इथल्या मुलांच्या शाळेचा प्रश्न आहे. कचरा आणि पाणीपुरवठय़ाचाही प्रश्न आहे. रात्री-अपरात्री उसळणाऱया दंग्यांचा प्रश्न आहे. एवढेच कशाला, रस्त्यावरच्या खड्डय़ांचा प्रश्न आहे. या मतदारांच्या प्रश्नांशी एकरूप होताना मला माझ्याच पूर्वायुष्यातील कहाणी कामी आली.’’ कदाचित याचमुळे ते अमेरिकेतल्या जनतेला आपला माणूस वाटले असावेत.

श्रीनिवास ठाणेदार यांचा जन्म बेळगावातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात 1955 साली झाला. 18व्या वर्षी बी.एस्सी. उत्तम गुणांनी संपादन केली. पुढे धारवाडच्या महाविद्यालयात एम.एस्सी.ला प्रवेश घेतला. त्याच वेळी त्यांना विजापूर येथे स्टेट बँकेत नोकरी करण्याची आणखी एक संधी चालून आली. बँकेची नोकरी करीत असतानाच मुंबईत भाभा अणुसंशोधन केंद्रात संशोधन सहाय्यक म्हणून कामावर रुजू झाले. तेव्हा त्यांनी राहिलेले एम.एस्सी.चे उर्वरित शिक्षण पूर्ण केले. 1979च्या सुमारास अमेरिकेच्या ऍक्रॉन विद्यापीठात रसायनशास्त्र्ाातील पीएच.डी.साठी प्रवेश घेतला तेव्हापासून त्यांची नाळ अमेरिकेशी जुळली. नंतरच्या काळात त्यांना अमेरिकेचे नागरिकत्वही मिळाले. पण हिंदुस्थानी असल्याचा नि मराठी भाषिक असल्याचा अभिमान त्यांनी कधीही सोडला नाही. ठाणेदार यांनी ‘व्यवसाय प्रशिक्षण’ या विषयातलेही उच्च शिक्षण घेतले, ज्याचा प्रत्यक्ष लाभ त्यांना झाला. या शैक्षणिक गुणविशेषाच्या जोरावर ते ‘चेमिर’ या रासायनिक कंपनीत रुजू झाले. अखंड परिश्रम आणि नित्यनूतन नव्याचा ध्यास या बळावर ते तिथे मालक झाले. ठाणेदार यांचे ध्येय मोठे होते. तेवढय़ा त्यांना अडचणी आल्या, पण वेळोवेळी त्यांनी परिस्थितीवर मात केली. बेळगाव ते अमेरिका व्हाया विजापूर-मुंबई हा प्रवास करणारे ठाणेदार पुढील काळात यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास आले. लहानपणापासूनच त्यांना अभ्यासाचा ध्यास असल्याने त्यांनी विजापूर येथील बँकेची व मुंबईतील भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटरची नोकरी सोडली. नंतर बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी यशाचे एकेक शिखर पादाक्रांत करण्यास सुरुवात केली. 1984 साली पेट्रोलाइट कॉर्पोरेशनमध्ये शास्त्र्ाज्ञ म्हणून काम करीत असताना रात्री व सुट्टीच्या दिवशी जास्त काम केले. 1991 मध्ये चेमिर कंपनी खरेदी करण्यासाठी त्यांनी 75 हजार डॉलर्सचे कर्ज घेतले. 2005 मध्ये कंपनीची उलाढाल एक कोटी साठ लाख डॉलर्स व कर्मचारी संख्या 160 वर पोहोचली. त्यात 40 पीएच.डी.धारक होते. मंदीमुळे त्यांनाही फटका बसला. बँकांकडून जप्तीची नामुष्की त्यांना अनुभवावी लागली. या सर्व अनुभवांचा प्रवास त्यांनी आत्मचरित्र लेखनात विस्ताराने मांडला आहे. श्री. ठाणेदार यांची ‘ही श्रींची इच्छा,’ ‘द ब्ल्यू सुटेबल ट्रजेडी ऍण्ड ट्रायम्फ इन ऍन इमिग्रंट्स लाइफ’ ही दोन आत्मकथने प्रसिद्ध आहेत. 1999, 2007 आणि 2016 मध्ये मिशिगन विभागातून ‘अर्नेस्ट ऍण्ड यंग आंत्रप्रेन्युअर ऑफ द इअर’ म्हणून त्यांची निवड झाली.

ठाणेदार तब्बल चार दशकांपासून अमेरिकेत मराठी संस्कृती जपत आहेत. मराठी भाषा, साहित्य संवर्धनासाठी ते प्रयत्नशील असतात. जीवनातले अनेक चढ-उतार त्यांनी बघितले आहेत. दोनेक वर्षांपूर्वी त्यांनी मिशिगन प्रांताच्या गव्हर्नर पदासाठी निवडणूक लढविली होती. (आपल्याकडे मुख्यमंत्री पदाशी समकक्ष) त्यात त्यांना यश मिळाले नाही. मात्र यंदाच्या निवडणुकीत ते याच प्रांतातून स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून निवडून आले. परक्या प्रांतातून आलेली व्यक्ती आपल्या समस्या कशा सोडवणार, असा प्रश्न तेथील मतदारांना पडला. मात्र ठाणेदार यांनी आपल्या कार्यातून त्याचे उत्तर दिले. निवडणुकीचा प्रचार घरोघरी, दारोदारी जाऊन केला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचे फळ त्यांना मिळाले. त्यांनी जिंकलेली ही निवडणूक, त्यात मिळालेला विजय हा समस्त मराठी जनांसाठी उत्साह वाढविणारा आहे.