ठसा – डॉ. आनंद नाडकर्णी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेक मनोरुग्णांच्या आयुष्यात आनंदाचे, सुखासमाधानाचे चार क्षण पेरणारा आनंदयात्री आज अचानक अनंताच्या प्रवासाला निघून गेला. प्रख्यात मनोविकार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी व्यवसायाने मनोविकार तज्ञ असले तरी सामाजिक भावना, सामाजिक दायित्वाचा मोठाच गुणविशेष त्यांच्या व्यक्तिमत्त्वात ठासून भरलेला होता. मनाची भाषा नेमकी कुणाला कधीच कळत नसते किंवा त्याचा साधारण अंदाजही येत नसतो, पण डॉ. आनंद यांनी मनाची नेमकी भाषा अखंड परिश्रम मेहनतीमधून साध्य केली. त्यासोबतच उत्कृष्ट संवादकौशल्य हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक गुणविशेष असल्याने समोरच्या व्यक्तीवर पहिल्याच भेटीत प्रभाव टाकत असत. प्रसन्न चेहरा, उत्कृष्ट संवाद कौशल्य एखाद्या डॉक्टरकडे असेल तर रुग्णाची तब्येत कितीही नाजूक असली तरी तो डॉ. नाडकर्णी यांच्या सहवासात आला की खडखडीत बरा होत असे. आपले वैद्यकीय ज्ञान सतत अपडेट ते ठेवत असत. डॉ. आनंद समोरच्याचे शांतपणे ऐकत, चर्चा करीत, समुपदेशन करीत, तोडगा सुचवत. डॉ. जसा एखादा अवघड विषय सोपा करून समजावून सांगत तसेच त्यांच्या लेखनात येत असे. याचे उत्तम उदाहरण सांगणारे पुस्तक म्हणजे ‘गद्धेपंचविशी’ याचे दिले जाते. डॉ. नाडकर्णी यांनी 1980 साली एम.बी.बी.एस आणि 1984 साली मनोविकारशास्त्रामध्ये एम.डी. हे शिक्षण घेतले. मनोविकारांबद्दलच्या गैरसमजुतींविरुद्ध ‘चळवळ’ उभारण्यासाठी एक संस्था स्थापन करायची कल्पना डॉ. नाडकर्णी यांच्या मनात मनोविकारशास्त्राचे शिक्षण घेताना आली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात उतरवलीही. त्याप्रमाणे 23 मार्च 1990 रोजी ठाणे शहरात आयपीएच अर्थात इन्स्टिटय़ुट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेची त्यांनी स्थापना केली. तीव्र मानसिक आजारांवर उपचार एवढय़ापुरतेच ठाण्यातील त्यांच्या या संस्थेचे काम मर्यादित नाही. उपचारांसाठी येणारा मनोरुग्ण, त्याचे कुटुंबीय, दैनंदिन जीवनातील प्रश्नांमुळे गांजलेली व्यक्ती, कोणतीही समस्या नाही, परंतु मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग स्व-विकासासाठी करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, अशा सर्वांसाठी ही संस्था आहे. क्लिनिकल उपचार, समुपदेशन अशा रूढ मार्गांबरोबरच साहित्य, संगीत, नाटय़, चित्र, संवाद अशा आनंददायी साधनांचा कल्पकतेने वापर केला जातो. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी मानसशास्त्राव्यतिरिक्त अन्य विषयांवरही पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या ‘गद्धेपंचविशी’ आणि ‘विषादयोग’ या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. आनंद नाडकर्णी यांनी ‘रंग माझा वेगळा’ व ‘असेच आम्ही सारे’ ही व्यावसायिक नाटके लिहिली आहेत. त्यांच्या ‘मयसभा’ या नाटकाला लेखन पुरस्कार मिळालेला आहे. ‘मिफ्ता’च्या नाटय़ विभागासाठी आनंद नाडकर्णी यांची कथा संकल्पना असलेल्या ‘गेट वेल सून’ या नाटकाची त्यावेळी 10 सर्वोत्कृष्ट नाटकांत निवड करण्यात आली होती. डॉ. आनंद नाडकर्णी यांना त्यांच्याकार्याबद्दल ‘इंडियन मर्चंट चेंबर’ प्लॅटिनम ज्युबली पुरस्कार, डॉ. अरुण लिमये स्मृती पुरस्कार, शतायुषी पुरस्कार, आय.एम.ए.चा ‘डॉक्टर ऑफ द इयर’ 1993, आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आलं होते. डॉ. नाडकर्णी यांनी आपला वैद्यकीय पेशा सांभाळून वैविध्यपूर्ण लेखन केले. असेच आम्ही सारे (नाटक), आम्ही जगतो बेफाम (नाटक), आरोग्याचा अर्थ, एका सायकिऑट्रिस्टची डायरी, कर्मधर्मसंयोग – मर्म सात्त्विक जीवनविकासाचे, किंचित गद्धेपंचविशी, गेट वेल सून (नाटक, कथा संकल्पना आनंद नाडकर्णींची; नाटय़लेखन प्रशांत दळवी यांचे), जन्मरहस्य (स्किझोफ्रेनियावरील नाटक), Dialogue To Wellness (मूळ मराठी -मुक्तिपत्रे; इंग्रजी भाषांतरकार – सतीश बापट), छत्रपती संभाजीनगर येथे पत्रमहर्षी अनंतराव भालेराव पुरस्कार स्वीकारण्यासाठी डॉ. नाडकर्णी आले होते, या निमित्ताने त्यांच्या व्याख्यानाचा लाभ शहरवासीयांना झाला होता. अगदी अलीकडे एमजीएम विद्यापीठ त्यांचे व्याख्यान होते. सोबत त्यांनी विविध कविता सादरीकरणातून भगवान गौतम बुद्ध यांच्याविषयी जे मनोज्ञ चिंतन मांडले होते, ते कुणीही विसरू शकणार नाही. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या अचानक एक्झिटने त्यांच्यावर प्रेम करणाऱया, त्यांना जाणणाऱया चाहत्यांच्या मनात कायम हुरहूर वाटत राहील.