आभाळमाया – कल्पनातीत सत्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक ([email protected])

विराट विश्वाचं विस्मयकारी स्वरूप आपल्या कल्पनेपलीकडचं वाटावं असंच आहे. विश्वरचनेतील गूढ आजही पूर्णपणे उलगडले गेलेले नाही. हजारो वर्षांचे निरीक्षण, अभ्यास आणि संशोधन यातून विश्वरूपाची आपल्याला जी ओळख झाली आहे, ती ‘थोडीशीच’ आहे. कारण मुळात आपल्याला दृश्यमान असलेलं ‘विराट’ विश्वच एकूण विश्वाचा अवघा चार टक्के भाग आहे. बाकी शहाण्णव टक्के भाग अदृश्य प्रारणे आणि कृष्णद्रव्य, कृष्ण ऊर्जा यांनी व्यापला आहे.

जेव्हा केव्हा माणसाने निवांतपणे रात्रीच्या आकाशाकडे पाहिलं आणि खच्चून भरलेल्या तारांगणाविषयीचं त्याचं कुतूहल जागं झालं, त्या कुतूहलातूनच सृष्टीचे काही नियम समजले आणि ते गणिती पद्धतीने मांडले गेले. बाराव्या शतकात आपल्या महाराष्ट्रातील भास्कराचार्यांनी पृथ्वीचा परीघ मोजला होता आणि त्यांचं ते मोजमाप आधुनिक परिघाच्या अगदी जवळ जाणारं आहे हे विशेष!

विशाल विश्वातील आपण अविभाज्य घटक आहोत, जन्मतःच आपण वैश्विक आहोत याची जाणीव मात्र व्हायला हवी. त्यासाठी अर्थातच ‘ख’गोलाची ओळख करून घ्यायला हवी. ‘खगोलशास्त्र्ा’ म्हटलं तर काहीतरी जडजंबाल, क्लिष्ट, गणिती प्रमेयांनी भरलेलं अनाकलनीय असेल असं वाटेल. ते गुंतागुंतीचं नाही असं नाही, परंतु त्यातील कितीतरी गोष्टी सहजपणे समजून घेता येतात. कठीण गणिती सूत्रांचा अभ्यास संशोधक करतील, पण आपण रोजच्या व्यवहारातील सोप्या गणिताद्वारे विश्वरचनेच्या विस्मयतेचा अंदाज घेऊ शकतो.

साधी गोष्ट घ्या. रोजचा सूर्योदय कोणाला ठाऊक नाही? पर्यटनस्थळी तर ‘सनराइज पॉइंट’वर गर्दी होत असते. तिथे विशाल क्षितिज रेषेवरून येणारा सूर्य गतिमान दिसतो, परंतु आपण ज्यावेळी उगवलेला सूर्य पाहतो, त्याच्या सवाआठ मिनिटं आधीच तो उगवलेला असतो, पण ‘दिसत’ नाही. हे चकीत करणारं नाही, त्यात गूढ असं काहीच नाही. प्रकाशाचा वेग सेकंदाला तीन लाख किलोमीटर. त्याच्या इतकं वेगवान विश्वात काहीच नाही. त्या वेगाने सुमारे पंधरा कोटी किलोमीटरचं अंतर पार करून उगवतीची किरणं आपल्या नजरेला भिडण्यासाठी सवाआठ मिनिटं लागतात, ही गोष्ट सहज लक्षात राहील अशी आहे.

ज्या पृथ्वीवर आपण राहतो ती सूर्याभोवती फिरते हे नव्याने सांगण्याची गरज नाही, पण किती वेगाने फिरते, तर सेकंदाला तीस किलोमीटर! म्हणजे अत्यंत वेगवान रॉकेटपेक्षाही हा वेग विलक्षण आहे आणि पृथ्वी नावाच्या ‘वाहना’वर स्वार होऊन आपण वर्षभरात एक सूर्यप्रदक्षिणा पूर्ण करतो ती अर्थातच नकळत. मग तीनशे पासष्ट दिवसांत पृथ्वी किती अंतर अथकपणे पार करते? सुमारे 95 कोटी किलोमीटर!

आपला नैसर्गिक चंद्र त्या मानाने आपल्याला खूपच जवळचा, अगदी परसदारी असल्यासारखा. त्याचं आपल्यापासूनचं सरासरी तीन लाख चौऱ्याऐंशी हजार किलोमीटर हे अंतर वैश्विक अंतरांची तुलना करता काहीच नव्हे. आपले ग्रहमालेतील सहप्रवासी ग्रह दूर दूर आणि कोटय़वधी, अब्जावधी किलोमीटरवर असले तरी ते जवळचेच, परंतु आपल्या सूर्यासारखा ‘शेजारी’ तारा अल्फा सेंटॉरी (किंवा मित्र तारा) आपल्यापासून किती अंतर राखून आहे? सुमारे साडेचार प्रकाशवर्षे. किलोमीटरच्या हिशेबात हे अंतर 40 वर 12 शून्यं इतकं भरेल आणि तिथे सध्याच्या सुपरफास्ट रॉकेटने ताशी 575 हजार किलोमीटर वेगाने जायचं तर फक्त (!) 60 हजार वर्षे लागतील.

ही आपल्या जवळच्या ताऱ्याची विस्मयकथा. सर्वात जवळची दीर्घिका किंवा गॅलॅक्सी असलेल्या देवयानीचा (ऍन्ड्रोमिडा) पत्ता काय? अवघा 22 लाख प्रकाशवर्षे. प्रकाशाच्या वेगाने बावीस लाख वर्षे (न थांबता… कारण प्रकाश थबकत नसतो) जात राहिलं तर देवयानी दीर्घिकेत पोहोचायला 22 लाख वर्षे लागतील. त्यासाठी एक प्रकाशवर्ष म्हणजे 9460 अब्ज किलोमीटर हेसुद्धा लक्षात ठेवायला हवं.

या तर विश्वविस्मयातील अगदी साध्यासोप्या गोष्टी झाल्या. अशी अनेक प्रकारची अचंबित करणारी रहस्ये विश्वाच्या उदरात दडलेली आहेत. त्याची जन्मकथाही विलक्षण आहे. त्याबद्दल अनेक सैद्धांतिक मतंमतांतरंही आहेत, परंतु वैज्ञानिक अभ्यासाच्या वादातून निष्कर्षापर्यंत जाता येतं. ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’ म्हणतात तसा अभ्यासपूर्ण वादातून शेवटी ‘तत्त्वबोध’ होतो. त्यासाठीच विश्वाचा अव्याहत शोध सुरू असतो. माणसाच्या इवल्याशा मेंदूला विराट विश्वातील गूढ रहस्यं उलगडतात हेसुद्धा विस्मयकारी!