प्रासंगिक – क्रांतिकारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

>> उल्हास पवार

महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि साहित्य विश्वात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे योगदान फार मोठे आहे. वंचित, उपेक्षित अशा घटकांचे प्रतिनिधित्व अतिशय प्रखरपणे, झुंजारपणे अण्णाभाऊ साठे यांनी केले. त्यासाठी त्यांनी लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि ग्रामसंस्कृती यांच्याशी आपली जोडलेली नाळ शेवटपर्यंत कायम ठेवली. अण्णाभाऊ साठे साम्यवादी चळवळीच्या मुशीत वाढले. साम्यवादी चळवळीचा मोठा प्रभाव त्यांच्या साहित्यावर होता. कथा, कादंबरी, पोवाडे, लोकनाटय़े, गण, लावण्या, छक्कड असे विविध स्पर्शी लेखन आण्णाभाऊंनी केले.

अण्णाभाऊंचे साहित्यातील दर्शन हे विद्वान, सुशिक्षितांना अचंबित करणारे आणि मोहिनी घालणारे आहे. लौकिक अर्थाने कधीतरी  शाळेत गेलेले अण्णाभाऊ त्यांना शाळेचा गंध होता असे म्हणता येणार नाही. कोणत्याही विद्यापीठाची पायरी न चढलेले अण्णाभाऊ साम्यवादी चळवळीचे प्रवाचक होते. जागतिक घडामोडींचे आकलन अतिशय आत्मीयतेने करून देणारा एक तत्त्वचिंतक साहित्यिक अशी अण्णाभाऊंची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर आहे. जणू लोकविद्यापीठाचे विद्यार्थी, शिक्षक, कुलगुरू, कुलपती असे  जरी अण्णाभाऊंचे वर्णन केले तरी ते अपूर्णच होईल असे मला वाटते आणि म्हणूनच कोणत्याही शाळेत न गेलेल्या अण्णाभाऊंचे वाङ्मय हे अनेक विद्यापीठांमध्ये पदवी परीक्षेला अभ्यासाठी आहे.  अनेकांनी त्यांच्या वाङ्मयावर संशोधन करून पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली.

शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख, शाहीर गव्हाणकर ही साम्यवादी विचारांची मंडळी होती. मुंबईच्या गिरणी कामगारांच्या लढ्यात, शेतमजुरांच्या लढ्यात, भूमिहीनांच्या लढ्यात ही मंडळी अग्रक्रमावर होती. आजही विद्यार्थी जीवनात वाचलेल्या त्यांच्या  कादंबऱया फकिरा, अलगुज, चंदन, माकडीचा माळ मला आठवतात. समाजजीवनाचे आणि निसर्गाचे अप्रतिम वर्णन या कादंबर्‍यांमध्ये आहे. लोकनाटय़ाच्या माध्यमातून त्यांनी शोषित, वंचितांचा संघर्ष मांडला. कामगारांचा लढाही मांडला. ‘माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतीया कायली’ ही अण्णाभाऊ साठे यांची छक्कड म्हणजे संयुक्त महाराष्ट्र आणि विखंडित महाराष्ट्राचे रूपक आहे.

मला आजही आठवते, प्रसिद्ध सारसबागेच्या समोर आणि नेहरू स्टेडियमच्या जवळ अण्णाभाऊंच्या पुतळ्याचे अनावरण  स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. यशवंतराव चव्हाण यांनी अण्णाभाऊंबद्दल केलेलं आदरयुक्त, गौरवपूर्ण भाषण आजही माझ्या लक्षात आहे.  त्यांच्या क्रांतिक्रारक व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा, त्यांच्या साहित्याचा अतिशय रसपूर्ण असा उल्लेख यशवंतराव  चव्हाण यांनी आपल्या ओघवत्या भाषणामध्ये केला आणि सभा अक्षरशः भारावून गेली.   त्यावेळी ते असे म्हणाले की, ‘स्वातंत्र्यपूर्व चळवळीत भूमिगत असताना ब्रिटिश पोलिसांना चकवा देण्यासाठी एका उसाच्या शेतामध्ये मी  आणि माझे सहकारी रात्री लपून बसलो होतो. पहाटे एक शेतकरी मोटेने पाणी देत होता. त्यावेळी त्याची भलरी ऐकली ‘दौलतीच्या राजा, उठून सर्जा हाक दे शेजाऱयाला हो शिवारी चला ओ शिवारी चला’ अशी ती भलरी होती. त्या वेळी मी साथीदाराला विचारले, ही भलरी सुंदर आहे. ही कोणाची आहे? त्याबरोबर साथीदार म्हणाला, आपल्याच जिह्यातील अण्णाभाऊ साठे यांची आहे. तेव्हा मी अचंबित झालो.’ यशवंतराव पुढे म्हणाले,  अण्णाभाऊ साम्यवादी विचारांचेच होते आणि मी गांधीवादी विचाराने प्रेरित झालेला काँग्रेसचा कार्यकर्ता होतो. त्यामुळे आमच्या विचारांमध्ये फरक होता. तरीसुद्धा संयुक्त महाराष्ट्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव केलाच पाहिजे.

साहित्य विश्वाने अण्णाभाऊंच्या साहित्याची दखल जेवढी घ्यावी तेवढी घेतली गेली नाही याची खंत माझ्या मनात आहे. आता काळाच्या ओघात मात्र त्यांच्या साहित्याचा व्यापक असा संचार, विचार, चिंतन, संशोधन आणि चर्चा आजही व्यापक प्रमाणात झाली याचा मला आनंद आहे.

(लेखक माजी विधान परिषद सदस्य आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या