लेख – व्यसनविरोधी लोकचळवळ आवश्यक

680

>> डॉ.  चंद्रकांत शंकर कुलकर्णी 

तंबाखूविरोधी दिन म्हणून 31 मे हा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. महाराष्ट्र सरकारने 1 ऑगस्ट 2002 पासून तंबाखू, गुटखा व पान मसाल्यावर बंदी घातली. या बंदीचा परिणाम निश्चित झाला, पण पूर्ण झाला नाही. राज्य आणि पर्यायाने देश व्यसनमुक्त होण्यासाठी अजूनही बर्‍याच प्रयत्नांची गरज आहे. अलीकडच्या माहितीनुसार आपल्या देशात एका वर्षात 10 लाख लोक तंबाखूमुळे मरण पावतात. याशिवाय तंबाखूच्या भट्टीसाठी वृक्षतोड होतेय ती वेगळीच. तंबाखू हे व्यसन आपल्या देशात शहरी आणि ग्रामीण भागात पसरलेले आहे. त्याला आळा घालण्यासाठी व्यसनविरोधी लोकचळवळ आवश्यक आहे.

महाराष्ट्र सरकारने 1 ऑगस्ट 2002 पासून राज्यात गुटख्यावर बंदी घातली. हे त्यावेळच्या सरकारचे स्वागतार्ह पाऊल होते. त्याचा परिणामही झाला. उघडउघड होणारी विक्रीच बंद झाली. अर्थात् लपूनछपून विक्री आजही सुरूच आहे. त्यामुळे तंबाखूचे व्यसन कमी झाले ना गुटखा बंद झाला? आता या बंदीमागे महसुलाचे कारणही होते, पण तितकाच महाराष्ट्रातील स्वयंसेवी संघटनांचा दबावही होता. त्यातून सरकारने हे पाऊल उचलले. मात्र आपल्याकडे बंदीतून पळवाटा काढण्याचे कौशल्य अनेकांना अवगत आहे. त्यामुळे एकाच पुडीतून मिळणारा तंबाखू, आणि गुटखा दोन स्वतंत्र पुड्यांमधून मिळू लागला आहे. ज्याला सुपारी मिक्स म्हणतात. या सुपारी मिक्सची एक पुडी व सोबत मिळणारी जर्दाची पुडी एकमेकात मिसळली की पूर्वीसारखा गुटखा तयार होतो. हे म्हणजे येरे माझ्या मागल्या असेच झाले.

पुन्हा सरकारने गुटखा विक्रीवर बंदी घातली असली तरी त्याच्या सेवनावर कोणतीही बंदी घातलेली नाही.तसेच कोणत्याही कडक शिक्षेची तरतूद न केल्याने बाहेरून चोरून गुटखा आणून खाण्याचे प्रकार राजरोस सुरू आहेत. केरळ, गोव्यासारख्या राज्यांनी तंबाखूजन्य पदार्थांवर पूर्णपणे बंदी घातली आहे.  महाराष्ट्र शासनानेही बंदी जाहीर केलेली आहे. मात्र सुपारी मिक्सच्या आगमनाने या बंदीला तडा गेला आहे. केंद्र शासनाने सध्याच्या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर संपूर्ण देशात सर्व दारूची दुकाने तसेच तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणारी दुकाने कायमपणे बंद ठेवावीत. घरपोच दारू पुरविण्याचे कार्य बंद ठेवायला हवे. अवैध गुटखा विक्रीला आळा घालावा, तरच व्यसनांना बंधन पडू शकते. हे सरकार करू शकते.

मानवी आरोग्याला हानिकारक असणार्‍या तंबाखूजन्य पदार्थांच्या प्रसारासाठी उत्पादक कंपन्यांनी वेगवेगळी शक्कल  लढविली आहे. त्याचे लोण ग्रामीण भागातही वेगाने पसरलेले आहे. वेगवेगळ्या मोठंमोठ्या बक्षिसांचे आमिष दाखवून बालवर्गाला भुरळ पाडली जात आहे. त्याला या घातक व्यसनांच्या मायाजालात अडकवले जात आहे. जे लोक किंवा संस्था या गोष्टींना विरोध करतात त्यांना अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात.

सध्या सर्वात जास्त मृत्यू केवळ तंबाखूमुळेच होतात. वास्तविक हे सर्व मृत्यू टाळण्याजोगे असतात. माणसाचा जीव घेणारी इतर कारणे म्हणजे एड्स, प्रदूषण, कोकेन, हेरॉइनसारखे अंमली पदार्थ, खून, आग, अपघात, आत्महत्या इत्यादी. या सर्व कारणांमुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या एकत्र केली तरी त्याच्यापेक्षा जास्त बळी केवळ तंबाखूचे असतात. हे आज जागतिक आकडेवारीवरून सिद्ध झालेले आहे. सार्‍या जगात तंबाखूचे सेवन केल्यामुळे दरवर्षी किमान तीन लाख लोक मरण पावतात. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. हिरोशी नाकाजीना यांच्या म्हणण्यानुसार वरील मृत्यूंपैकी पंधरा लाख मृत्यू ऐन तारुण्यात होतात. त्यामुळे त्या लोकांच्या कुटुंबांचे अपरिमित नुकसान होते. तंबाखू सेवनाचे हे सत्र अव्याहतपणे असेच वाढत राहिले तर येत्या काही दशकांत तंबाखू सेवनाने होणार्‍या अकाली मृत्यूंची संख्या दरवर्षी एक कोटीच्या वर जाईल, अशी भीती वल्र्ड हेल्थ ऑर्गनायझेशननेच व्यक्त केली आहे. असे झाले तर त्यावेळी दर तीन सेकंदास एक मृत्यू तंबाखूमुळे होईल, अमेरिकेत दरवर्षी 3 लाख 50 हजार लोक निव्वळ तंबाखूचे बळी ठरतात. एका अंदाजानुसार हिंदुस्थानात दरवर्षी सर्व प्रकारच्या तंबाखू सेवनामुळे आणि त्यामुळे होणार्‍या वेगवेगळ्या रोगांनी जवळजवळ दहा लाख लोक मरण पावतात.

नुकत्याच झालेल्या आकडेवारीनुसार आपल्या देशात जवळजवळ आठ लाख लोक तंबाखूच्या व्यसनामुळे मृत्युमुखी पडले, म्हणजेच साधारणपणे दररोज दोन हजार दोनशे लोक तंबाखूचे बळी ठरतात. म्हणजे गंभीर बाब अशी की, तंबाखू सोडून इतर आरोग्याच्या समस्यांमुळे त्या तुलनेत कमी लोक दगावतात. 2018 च्या आकडेवारीनुसार सतरा लाख लोक तंबाखूच्या सेवनाने दगावले. ही वस्तुस्थिती गंभीर आहे. तंबाखूमुळे मानवी आरोग्याला तसा धोका निर्माण होतो तसा निसर्गाच्या आरोग्यालाही होतो. तंबाखू भट्टीमध्ये भाजण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातात त्यामुळे जंगलतोड होते. परिणामी प्रदूषणातही वाढ होत आहे. धूम्रपान, मावा, गुटखा, जाफरानी तंबाखूचे सेवन, चुना इत्यादींच्या अतिरेकी वापरामुळे मानवी आरोग्याचे धोके वाढले आहेत. देशात हृदयविकार व कॅन्सरने मृत्यू याचे प्रमाण लक्षणीय वाढत आहे. हा काही निव्वळ योगायोग नाही.

एकीकडे तंबाखूचे व्यसन आटोक्यात आणा, तंबाखू खाणे, विडी-सिगारेट पिणे आरोग्यास हानिकारक आहे अशा जाहिराती सरकारच देते आणि दुसरीकडे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या उद्योगांना आळा मात्र घालत नाही. किंबहुना तंबाखू उद्योग यांची उत्पादने अधिकाधिक विकली जावीत यासाठी जी जाहिरातबाजी करतात त्यालाही आळा घातला जात नाही. या सगळ्या गोष्टींचा अपरिहार्य परिणाम म्हणून तंबाखूचे व्यसन आटोक्यात येत नाही.

हिंदुस्थानसारख्या देशातील एक माणूस दिवसाला पाच सिगारेटी, दहा विड्या आणि पाच गुटख्याची पाकिटे संपवू लागला तर त्याचे जेवढे पैसे खर्च होतात त्याचा अंदाज त्याला येत नाही. किंबहुना या खर्चामुळे तो आपल्या मुलांना नेहमीच्या पाव पटच अन्न देऊ शकतो.

खरे तर सर्वच तंबाखूजन्य उत्पादनांवर व तंबाखूच्या पिचकारीवर बंदी घातली पाहिजे. अनेक ठिकाणी तसे नियम स्थानिक स्वराज्य संस्थांनी केले आहेत परंतु त्याची अंमलबजावणी कमी होते. जोपर्यंत तंबाखू आणि त्याचे व्यसन सुरू आहे तोपर्यंत व्यसनविरोधी चळवळ चालूच राहील. तसे झाले आणि व्यसनविरोधी चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप आले तर उद्याचा हिंदुस्थान एक निरोगी आणि सशक्त देश म्हणून लौकिक मिळवू शकेल.

आपली प्रतिक्रिया द्या