आभाळमाया – ‘अॅपोफिस’ काय करील?

>> दिलीप जोशी

पृथ्वीवर निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित उत्पात, उद्रेकाच्या बातम्या कमी म्हणून की काय अधूनमधून अंतराळातील काही घडामोडीही पृथ्वीवासीयांना घाबरवतात. या अंतराळी उत्पाताचा धोका खरं तर आपल्या ग्रहमालेतील ग्रहांना सारखाच असतो. आपल्यापेक्षाही गुरू आणि शनी या मोठय़ा ग्रहांना जास्त असतो, पण तिथे वस्ती नसल्याने त्याच्या परिणामांची चर्चाही आपणच इथे पृथ्वीवर राहून करतो. एरव्ही शूमेकर लेव्ही-9 हा धूमकेतू 1994 मध्ये तुकडे होत गुरू ग्रहावर आदळला ही गोष्ट आपल्यासाठी अद्भुत असली तरी गुरूवर वस्ती असती तर ती त्यांना भयावहच ठरली असती.

1610 नंतर म्हणजे रशियातील ‘तुंगुस्का’ येथे कोसळलेल्या मोठय़ा अंतराळी पाषाणानंतर योगायोगाने आजवर असा आघात पृथ्वीने अनुभवलेला नाही. अमेरिकेचे मानवनिर्मित ‘स्कायलॅब’ कोसळले तेव्हा काय घबराट उडाली होती हे पन्नाशीतल्या मंडळींना आठवत असेल. परंतु अंतराळातून एखादा अशनी येऊन पृथ्वीवर आदळणार अशा भयवार्ता बऱयाच वेळा आल्या तरी तसं आजवर घडलेलं मात्र नाही. अगदी 1968पासूनच आठवतं की कुठला तरी ग्रह (खरं तर महापाषाण) पृथ्वीवर आदळण्याची चिंता व्यक्त व्हायची. हॅलेचा धूमकेतू 1910मध्ये दिसला तेव्हा त्याच्या धूसर शेपटीत पृथ्वी सापडतेय असं कळताच पापविमोचक आणि सुरक्षाकवच देणाऱया अंधश्रद्धांचा युरोपातही प्रादुर्भाव झाला होता. हॅलेने फक्त मनोहारी दर्शन दिलं आणि तो गेला.

नंतर काही दशकांनी ‘इकॅरस’चा कोणता तरी अशनी आदळेल अशी बातमी आणि त्याची चर्चा लहानपणी ऐकली. तेव्हाही काहीच घडलं नाही, पण म्हणून पृथ्वीवर अशनी कोसळण्याचा किंवा एखाद्या धूमकेतूने धडक देण्याचा धोका कायमचा नष्ट झाला असं नाही. फरक इतकाच की, आता आपण अंतराळाचा आणि त्यातही आपल्या सूर्यमालेचा इतका बारकाईने अभ्यास करीत आहोत की, अशा पृथ्वीनिकट (निअर अर्थ) वस्तूंची (ऑब्जेक्टस्) आपल्याला कल्पना आहे. तसा अभ्यास करणारी संस्थाच ते भाकित करू शकते. अशा अभ्यासातून एक गोष्ट लक्षात आली की अंतराळात इतस्ततः भिरभिरणारे दगड, धोंडे, महापाषाण लाखोंच्या संख्येने आहेत.

त्यापैकी सारेच पृथ्वीला घातक आहेत असं मात्र नाही. छोटय़ा दगडगोटय़ांच्या हजारो ‘उल्का’ तर पृथ्वीवर रोजच कोसळतात. दिवसा पडणाऱया उल्का दिसतच नाहीत आणि रात्रीही क्वचित दिसतात. ठरावीक राशींच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उल्कावर्षाव वगळता ते पाहायला कोणी आकाशाकडे नजर लावत नाही.

आणि तरीही एक दिवस अचानक ‘तुंगुस्का’सारखी धडक आपली झोप उडवते. अर्थात 1910 नंतर अभ्यासांती लक्षात आलंय की सुमारे 20 हजार अशनी आणि धूमकेतू ‘पृथ्वीनिकट’ या सदरात मोडतात. त्यांची कक्षा प्रत्येक वेळी पृथ्वीवर झेपावण्याची नसते. त्यातल्या काहींची कक्षा अंतराळी आदळआपटीने अचानक बदलली आणि त्यांचा आकारही मोठा असेल तर आपल्याला धोका संभवतो.

अशाच एका संभाव्य धोक्याची सूचना पुन्हा एकदा आली आहे. अॅपोफिस हा लघुग्रह कदाचित 2029 किंवा पुढे 2068 मध्ये पृथ्वीवर आदळू शकतो, असं म्हणतात. 13 एप्रिल 2029 रोजी तो पृथ्वीपासून अवघ्या 31 हजार किलोमीटर अंतरावरून पसार होणार आहे. म्हणजे आपल्या चंद्राच्या तुलनेत तो दहा पटींनी जवळच्या कक्षेत येईल. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने तो खेचला गेला तर?… तर मात्र उत्पात घडेल.

सुमारे 140 मीटरपेक्षा जास्त आकाराचा अशनी पृथ्वीवर कोसळला तर मोठा फटका बसू शकतो. अॅपोफिस 370 मीटर (1210 फूट) आकाराचा असल्याने धोकादायक नक्कीच आहे. तो पूर्वीही पृथ्वीजवळून पसार झालाय, पण तेव्हा काही विपरीत घडलं नाही. 2020 मध्ये मात्र तो धोक्याच्या मार्गावर (पाथ ऑफ रिस्क) येत असल्याने काळजी घ्यायला हवी.

त्यासाठी त्याला कृत्रिम यानाने काही वर्षे आधीच धडक देऊन त्याची कक्षा बदलणे किंवा विस्पह्टाने त्याचे तुकडे करणे असे पर्याय संशोधकांसमोर आहेत. त्यापैकी काय निर्णय होतो ते यथावकाश कळेलच कारण रोझेटासारखं यान एखाद्या छोटय़ा धूमकेतूवर अचूक जाऊ शकतं तर ‘अॅपोफिस’ला गाठणं अशक्य नाही. त्यामुळे काळजी नसावी. मात्र तो पृथ्वीवर आलाच तर रशिया-अमेरिकेमधील पॅसिफिक महासागरात कोसळण्याची शक्यता असून 1000 कि.मी. हादरा देणारा भूकंप आणि प्रचंड त्सुनामी निर्माण करील. तेव्हा आतापासून त्याविषयी जागरूक असायला हवं. शास्त्रज्ञ त्यांचं काम करतीलच पण आपल्यालाही अंतराळवार्ता किंवा पुवार्ता ठाऊक असायला हवी ती आपल्या वैश्विक अस्तित्वाचा भाग म्हणून.

 

आपली प्रतिक्रिया द्या