ठसा – अरुण फडके

659

>> प्रज्ञा सदावर्ते

मराठी भाषाप्रेमींमध्ये भाषेसोबतच शुद्धलेखनाचीही गोडी वाढविण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणारे भाषा अभ्यासक, शुद्धलेखनकार अरुण फडके यांचे नाशिक येथे गुरुवारी निधन झाले. त्यांच्यातील शिक्षकाने कायमच हजारो लोकांना शुद्धलेखनाची योग्य दिशा दाखवली. त्यासाठी त्यांनी पुस्तक लेखनासोबतच कार्यशाळा, अभ्यासवर्ग, तसेच सोशल मीडियावरूनही हवे तेव्हा सर्वांनाच मार्गदर्शन केले. मराठी शुद्धलेखनाचे पहिलेवहिले ऍप सुरू करण्याचे श्रेयही त्यांना जाते. शुद्धलेखनाची चळवळ त्यांनी नुसतीच रूजवली नाही तर कायमच ते योग्य लेखनाचे धडे देत राहिले. शुद्ध भाषेत लेखन करणे हा केवळ आठाह न राहता ती सवय झाली पाहिजे, हे त्यांचे सांगणे होते. ‘शुद्धलेखन ठेवा खिशात’ ही त्यांची छोटी पुस्तिका विशेष गाजली. घराघरात पोहचलेल्या या पुस्तिकेने अनेकांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर योग्य-अयोग्य लेखनाच्या ठळक निर्देशासह मराठी लेखनकोशही त्यांनी सादर केला. चकवा देणाऱया अनेक शब्दांचे योग्य लेखन कसे करावे, त्यांचे शाŒााrय स्पष्टीकरणही दिले. यात प्रचलीत नियमांनुसार शब्दांची विविध रूपे देत वैशिष्टय़पूर्ण मांडणी करून दाखवली. ‘शुद्धलेखन मार्गप्रदीप’ या पुस्तकाचेही त्यांनी लेखन, संपादन केले. फडके यांचा वडिलोपार्जित मुद्रणालयाचा व्यवसाय होता. त्यावेळी या व्यवसायाची गरज म्हणून फडके सर मुद्रितशोधन करू लागले. मुद्रण तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले. ते या व्यवसायात उतरले. अर्थात, मुद्रितशोधनाचे काम करता-करता त्यांच्या मनातील मराठी भाषेची गोडी अधिकच वाढत गेली. भाषेची आवड त्यांना आधीपासूनच होती. त्यामुळे त्यांनी पुढे शुद्धलेखन आणि मराठी भाषेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आपले आयुष्य वाहून देत भाषाप्रेमींना कायम उत्स्फूर्तपणे मार्गदर्शन केले. मराठीतील पहिले शुद्धलेखनाचे मोबाईल ऍप त्यांनी तयार केले. यापूर्वी खिशात असलेली पुस्तिका ‘शुद्धलेखन ठेवा खिशात’ या नावानेच नव्या पिढीच्या मोबाईलमध्ये दाखल झाली अन् हवा असलेला अचूक शब्द कसा लिहावा, याचे मार्गदर्शन अगदी सहज काही सेकंदातच या ऍपद्वारे मिळू लागले. यात तुम्हाला अकरा हजार शब्दांचा खजिना बघावयास मिळतो. कोश कसा पहावा याचीही माहिती दिली आहे. योग्य-अयोग्य लेखन, त्याचे शाŒााrय स्पष्टीकरणही उपलब्ध आहे. पुस्तकांसोबतच त्यांनी कार्यशाळांच्या माध्यमातून अखंडितपणे मार्गदर्शन केले. अनेक मुद्रितशोधक घडविले. मुद्रितशोधन आणि संपादन कौशल्यासाठीही त्यांनी अभ्यासवर्ग घेतले. मराठी भाषेवरील त्यांचे प्रेम त्यांच्या शुद्धलेखन चळवळीतून कायम दिसत आले. त्यांची पुस्तके हा मराठी भाषेतील अमूल्य ठेवा असून, तो पुढील पिढय़ांना कायम उपयुक्त ठरणारा आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी आयुष्य वाहून घेतलेल्या या अभ्यासकाला महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. आज मराठी भाषेची चिंता सर्वच करतात. पण मराठी भाषा आणि शुद्धलेखन यांचा दुरान्वयानेही संबंध राहिलेला नाही. किंबहुना, त्याचे गांभीर्यही फारसे दिसत नाही. अशावेळी अरुण फडके यांच्यासारख्या मराठी शुद्धलेखनासाठी आयुष्य वाहिलेल्या जाणकाराचे जाणे चटका लावून जाते.

आपली प्रतिक्रिया द्या