ठसा – अरुणा कुल्ली

>> नरेंद्र लांजेकार

बुलढाण्याच्या सांस्कृतिक आणि वाचनसंस्कृतीच्या चळवळीत अरुण कुल्ली यांचेच सक्रिय योगदान होते. बुलढाणा जिल्ह्यातील चळवळीचे वेंâद्र म्हणजे कुल्ली यांचे घर. सर बुलढाण्याच्या जिजामाता महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख होते. केशवसुत -मर्ढेकर -नारायण सुर्वे त्यांच्या कविता सरांच्या चिंतनाचा विषय. कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांवर त्यांनी पीएच.डी. केली. कुल्ली सरांच्या सान्निध्यात अरुणा महाराष्ट्रातील अनेक नामवंत व्यक्तिमत्त्वांच्या संपर्कात आल्या. गोदुताई परुळेकरांपासून ते मलिका अमर शेख, शबाना आजमी, अहिल्या रांगणेकर अशा दिग्गजांच्या त्या संपर्कात आल्या. जनवादी महिला संघटनेत त्या सक्रिय सहभागी होत्या. प्रा. सदाशिव कुल्ली यांनी बुलढाणा शहरात प्रगती सार्वजनिक वाचनालयाची आणि भगतसिंग क्रीडा मंडळाची उभारणी केली, यात सुरुवातीपासूनच अरुणा संचालक मंडळात होत्या. माक्र्सवादी समीक्षक म्हणून मराठी साहित्य प्रांतात कुल्ली सरांचे नाव आदराने घेतले जाते. कुल्ली सरांनी साहित्य-कला-संस्कृती, प्रबोधनाच्या क्षेत्रात बुलढाणा शहरात जे काम सुरू केले होते ते काम पुढे अरुणा यांनी ज्ञानदानाच्या प्रकल्पाच्या माध्यमातून पुढे नेले. कुल्ली सरांनंतर अरुणा प्रगती सार्वजनिक वाचनालय आणि भगतसिंग क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा झाल्या. गेली २२ वर्षं त्यांनी या दोन्ही संस्थांसोबतच ज्ञानदान या प्रकल्पाचे काम उत्तमरीत्या सांभाळले. अरुणा विविध सामाजिक कामात अग्रेसर होत्या. अरुणा यांनी २१ वर्षे ज्ञानदानाचे कार्यक्रम आयोजित केले. याअंतर्गत त्यांनी कथ्थक नृत्य मैफील, शास्त्रीय- सुगम संगीताच्या मैफली, लोककलांचे कार्यक्रम, विविध पर्सनालिटी डेव्हलपमेंट तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध परफॉर्मन्स अॅक्टिव्हिटीजचे कार्यक्रम आयोजित केले. सरांच्या नावाने स्मृती पुरस्कार देऊन काही साहित्यिकांचा गौरव केला. कुल्ली सरांच्या निधनानंतर स्थापन झालेल्या प्रगती व्याख्यानमालेअंतर्गत त्यांनी शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकरांपासून ते कॉम्रेड गोविंद पानसरेंपर्यंत, एन. डी. पाटलांपासून खासदार सीताराम येच्युरींपर्यंत अनेक मान्यवरांना निमंत्रित केले. मोठमोठ्या वक्त्यांची व्याख्याने बुलढाणाकरांना ऐकता आली. संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात ग्रंथालयाच्या क्षेत्रात प्रगती सार्वजनिक वाचनालयाचे नाव आजही आदराने घेतले जाते. या वाचनालयाची उभारणीच कुल्ली यांनी केली असल्यामुळे अरुणा यांनीही त्यांचा वसा तसाच पुढे चालविला. प्रगती सार्वजनिक वाचनालय हे आज बुलढाणाचे सांस्कृतिक वेंâद्र बनले आहे. वाचनालयात अभिजात मराठी साहित्यावरील साहित्यसंपदा मोठ्या प्रमाणावर जतन करण्यात आली आहे. अरुणा यांनी ज्ञानदानासोबतच अन्नदान आणि वृक्षदानही मोठ्या प्रमाणावर केले. प्रत्येक कार्यक्रमात त्या मान्यवर उपस्थितांना वृक्षदान करीत असत. पुढे त्यांना नातू झाला. त्याचे नावही त्यांनी वृक्ष असेच ठेवले. भविष्यात वृक्ष फाउंडेशन स्थापन करून त्याच्या माध्यमातून लहान मुलांसाठी व पर्यावरण जतनासाठी विविध उपक्रम करण्याचा त्यांचा संकल्प होता. बुलढाणा जिल्ह्यातील त्यांचे ग्रंथालय क्षेत्राचे काम बघून त्यांना महाराष्ट्र शासनाचा ग्रंथमित्र पुरस्कार तसेच त्यांना लिंगाडे पतसंस्थेचा बुलढाणा गौरव पुरस्कार मिळाला होता.

सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून कौटुंबिक नातेसंबंध जोडणाNया, आपल्या लाघवी सुस्वभावामुळे त्यांनी अनेकांच्या अंत:करणात घर केले होते. अरुणा यांचे जाणे म्हणजे बुलढाणा जिल्ह्याचा सांस्कृतिक दूत हरपल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली, ती रास्तच होय. अरुणा यांचा हा सांस्कृतिक वारसा पुढे सुजाता कुल्ली तेवढ्याच ताकदीने पुढे नेतील, याबाबत दुमत नाही. कुल्ली सरांना जसा मोठा विद्यार्थी मित्रपरिवार लाभला तसाच अरुणा यांनाही मोठ्या प्रमाणावर प्रगती वाचनालयाच्या माध्यमातून मित्रपरिवार, आप्तेष्ट, नातेवाईक लाभले. अरुणा यांनी काही महिन्यांपूर्वीच आपली जीवनकहाणी पुस्तक रूपाने लिहून पूर्ण केली होती. लवकरच प्रस्तावना लिहून त्या आत्मचरित्र प्रकाशित करणार होत्या. त्यांच्या हयातीत त्यांचे जीवनचरित्र प्रकाशित होणे, हे कदाचित नियतीला मान्य नसावे.

संत तुकाराम महाराज म्हणतात – तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे !! फार कमी व्यक्तींच्या मागे उत्तम कीर्ती उरते. अरुणा यांच्याबाबतीत त्यांच्यामागे उत्तम कीर्ती मोठ्या प्रमाणात उरली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या