धाव आणि हाव!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संशोधनाची पराकाष्ठा करून सुरू झालेली माणसाची अवकाशयात्रा आता पासष्टीच्या टप्प्यावर आहे. एवढय़ा वर्षांत आपण अनेक अंतराळी पराक्रम केले. त्यातल्या महत्त्वाचा ‘प्रोब’ किंवा प्रकल्पांची कालसुंसगत माहिती आपण घेऊच, परंतु या संशोधनातून विश्वाची रहस्यं उलगडायला जशी मदत झाली तशीच पृथ्वीपलीकडे डोकावल्यावर तिथून काहीतरी मिळवण्याची हावही माणसाच्या मनात निर्माण झाली. परग्रह पादाक्रांत करून तिथे वस्ती करण्याची स्वप्नं तर नेहमीच पाहिली जातात. येत्या दशक-दोन दशकांत प्रत्यक्षातही उतरतील. 2057 मध्ये पहिल्या अवकाश भ्रमणाची शताब्दी माणूस कदाचित मंगळावरही साजरी करेल.

ही धाव कौतुकास्पद आणि लक्षणीय खरीच, पण त्याचबरोबर आधी म्हटल्याप्रमाणे निर्माण झालेली ऐहिक सुखाची हावसुद्धा वाढीला लागेल. नव्हे, आताच तसे विचार अनेकांच्या मनात डोकावू लागले असतील. पृथ्वीवरच्या माणसाच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर त्याने सभोवताली आपल्याला हवे तसे बदल केले आहेत. अंतराळात पाऊल ठेवण्यापूर्वी त्याने पृथ्वीवरच्या नैसर्गिक संपत्तीचा धांडोळा घेण्यासाठी आकाश-पाताळ एक केलंय. रिमोट सेन्सिंगद्वारे पृथ्वीवरचे खनिजांचे, इंधनांचे आणि मौल्यवान धातूंचे साठे शोधून उत्खनन सुरूच आहे.

त्यातच नित्यनव्या संशोधनातून निर्माण होणाऱ्या यंत्रसामग्रीने जीवन सुखासीन बनविण्यासाठी आपण या नैसर्गिक स्रोतांचा अनिर्बंध वापर कधीच सुरू केला आहे. आधी जळाऊ लाकूड, मग दगडी कोळसा, नंतर खजिन तेल व वायू आणि त्याच्याद्वारे वीज निर्मितीचे प्रकल्प राबवण्यासाठी अधिकाधिक स्रोतांचा वापर असं हे चक्र आता इतकं वेगवान झालंय की, ते थांबवता येणं कठीण. तसं पाहिलं तर हा सारा वेग अवघ्या दीड-दोन शतकांतला असला आणि त्याने पृथ्वीवरच्या माणसाचं जीवन बरंच वेगवान केलं असलं तरी त्यापासून मिळणाऱ्या सुखाबरोबरच प्रचंड प्रदूषणाचं सावटही सबंध पृथ्वीवर पसरताना दिसतंय.

सोबत वॉर्मिंगबाबत मतभेद व्यक्त करणाऱ्यांनाही आता त्याचे चटके बसू लागलेत. अजून सूर्य दक्षिण गोलार्धावरून उत्तर गोलार्धावर तळपायला लागलेला नाही, परंतु त्याची चाहूल लागलेली असतानाच दिवसाचं तापमान मुंबईसारख्या शहरात 37 अंश सेल्सियसवर जाऊन पोचलंय. म्हणजे पुढे मे-जूनपर्यंतचा काळ कसा असेल पहा!

अशा नैसर्गिक संकटांशी मुकाबला करताना त्रस्त झालेला माणूस संयमी जीवनाकडे जायला मात्र फारसा तयार दिसत नाही. हवामान बदलाविषयी पुन्हा केव्हातरी जाणून घेऊच. कारण खगोलातल्याच पृथ्वीवरचा तो एक महत्त्वाचा भाग आहे.

मग उद्या पृथ्वीवरचं राहणं असहय़ झालं तर? इथले रिसोर्सेस (स्रोत) आपल्या ‘सुखा’साठी कमी पडू लागले तर? विज्ञानाचा आधार घेत त्यावर उत्तरं शोधली जातायत. त्यापैकी एक प्रकार म्हणजे पृथ्वीवरची खनिजं कमी पडत असतील तर ती ‘बाहेर’ शोधणे!

आता बाहेर म्हणजे कुठे तर अंतराळात इतस्ततः फिरणाऱ्या अशनी किंवा महापाषाणांच्या रचनेचा (कॉम्पॉझिशन) शोध घेऊन तिथे काही उपयुक्त धातू सापडतात का ते पाहणे. या अशा अंतराळी पाषाणांमध्ये एअरोलाइट हे आपल्याकडच्या अग्निजन्य खडकासारखे असतात. त्यात धातू (मेटल) नसतात. लोणार येथे कोसळलेला अशनी अशाच प्रकारचा होता.

दुसऱ्या सिडेरोलाइट प्रकारातील अशनीमध्ये काही भाग धातुजन्य असतो, तर सिडेरलाइट हे संपूर्ण धातूचे अशनी असतात. अशा अवकाशस्थ अशनींमधून सापडलेल्या धातूंचे काही काप (स्लाइस) आम्ही अहमदाबादच्या फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीला 1993 मध्ये भेट दिली तेव्हा पाहिले होते. चंद्रावरची मातीही संशोधनासाठी तिथे ठेवली होती.

…तर आता शोध होणार तो धातुजन्य अशनींचा आणि तोही आपली भूक भागविण्यासाठी. अंतराळात दीड लाख किलोमीटरवरून फिरणाऱ्या डेव्हिडा अशनीत निकेल, लोह, कोबाल्ट 15 टक्के, शिकोगोमध्येही हेच धातू 6 टक्के, ऍलॉडामध्ये साडेपाच टक्के लोह, तसंच टायोटिमा, पॅल्का अशा अशनींचा विचारही धातुसंपन्न म्हणून केला जातो.

हे अशनी आपण खोदकामाच्या सामानासह यानातून गाठू शकलो तर (आणि ते आता अवघड नाही) त्यावरच्या धातूंचे साठे पृथ्वीवर माणसाच्या उपयोगासाठी आणता येतील. ज्यांच्याकडे असं तंत्रज्ञान आहे त्या देशांनी यात आघाडी घेतली तर ते ‘श्रीमंत’ होतील. मुळात श्रीमंत असलेल्या धनाढय़ राष्ट्रांनाच हे परवडू शकेल. वास्तविक, अंतराळातील संपत्तीवर पृथ्वीवरच्या सर्वांचा समान हक्क असायला हवा, परंतु ‘बलवान’ बरोबरच असणार (माइट इज राइट) या स्वयंघोषित न्यायाने काही देश असे प्रयत्न करतीलही.

अंतराळातली माणसाची धाव आरंभी कुतूहलजन्य आणि निखळ वैज्ञानिक कर्तृत्वाची होती. आता हळूहळू त्याला कमर्शियल स्वरूप येणार. माणसाची हाव पूर्ण करायला अंतराळातली धाव किती मदतरूप ठरते ते पुढच्या अर्धशतकात दिसेलच.