ठसा : रंगनाथ तिवारी

235

>>प्रशांत गौतम<<

अंबाजोगाई येथील ज्येष्ठ हिंदी, मराठी  साहित्यिक रंगनाथ तिवारी यांना राज्य शासनाचा हिंदी सेवा पुरस्कार नुकताच घोषित झाला. हिंदी साहित्याच्या क्षेत्रात हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जातो. तिवारी यांना शुकवारी मुंबईत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. तिवारी यांची मातृभाषा हिंदी-मारवाडी असली तरी ते अस्सल मराठी भाषिक आहेत. मायबोली मराठीवर त्यांचे पहिले प्रेम आहे. कादंबरी, ऐतिहासिक कादंबरी, कथासंग्रह, नाटकं, समीक्षा आणि अनुवाद या क्षेत्रात त्यांनी लक्षणीय लेखक कार्य केले आहे. सोलापूर शहरात हिंदी-मारवाडी कुटुंबात जन्म झालेल्या तिवारी यांनी हिंदी याच विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले. आयुष्यभर हिंदीचे अध्यापन केले, पण मातृभाषा मराठीवरील प्रेम कायम ठेवत हिंदी भाषेप्रमाणेच मराठी भाषेतही विपुल प्रमाणात लेखन केले. ऐतिहासिक कादंबरीकार म्हणून त्यांनी मराठी साहित्यात आपली खास ओळख तर निर्माण केलीच आहे. बरेचसे मराठीत लेखन असले तरी त्यांनी महत्त्वाच्या कादंबऱ्या या हिंदीत लिहिल्या आहेत. मराठी-हिंदीतील महत्त्वाचे लेखन म्हणजे देवगिरी बिलावल, (नाटय़ रूपांतर), उत्तम पुरुष एकवचन, संपल्या सुरावटी, बेगम समरू, उत्तरायण, काया परकाया (नाटक), शून नलिनी ही एकांकिका, मौनाची महासमाधी (कथा संग्रह), सृजन, विमर्श (समीक्षा) लेखन, फ्रेंच कादंबरीचा ‘निशिगंधा’ नावाने केलेला मराठी अनुवाद, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या ‘बिढार’ कादंबरीचा हिंदीतील अनुवाद अशी तिवारी यांची दोन्ही भाषेतील साहित्य संपदा सांगता येते.

रंगनाथ तिवारी यांच्या ‘देवगिरी बिलावल’ या कादंबरीस देवगिरी आणि दिल्लीच्या राजवटीची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. कादंबरीच्या वाचनाचा आनंद घेतानाच संगीताची साथसंगत मिळते. युद्धाची पार्श्वभूमी स्पष्ट होताच इतिहासाचा ललित्यपूर्ण प्रत्यय वाचक घेऊ शकतात. क्षणोक्षणी वाचकांना खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य तिवारी यांच्या लेखनात दिसते. हैदराबाद मुक्तिसंग्रामाची पार्श्वभूमी लाभलेली त्यांची कादंबरी म्हणजे ‘उत्तम पुरुष एकवचन’चा उल्लेख करावा लागेल. हैदराबाद मुक्तिसंग्राम आणि त्या काळातील अस्सल मराठवाडी जनजीवन याचे प्रत्ययकारी मिश्रण ‘उत्तम पुरुष एक वचन’मध्ये दिसते. मराठवाडय़ाच्या इतिहासात हैदराबादचा मुक्तिलढा अविस्मरणीय समजला जातो. मुक्ती सैनिकांनी रझाकाराशी केलेला कडवा संघर्ष, दिलेली झुंज, रझाकारांनी मराठवाडय़ाच्या अनेक भागांत केलेले अन्याय, अत्याचार हे सांगत असताना तिवारी यांनी घटनाप्रधानतेस वगळले आणि त्या काळातील मराठवाडय़ातील लोकांचा लोकव्यवहार व सरंजामशाहीचे प्रभावी वर्णन केले. ‘संपल्या सुरावटी’ या कादंबरीत वाचकांना अप्रतिम अनुभव मिळतो. तिवारी यांची आणखी एक महत्त्वाची कादंबरी म्हणजे ‘बेगम समरू’ ही होय. हिंदुस्थानच्या इतिहासाने दुर्लक्षित केलेल्या नायिकेचं हे चित्रण तिवारी आपल्या कादंबरी लेखनात करतात. बेगम समरू ही लुत्फअली या घोडे व्यापाऱ्याची मुलगी. आयुष्यात तिने केलेला संघर्ष, सहन केलेले अपमान याचा वाचकाचे मन थक्क करणारा प्रवास तिवारी मांडतात. बेगम समरू इंग्रजांसोबत लढा देते. बेगम समरू क्रूर होती, मुत्सद्दी होती, स्वार्थी होती आणि ज्याच्याशी तिचा जीव जडला त्यावर बेहद्द प्रेम करणारी होती. बेगमच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलूंचे प्रत्ययकारी चित्रण ते आपल्या कादंबरी लेखनात करतात. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या आयुष्याच्या प्रवासावर आधारित हिंदी कादंबरी म्हणजे ‘उत्तरायण’ ही होय. टागोर यांच्या लोकांना माहीत नसलेल्या अनेक पैलूंवर तिवारी प्रकाश टाकतात. टागोरांच्या आयुष्यातील शेवटच्या दिवसावर ही कादंबरी बेतली आहे. एका असामान्य कवीची कादंबरी वाचकांना वेगळी दृष्टी देते. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखन डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या मराठीतील कादंबरीचा तिवारी यांनी हिंदी भाषेत अनुवाद केला. या कादंबरीत साठ-सत्तरच्या शतकात बहुजन समाजातील सुशिक्षित मराठी समाजातील तरुणांची होणारी कोंडी हिंदी अनुवादाच्या माध्यमातून त्या वाचकांसमोर प्रभावीपणे मांडतात. हिंदी-मराठीतील उल्लेखनीय लेखन योगदानासाठी तिवारी यांना उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार निर्मितीच्या चार राज्य पुरस्कारांसह भैरू रतन दमाणी, तुळसाबाई सोमाणी पुरस्कार तसेच बिढारच्या अनुवादासाठी केंद्रीय हिंदी निदेशालयाचा पुरस्कार प्राप्त झाला. यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, दिल्लीच्या हिंदी भवनचा पुरुषोत्तम दास टंडन स्मृती हिंदीरत्न असे विविध सन्मान, पुरस्कार लाभले. अंबाजोगाई येथे 2017 साली झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद तिवारी यांनी भूषवले. या सर्व साहित्य लेखन प्रवासात राज्य शासनाच्या हिंदी सेवा पुरस्काराची भर पडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या