
>> विवेक दिगंबर वैद्य
श्री तात महाराजांच्या सहवासाने बाळकृष्णांच्या नित्य आचारविचारामध्ये नकळतच आमूलाग्र बदल घडत होता. सद्गुरू सौख्यामुळे ते अनेकदा देहभान विसरून जात. बाळकृष्णांना पूर्णावस्था प्रदान करून पुढे तात महाराजांनी त्यांना विवाहबंधन स्वीकारण्याची संमती दिली. त्यायोगे बाळकृष्णांच्या आयुष्यात कमलामाता यांचे आगमन झाले. कालांतराने त्यांच्या संसारवेलीवर पुत्ररूपाने सौख्यही फुलून आले.
दरम्यान, बाळकृष्णांची चित्तवृत्ती झपाटय़ाने विरक्तीकडे वाटचाल करती झाली. गोकुळदास पाठशाळेत संस्कृत भाषेच्या अध्यापनाचे काम करीत असताना बाळकृष्णांनी मित्रांच्या संगतीने शेअर बाजारात सट्टावायद्याचे व्यवहार करणेही सुरू केले, मात्र काही व्यवहार फसले आणि त्यामुळे बसलेल्या जबरदस्त आर्थिक फटक्यातून सावरणे बाळकृष्णांना शक्य झाले नाही. पत्नीचे दागदागिने विकून आणि नोकरी गमावून ते कसेबसे या दुष्टचक्रातून बाहेर पडले, मात्र प्रपंच चालविण्यासाठी लागणारा उत्साह, ऊर्जा आणि उैर्मी पार धुळीला मिळाली.
बाळकृष्णांचा बराचसा काळ पूजाअर्चा, ध्यानधारणा यात जाऊ लागला. श्री तात महाराजांच्या कृपेने त्यांची स्वामिभक्ती व अष्टभावस्थिती पराकोटीला गेली की, त्यांचे देहभान वारंवार नाहीसे होत असे. त्यांना अष्टौप्रहर स्वामिनामाचा चाळा लागला. बाळकृष्णांना अशा अवस्थेत कमलामातांनी सावलीसारखी साथ दिली. प्रपंचातून बाहेर पडलेल्या पतीच्या आध्यात्माचा संसार कमलामातांनी एकनिष्ठतेने सांभाळला. त्यांची त्यागवृत्ती कसलीही उपमा देण्यापलीकडील आहे. बाळकृष्णांना सर्व सिद्धी प्राप्त झाल्या. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांचे संबोधन बाळकृष्ण ‘आजोबा’ असे करीत असत तर आध्यात्मिक गुरू तात महाराजांना ते पिता मानीत असत. त्यांचा हा मार्ग कमलामातांनी आनंदाने स्वीकारला. बाळकृष्ण स्वामी चरणी इतके लीन होत की, त्यांच्या केवळ नामोच्चाराने ते देहस्थिती विसरून बेभान होत आणि त्यांच्या डोळय़ांतून घळाघळा अश्रुधारा ओघळू लागत. दरम्यान, त्यांच्या मुखातून प्रकटणाऱया वचनांची सार्थकता त्यांच्यापाशी येणारे स्वामिभक्त अनुभवू लागले. बाळकृष्णांच्या सहज भाष्याला वाचासिद्धीचे बळ लाभले. ही प्रचीती अनेकांना अनेकदा लाभली आणि पाहता पाहता बाळकृष्णांचा उल्लेख ‘श्री बाळकृष्ण महाराज’ असा होऊ लागला. त्यांच्यापाशी कुणी प्रापंचिक जीव समस्या घेऊन आला की, ते सर्वप्रथम त्याला आजोबांच्या चरणांवर मस्तक ठेवण्यास सांगत असत. महाराज म्हणत, ‘आजोबांचे पायी हृदय गहिवरू दे. या क्षुद्र देहासाठी वेडा होतोस? अधीर होऊन रडतोस? मग देह जळाल्यावर काय करशील? हा देह प्रारब्ध भोगून संपवायला हवा. आपले देह दुःख भोगूनच संपविले पाहिजे. त्याशिवाय अन्य दुसरा मार्ग नाही.’
महाराजांचे अनेक भक्त श्रीमंत होते. त्यांची इच्छा, ‘महाराजांनी आपल्यासोबत राहावे, आपल्या संपत्तीच्या बळावर ध्यानधारणा आणि उपासना करावी अशी होती, मात्र महाराज या क्षुद्र मोहाला बळी पडले नाहीत. त्यांच्या परिपूर्ण अध्यात्म शक्तीचा उपयोग त्यांनी जनकल्याणासाठी केला. ते राजाधिराज योगीराज होते. त्यांच्या नकळत एखाद्या इसमाने गुप्त रीतीने जरी एखादा रुपया ठेवला तरी त्यांना ते खपत नसे. ते लगेचच ‘माझा बाप भिकारी नाही!’ असे म्हणत असत. एकदा त्र्यंबक धोत्रे नावाचे त्यांचे भक्त पुण्याहून निघाले. त्यांच्यासोबत सात-आठ मित्र होते. दादरला उतरून ते थेट महाराजांच्या मठात गेले. महाराज नेहमी देवघरात ध्यानस्थ बसत असत. समाधी उतरल्यावर त्यांना कपभर चहा लागत असे. त्यानुसार, कमलामातांनी चहाची व्यवस्था केली. इतक्यात धोत्रे आपल्या मित्रमंडळींसह मठात आले हे पाहून महाराजांनी कमलामातांना सर्वांसाठी चहा करावयास सांगितले. कमलामाता विचारात पडल्या. वेळ रात्रीची, त्यात सामग्रीही अपुरी. धोत्र्यांना ही गोष्ट जाणवली तेव्हा त्यांनी विचारले, ‘सामान आणू का?’ त्यावर कमलामाता म्हणाल्या, ‘नको नको. त्यांना हे खपणार नाही.’
तोवर ही गोष्ट महाराजांनीही जाणली आणि ते म्हणाले, ‘त्र्यंबक, इथे ये. तुझ्या आईला सांग, माझ्याकरिता जो चहा ठेवला आहे तो आणि सोबत दहा कप घेऊन ये.’ महाराजांची आज्ञा म्हणून कमलामातांनी एक कप चहा आणि दहा रिकामे कप धोत्र्यांच्या हातून बाहेर पाठवले. महाराजांनी क्षणभर डोळे झाकले आणि गळय़ातली रुद्राक्षाची माळ काढून चहाच्या किटलीला स्पर्श करून प्रत्येक कपात चहा ओतला. दहा कप भरले तेव्हा महाराज म्हणाले, ‘त्र्यंबक, यातील एक कप चहा तुझ्या आईला घेण्यास सांग.’ महाराजांच्या योगसामर्थ्याचे प्रचीती बळ पाहून सर्वजण थक्क झाले. हा चहा लाभला तो भक्तांसाठी, स्वतःसाठी किंवा प्रपंचासाठी, मात्र त्यांनी किमयेचा वापर कधी केला नाही. गृहस्थाश्रमी असूनही महाराज बाहेरील जगात संन्यस्त वृत्तीने वागत असत. वैराग्यपूर्ण जीवन जगणाऱया बाळकृष्ण महाराजांना त्यांच्या साध्वी स्त्रीने सावलीप्रमाणे साथ दिली. श्री स्वामी समर्थ हे त्यांचे सर्वस्व होते. श्री स्वामींनी अक्कलकोटच्या वटवृक्षावर ठेवलेला लाकडी पलंग आणि पादुका स्वप्नदृष्टांताद्वारे तिथे बोलावून घेत सुपूर्द केल्या.
कमलामाता यांनी एकदा मुलाच्या भविष्याकरिता थोडे सोनेनाणे सुरत येथील घरात सुरक्षित ठेवल्याचे समजल्यावर महाराजांनी तिथे जाऊन तिजोरी रिकामी केली आणि होती नव्हती ती संपत्ती नदीच्या पाण्यात विसर्जित केली. याच सुमारास श्री बाळकृष्ण महाराजांना स्वामी समर्थांच्या नित्य दर्शनाची आस लागली. श्री बाळकृष्ण महाराजांची विरक्ती दिवसेंदिवस वाढत होती आणि अध्यात्मातील परमोच्च अवस्था ओलांडून ते पार पुढे निघून गेले होते. दादर आणि सुरत मठ व्यवस्थितरीत्या कार्यान्वित झाला. मुलाचा, बाबू महाराजांचा विवाहही झाला. पत्नी पद्मामातांसह ते आजोबांची सेवा उत्तमप्रकारे करीत होते. तेव्हा देह त्यागण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याचे सर्वांना सांगून महाराज सन 1918 मध्ये अंतिम प्रवासाला जाण्याविषयीचे भाष्य करू लागले. वैशाख वद्य एकादशी बुधवार शके 1840
(5 जून 1918) महाराज म्हणाले, ‘दोरी तुटलेली आहे.’ सर्वजण जमा झाले तेव्हा महाराज जवळच्या आरामखुर्चीवर बसले आणि आपल्या छातीवर हात ठेवून ‘ओ तात, ओ तात, ओ तात’ असे तीन वेळेला म्हणाले आणि सूर्योदयाच्या सुमारास श्री बाळकृष्ण महाराज स्वामी आजोबांच्या चरणी कायमचे लीन झाले.
(उत्तरार्ध समाप्त)
[email protected]

























































