गोव्यातील बांगलादेशी घुसखोरी!

ब्रिगेडियर हेमंत महाजन

[email protected]

अभिनेत्री आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूमुळे गोव्यामधील अफू, गांजा, चरसचा गैरवापर चव्हाटय़ावर आला. गोव्यामधली गुन्हेगारी काही काळापुरता चर्चेचा विषय बनते आणि गोव्याची ओळख आता नाकाx टुरिझम हॉटस्पॉट म्हणून झाली आहे. या गैरव्यवहारांमध्ये याआधी नायजेरियन व रशियन गुन्हेगारी टोळ्या सक्रिय होत्या. आता त्यातच भर म्हणून बांगलादेशी घुसखोरी गोव्यामध्ये किती उघडपणे सक्रिय झाली आहे हेदेखील समोर येत आहे .
गोव्यातील मडगाव आणि वास्को रेल्वे स्टेशनवर दर दिवशी रेल्वेने मजुरांचे पूर्ण कुटुंबासह तांडेच्या तांडे उतरतात, ज्यामध्ये अनेक बांगलादेशी असतात, पण कोणाचेही तिकडे लक्ष नाही. गोव्याच्या सीमेवर बसेसमधून येणाऱया संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवण्याकरिता कुठलीही यंत्रणा नाही. गोवा पोलिसांनी बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढण्याची मोहीम गेल्या दोन महिन्यांपासून आरंभली आहे. गोव्याच्या अंतर्भागामध्ये जे छापे मारले गेले, त्यात पकडले गेलेले बांगलादेशी गेली बारा वर्षे गोव्यात वास्तव्य करून असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोवा पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने आतापर्यंत 22 बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेतले आहे. हे घुसखोर खोटय़ा आधारकार्डाच्या सहाय्याने गोव्यात निरनिराळे व्यवसाय करून वास्तव्य करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिलाल अन्वर आखोन हा बांगलादेशी नागरिक गेल्या 12 वर्षांपासून वाळपई परिसरात वास्तव्यास आहे. तो भंगार गोळा करण्याचे काम करतो. ताब्यात घेतलेला अन्वर हसन हा दोन वर्षांतून एकदा बांगलादेशला भेट देतो. हसन चांद नियान याने चार वर्षांपूर्वी बांगलादेशला भेट दिली होती. स्थानिक राष्ट्रद्रोहींचे सहाय्य आणि प्रशासनातील भ्रष्टाचार या गोष्टीच कारणीभूत आहेत. त्यांच्याजवळ हिंदुस्थानी नागरिकांची ओळख असलेली आधारकार्डे आहेत, पॅनकार्डे आहेत आणि येथील मतदार याद्यांमध्येही त्यांची नावे नोंदवलेली आहेत. यांना असे राजरोस हिंदुस्थानी नागरिक बनविण्याचे कर्म केले कोणी? त्यांना आधारकार्डे कशी मिळाली? पॅनकार्डे कशी मिळाली? मतदार याद्यांमध्ये या लोकांचा समावेश कसा झाला?

तिस्क-उसगाव येथे पॅनरा आणि एचडीएफसी या बँकांची एटीएम यंत्रे पह्डण्यामध्ये बांगलादेशी टोळी सक्रिय असल्याचे अन्वेषणात उघड झाले. प्लॅस्टिक आणि भंगार गोळा करण्याचा बहाणा करून हे घुसखोर स्थानिकांच्या खोल्यांमध्ये भाडय़ाने राहतात. मात्र स्थानिक पोलिसांना याची पुसटशी कल्पनाही कशी नसते, असा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे. यांना स्थानिक मुसलमान किंवा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांसारख्या दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या संघटना सहाय्य करत आहेत का, याचेही अन्वेषण पोलिसांनी करावे.

गोव्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बांगलादेशी घुसखोरांना हिंदुस्थानबाहेर हाकलून द्यावे, संपूर्ण गोव्यात बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेण्यात यावा. बांगलादेशी घुसखोर आढळल्यास त्यांना स्थानबद्ध करण्याऐवजी त्यांची कायद्याचे उल्लंघन केल्याने कारागृहात रवानगी करावी आणि बांगलादेशी घुसखोरांसाठी बनावट कागदपत्रे सिद्ध करणाऱया दलालांवरही कठोर कारवाई करावी. गोव्यात आजवर विदेशी माफियांचा सुळसुळाट होता. शिक्षणाच्या नावाखाली आफ्रिकी देशांतून, विशेषतः नायजेरियातून येऊन राहिलेल्या तरुणांच्या माध्यमातून अमली पदार्थांचा मोठा व्यवहार चालत आला. वेळोवेळी छाप्यांमध्ये असे अनेक नायजेरियन नागरिक सापडत असूनही सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. महामार्ग रोखण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती.

रशियन माफिया तर गोव्याच्या किनारपट्टीमध्ये स्थानिक नागरिकांच्या नावाने व्यवसाय थाटून बसले. त्या व्यवसायांच्या आडून नानाविध गैरधंदे चालत असल्याचे राजरोस दिसत असूनही त्यांची परतपाठवणी करण्याचे जेवढे प्रयत्न व्हायला हवे होते ते कधी झालेले नाहीत. मध्यंतरी गोव्यातील सिक्युरिटी एजन्सींमध्ये काम करण्याच्या बहाण्याने ईशान्येतील असंख्य नक्षलवादी येथे आश्रयाला असल्याचे ईशान्येच्या पोलिसांनी येथे छापे टाकले तेव्हा आढळून आले. त्यानंतर तरीही सरकारने व विशेषतः पोलीस यंत्रणेने येथील बेकायदेशीर वास्तव्याचा विषय गांभीर्याने घेतला गेला नाही. त्यामुळे आज गोवा म्हणजे अमली पदार्थांचा राजरोस सुळसुळाट असलेले मोठे पेंद्र बनले आहे. आंध्र, तेलंगणापर्यंत अमली पदार्थ गोव्यातूनच पुरवले जातात. एवढी आज राज्याची अपकीर्ती झालेली आहे.

प्रश्न केवळ येथील बेकायदेशीर वास्तव्याचा नाही. अमली पदार्थ व्यवहारापासून दहशतवादापर्यंतच्या देशविघातक गैरकृत्यांसाठी ही राजरोस आश्रयस्थाने बनू शकतात आणि त्यातून आपल्या राष्ट्रीय सुरक्षेलाच मोठा धोका पोहोचू शकतो. वाढती गुन्हेगारी असो वा असे गैरधंदे असोत, त्यांच्या मुळापर्यंत जायचे असेल तर येथे बाहेरून येऊन वास्तव्य करणाऱयांवर आधी करडी नजर ठेवणे गरजेचे आहे. या परप्रांतीयांना, विदेशींना आश्रय स्थानिक नागरिकच देतात. केवळ पैशांच्या लोभाने कोणतीही खातरजमा न करता, पोलिसांना अंधारात ठेवून असे भाडेकरू ठेवणाऱयांवर फौजदारी गुन्हे नोंदवले गेले पाहिजेत.

सध्या जे छापे टाकले गेले आहेत, त्यांच्या कागदपत्रांच्या निर्मितीमागे कोणते आश्रयदाते होते? कोणत्याही देशविघातक, समाजविघातक कृत्यांना वेळीच रोखायचे असेल तर त्याच्या मुळाशी घाव घालणे जरुरीचे असते. एखादी विषवल्ली पह्फावते व समाजाला वेढते ती काही एकाएकी वर चढलेली नसते. टप्प्याटप्प्यानेच तिचा विस्तार झालेला असतो. वर्षानुवर्षे तिने मुळे धरलेली असतात. गोव्यातील बेकायदेशीर वास्तव्याच्या बाबतीतही असेच आहे. छोटय़ाशा प्रदेशाला गैरकृत्यांचे आगर बनू द्यायचे नसेल तर अशा विषवल्लीची वेळीच छाटणी गरजेची असेल. रोहिंग्यांपासून रशियनांपर्यंत कोणीही यातून सुटता नये. त्यासाठी नागरिकांची सजगताही महत्त्वाची असेल आणि पोलिसांची सक्रियताही. मुख्य म्हणजे स्थानिक राजकारण्यांनी आपल्या मतपेढय़ांखातर अशा बाह्य प्रवृत्तीला येथे आश्रय देऊ नये. बांगलादेशमधून होणारी घुसखोरी थांबवण्याकरिता नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर किती महत्त्वाचे आहे याची देशाला पुनः पुन्हा जाणीव होते. मात्र या रजिस्टरची केव्हा अंमलबजावणी केली जाईल?