लेख – बँक कर्मचाऱ्यांचा रखडलेला प्रश्न

>> नितीन रेगे

बँक कर्मचाऱ्यांच्या रखडलेल्या वेतनवाढीच्या प्रश्नासाठी एक व दोन दिवसांचे संप करून दबाव निर्माण होत नाही. कारण आज बँकेच्या बाहेर रोख रक्कम काढण्यासाठी आणि भरण्यासाठी तसेच धनादेश जमा करण्यासाठी मशीन्स उपलब्ध आहेत. त्याशिवाय नेट बँकिंगसारख्या सुविधा ग्राहकांना सोयिस्कर असल्यामुळे तात्पुरत्या संपाचा बँकांच्या सेवेवर परिणाम होत नाहीवास्तविक यापेक्षा अधिक वेगळे आणि परिणामकारक आंदोलन करण्याची आवश्यकता आहे.

आज सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कर्मचारी भरतीला वेसण घातली गेली आहे. अपुरा कर्मचारी वर्ग, कामाचा वाढता ताण, ग्राहकांच्या वाढत्या अपेक्षा याचे ओझे कर्मचाऱ्यांच्या शिरावर आहे. खंडेलवाल समितीच्या शिफारसी सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या व्यवस्थापनाने स्वीकारल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भरतीवर व अन्य अनेक बाबींवर बंधने आली आहेत. या सर्व परिस्थितीतही बँक कर्मचारी आपल्या परीने काम करीत आहे. असे असतानाही बँकांचा दहावा वेतन करार संपून जवळपास दोन वर्षे झाली तरी अकरावा द्विपक्ष करार दृष्टिपथात येत नाही ही बँक कर्मचाऱ्यांची खंत आहे. इंडियन बँक असोसिएशन करत असलेल्या दिरंगाईबद्दल व देत असलेल्या तुटपुंज्या पगारवाढीबद्दल कर्मचाऱ्यांच्या मनात नाराजी आहे.

दै. ‘सामना’मध्ये (29 ऑगस्ट) या विषयासंदर्भात प्रसिद्ध झालेल्या लेखात बँक कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना योग्य वाचा फोडली आहे. सातवा वेतन आयोग आणि बँक कर्मचाऱ्यांचे वेतन यातील तफावत लेखकाने योग्य पद्धतीने मांडली आहे. शिवाय नऊ संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या युनायटेड फोरमचा प्रभाव पडत नाही, हे मागील दोन झालेल्या वेतनवाढीचा करार व सध्याची जवळपास दोन वर्षे रखडलेला 11 व्या वेतनवाढीचा करार यावरून स्पष्ट होत आहे असा उल्लेख या लेखात करण्यात आला आहे. हे सत्य आहे. याचा विचार युनायटेड फोरमचे पदाधिकारी तसेच त्या त्या संघटनांचे सभासद असणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांनी करणे आवश्यक आहे. कारण इंडियन बँक असोसिएशन सोबत वेतनवाढीची चर्चा करणारे या नऊ कर्मचारी संघटनांचे बहुतांश पदाधिकारी हे निवृत्त असून गेली अनेक वर्षे वेतनवाढीच्या चर्चेसाठी इंडियन बँक असोसिएशन सोबत बसतात. हीच या वेतनवाढीची शोकांतिका आहे. नवीन अभ्यासू पिढी निर्माण करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, त्याच्या हातात सूत्रे देणे या गोष्टी टाळल्या गेल्या आहेत. युनायटेड फोरममध्ये राजकीय पक्षाशी संलग्नित नऊ संघटना आहेत. मात्र या संघटनांव्यतिरिक्त बँक कर्मचारी सेना महासंघ ही शिवसेनाप्रणीत कर्मचारी संघटनादेखील कार्यरत आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने 4 एप्रिल 1991 रोजी बँक कर्मचारी सेना या बँकिंग क्षेत्रातील शिवसेनेच्या नोंदणीकृत कर्मचारी संघटनेची स्थापना बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये झाली. यानंतर अन्य बँकांमध्ये संघटनेचा प्रसार होऊन 1995 मध्ये शिवसेनाप्रणीत ‘बँक कर्मचारी सेना महासंघा’ची स्थापना झाली.

बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या करारातील चर्चेत बँक कर्मचारी महासंघाला सहभागी करून घ्यावे म्हणून महासंघाने इंडियन बँक असोसिएशनविरुद्ध प्रचंड लढा दिला, आंदोलने केली. परिणामी इंडियन बँक असोसिएशनला बँक कर्मचारी सेना महासंघाला बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या चर्चेला निमंत्रित करावे लागले. त्यानंतरही प्रत्येक चर्चेत महासंघ सहभागी होत आला आहे. सध्या बँकांची जी परिस्थिती झाली आहे त्यास कोणत्याही बँकेचा सर्वसामान्य कर्मचारी अजिबात जबाबदार नाही. माझ्या मते या विलंबास पुढील कारणे जबाबदार आहेत.

निवृत्त कामगार नेते वर्षानुवर्षे इंडियन बँक असोसिएशनबरोबर चर्चा करण्यासाठी बसत आहेत हे त्याचे प्रमुख कारण आहे. या निवृत्त नेत्यांना सध्या बँकेत काम करीत असलेल्या बँक कर्मचाऱ्यांच्या अडचणीची, कामाच्या ताणाची व अपेक्षांची जाणीव नाही. दुसरे म्हणजे एक व दोन दिवसांचे संप करून दबाव निर्माण होत नाही. कारण आज बँकेच्या बाहेर रोख रक्कम काढण्यासाठी आणि भरण्यासाठी तसेच धनादेश जमा करण्यासाठी मशीन्स उपलब्ध आहेत. त्याशिवाय नेट बँकिंगसारख्या सुविधा ग्राहकांना सोयिस्कर असल्यामुळे तात्पुरत्या संपाचा बँकांच्या सेवेवर परिणाम होत नाही.  वास्तविक यापेक्षा अधिक वेगळे आणि परिणामकारक आंदोलन करण्याची आवश्यकता आहे.

सातव्या वेतन करारापासून बँक कर्मचारी सेना महासंघ हा इंडियन बँक असोसिएशनविरुद्ध वेतनवाढीची चर्चा करत आहे. वास्तविक बँकिंग क्षेत्रातील सर्व कर्मचारी संघटनांनी इंडियन बँक असोसिएशनविरुद्ध एकत्रित लढा देणे आवश्यक आहे. बँक कर्मचारी सेना महासंघापेक्षा कमी सभासद असलेल्या संघटनांना या फोरममध्ये सामील करून घेतले गेले. फोरमची ही भूमिका अनाकलनीय आहे. आज बँक कर्मचाऱ्यांवर कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव नाही तर कम्युनिस्ट नेत्यांचा प्रभाव आहे. या संघटनांना ‘शिवसेना’ या शब्दाचे बहुधा वावडे असावे. म्हणून त्यांनी बँक कर्मचारी सेना महासंघाला फोरममध्ये सामील करून घेण्यास कायमच विरोध केला. बँक कर्मचारी सेना महासंघानेही वेळीच त्यांची चाल ओळखून स्वतंत्रपणे खिंड लढवून बँक कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे. पुढेही हा प्रयत्न सुरूच राहील.

आपली प्रतिक्रिया द्या