लेख : ठसा : भालचंद्र दिवाडकर

74

>> राजेश पाटील

पत्रकारिता हे आसिधारा व्रत म्हणून जपणारे, अफाट वाचन, अभ्यास आणि परिश्रमाच्या जोरावर दैनिक ‘सागर’चा एकखांबी तंबू बनलेले कार्यकारी संपादक भालचंद्र ऊर्फ अरुण दिवाडकर यांच्या निधनाने कोकणातील पत्रकारितेचा एन्सायक्लोपीडिया हरपला आहे.

मुंबई-पुण्यासारख्या शहरांत वृत्तपत्रांच्या कार्यालयात बातम्या मिळवण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या अत्याधुनिक यंत्रणा, कार्यालयांतील अद्ययावत ग्रंथालयांमध्ये एका क्षणात उपलब्ध होणारे संदर्भग्रंथ आणि अपवाद सोडला तर काही तासांची डय़ुटी अशा पार्श्वभूमीवर चिपळूणसारख्या ग्रामीण भागात परिस्थितीशी जुळवून घेत भालचंद्र दिवाडकर यांनी दैनिक ‘सागर’च्या मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्र अशा पाच आवृत्त्यांची जबाबदारी लीलया सांभाळली

 निशिकांत ऊर्फ नाना जोशी यांनी सर्वसामान्यांच्या मनाला भिडणारी लिखाणाची शैली आणि बातम्यातील सच्चेपणाच्या जोरावर दैनिक लोकप्रिय केले. चिपळूणच्याच महाविद्यालयात शिक्षण घेणारे दिवाडकर कॉलेजमधील एक बातमी प्रसिद्ध करण्यासाठी नानांना भेटले आणि त्या दिवसापासूनच ते रुजू झाले. सकाळी कॉलेज आणि त्यानंतर रात्री उशिरापर्यंत काम. त्यांचे अफाट वाचन, कोणताही विषय मांडण्यासाठी त्याचा अभ्यास आणि परिश्रम करण्याची तयारी असलेल्या दिवाडकरांना नाना जोशी यांनी मुक्तहस्ते काम करण्याची संधी दिली आणि त्यांनी ती सार्थ ठरवली. गेल्या 40 वर्षांपासून दैनिक ‘सागर’ हे त्यांचे कुटुंबच बनले. सकाळी 10 वाजता कार्यालयात येऊन बसलेले दिवाडकर रात्री स्थानिक आवृत्ती प्रिंटिंगला जाईपर्यंत कधी 12 तर कधी 1 वाजेपर्यंत ठाण मांडून बसलेले असत. ‘सकाळी छापलेल्या पेपरच्या संध्याकाळी चिंध्या व्हायला हव्यात’ हे त्यांचं आवडतं वाक्य. पत्रकारितेत नव्याने आलेल्या मुलांना हे वाक्य ते हमखास सल्ला म्हणून सांगत. सकाळी 4-5 रुपयांना घेतलेला पेपर संध्याकाळी 10 रुपये किलो रद्दी भावात जातो. संध्याकाळी पेपर रद्दीत घालण्याऐवजी त्यातील राजकीय, सामाजिक, आंतरराष्ट्रीय, सांस्कृतिक बातम्या संदर्भ म्हणून कापून त्याचे वेगवेगळे फोल्डर बनवा. हे संदर्भ पत्रकारिता करताना तुम्हाला तारतील आणि दैनिक ‘सकाळ’चे संस्थापक संपादक नानासाहेब परुळेकर यांचा हा मंत्र मी वयाच्या 62 व्या वर्षीही पाळतो असे ते आवर्जून सांगत.

मुंबईतील वृत्तपत्रांनी ग्रामीण भागात त्यांच्या आवृत्त्या सुरू केल्या. त्यांच्या वेबसाईट सुरू झाल्या. ‘सागर’सारख्या ग्रामीण भागांतील वृत्तपत्रांसमोर मोठे आव्हान उभे राहिले, पण तरीही आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय ते लोकल अशा महत्त्वाच्या बातम्या चुकल्या असे कधी झाले नाही ते दिवाडकरांमुळेच.

कोकणातील पाणी, शेती, उद्योगधंदे, पर्यटन अशा अनेक विषयांवर त्यांच्या ‘पडछाया’ या स्तंभातून मुद्देसूद मांडणी केली. कोकणात येऊ घातलेल्या रासायनिक कारखानदारीच्या दुष्परिणामांवर सर्वाधिक लिखाण त्यांनी केले. जितका त्यांचा समाजवाद, कम्युनिझमचा अभ्यास होता तितकेच हिंदुत्ववादी अभ्यासावरही प्रभुत्व होते. शोधपत्रकारिता हा त्यांचा आवडीचा विषय होता. चिपळूणसारख्या ग्रामीण भागात राहूनही जागतिक घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून त्याची पडछाया वर्तमानपत्रात उमटवणारे दिवाडकर म्हणजे एक फिलॉसॉफरच होते. अलीकडेच नोव्हेंबरमध्ये दहा दिवस ते छत्तीसगडला नक्षल भागात गेले. नक्षलवादी या विचाराकडे ओढले जाणारे तरुण, त्यांच्या समस्या, नक्षलवाद्यांचे अड्डे यावर त्यांनी लिहिलेली लेखमाला गाजली.

या दौऱ्यानंतर दिवाडकरांची प्रकृती खालावली. त्यांच्या मेंदूत गाठ असल्याचा रिपोर्ट आला. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू झाले, पण त्यांचे सगळे लक्ष चिपळूणकडे लागले होते.  पुन्हा चिपळुणात जाऊन नव्या ताकदीने काम सुरू करेन असे ते भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगत, पण त्यांच्यावर काळाने मात केली. दिवाडकरांच्या निधनाने व्यासंगी पत्रकार आणि कोकणातील एक विचारवंत गमावला.

 

आपली प्रतिक्रिया द्या