
आयुष्याचा प्रवास करता करता कुठल्या तरी वळणावर अशी काही माणसे भेटतात की, जी आपल्या कर्तृत्वाने, वागण्याने आपल्यावर प्रभाव टाकतात आणि ही अजनबी, अनोळखी माणसे नंतर आपले कायमचे मित्र बनतात. आठवडय़ातून एकदोन वार प्रवास करणे, तोही पब्लिक ट्रान्सपोर्टने, बेस्टने, एसटीने हा कित्येक वर्षांचा छंद. बऱयाच वेळा पायी फिरतो. अशासाठी की, आपला देश कुठे चाललाय ते कळतं. असाच एकदा रत्नागिरी जिह्यात राजापूरला गेलो होतो. त्यावेळी इंटरनेट वगैरे म्हणजे ई-मेल हा प्रकार नव्हता. त्यामुळे कामे करण्यासाठी परतणे गरजेचे होते, पण राजापूरहून मुंबईला येण्यासाठी असणाऱया एसटी बसेस अगोदर बुकिंग झाल्यामुळे फुल होत्या, भरलेल्या होत्या. आता काय करावं म्हणून मी राजापूरला डेपो मॅनेजरना भेटायला गेलो. भास्कर कुरतडकर त्यांचे नाव. त्यांचं ऑफिस मला शोधावं लागलं. कारण जिथे डेपो मॅनेजर बसतात, तिथे ते बसले नव्हते. मला एका कर्मचाऱयाने मार्ग सांगितला. म्हणाला, गाण्याचा आवाज येईल ते साहेबांचे ऑफिस. निघालो तर दुरूनच मोहम्मद रफी, मुकेश, लता, आशा यांची द्वंद्वगीते ऐकू येत होती. माझाही मूड पालटला. पाहिलं तर आजूबाजूला मेकॅनिक यंत्रे, त्यामध्येच डेपो मॅनेजर भास्कर कुरतडकर बसले आहेत.
प्रत्येकाची अडचण सोडविण्यासाठी तत्पर असलेले भास्कर कुरतडकर…ज्या ज्या मराठी चित्रपटाचे शूटिंग कोकणात जिथे जिथे झालंय, तिथे जाऊन भेटी देणारा, छायाचित्रे काढणारा रसिक अधिकारी. भास्कर कुरतडकर ज्या ज्या एसटी आगारात गेले, तिथला त्यांनी चांगला कायापालट केला. सणासुदीला गर्दी असते. त्यामुळे एसटी कर्मचाऱयांना रजा नसते. त्यांना सणासुदीचा आनंद घेता यावा म्हणून ते जिथे काम करतात तिथे गणपती, दिवाळी, नवरात्र, शिमगा असे सण छोटय़ा छोटय़ा प्रमाणात चालू केले. दिवाळीला कंदील, पणत्या, सनई वादन लावून छान वातावरण निर्मिती करीत. मी त्यांना भेटायला त्यानंतर अनेक वेळा गेलो, त्या त्या वेळी हा अनुभव घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱयांना काम करताना उत्साह आणि हुरूप येई. एसटी बिघडू नये, तंदुरुस्त राहावी, स्वच्छ राहावी, वेळेवर सुटावी यासाठी असलेले कर्मचारी कमी असतात. म्हणून त्यांनी युक्ती लढवली. 50-60 बसेस प्रत्येक कर्मचाऱयाला दिल्या. सांगितले…एकेका बसची काळजी निगा तुम्ही घ्यायची. परत दुसऱयांवर जबाबदारी टाकून ते दूर झाले नाहीत. स्वतः जातीने दोन बस स्वच्छ करीत, दुरुस्त करीत.
आजूबाजूला फेकल्या जाणाऱया बाटल्या, पाकिटे गोळा करून परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांनी एका माणसाची नियुक्ती केली. 50-60 बसेस धुवायला दोन-पाचच कर्मचारी असतात. अशा वेळी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्या बस धुवायला सुरुवात केली. कर्मचाऱयांनीही त्यांना साथ दिली. हां हां म्हणता बस स्थानक स्वच्छ, टापटीप, नीटनेटके, सुंदर झाले आणि स्वच्छता अभियानचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. एसटी कर्मचाऱयांचे आरोग्य नीट राहावे म्हणून त्यांनी कर्मचाऱयांसाठी योगाचे वर्ग चालू केले. दिवाळीला रांगोळी, सावधतेने फटाके वाजविण्यास परवानगी दिली. अशासाठी की, जेणेकरून कर्मचाऱयांना दिवाळीचा आनंद लुटता यावा, त्यांचंही मन प्रसन्न व्हावं. ‘स्नेहबंध’ नावाचा एक कार्यक्रम आयोजित केला. या स्नेहसंमेलनात एसटी कर्मचारी एकत्र येत. त्यांचं कुटुंब एकत्र येई. एक जवळिकीचे नाते तयार होई.
इतर लोक बसने फिरतात. एसटी कर्मचाऱयांनाही त्यांच्या कुटुंबीयांना फिरता यावं म्हणून त्यांनी कोकणातील पर्यटनस्थळे बघण्यासाठी पॅकेज टूर आयोजित केली. त्यामध्ये कर्मचाऱयांव्यतिरिक्त इतर प्रवाशांना फक्त चारशे रुपयांत जेवण, नास्ता, चहा आणि प्रवास करू दिला जात असे.
प्रवाशांना आपल्या तक्रारी कुठे कराव्यात हे कळत नसतं. त्यासाठी त्यांनी बस स्थानकात तक्रार पेटी ठेवली. नुसती ठेवली नाही, तर त्यातील तक्रारींची लगेच दखल घेतली जात असे. त्यामुळे प्रवाशांमध्ये विश्वासाचे नाते तयार झाले.
प्रवासी एसटीच्या वेळेअगोदर बस स्थानकात येतात तेव्हा त्यांची करमणूक व्हावी म्हणून चंद्रशेखर सिनकर या मित्राकडून देणगी मिळवून त्यांनी बस स्थानकात रंगीत टीव्ही बसविले. माझा ठाण्याला एकपात्री कार्यक्रम होता. त्यासाठी आवर्जून आले. प्रशासकीय कामाबद्दल आपले गैरसमज असतात, पण अपवाद म्हणून असे कार्यक्षम अधिकारी जीवन प्रवासात भेटतात, जे आपला प्रशासनाबद्दलचा आदर वाढवतात. प्रशासन कर्मचारी आणि प्रवासी यांच्यामधला पूल बनतात आणि एसटीचे ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीदवाक्य खरे ठरवितात.
- संजय मिस्त्री



























































