आभाळमाया – अवाढव्य तारे

>> वैश्विक

आपल्याला खूपच मोठा वाटणारा, पृथ्वीच्या 109 पटीने आकाराचा सूर्य तारा अति महत्त्वाचा आहे यात शंकाच नाही, परंतु एकूण विश्वाचा विचार करता आपला हा तारा अगदी सामान्य म्हणावा लागेल इतका लहान आहे. सूर्यापेक्षा पैक पटींनी मोठे तारे आपल्याला रात्रीच्या अवकाशात दिसतात. दिवसा दिसणारा एकमेव तारा मात्र सूर्यच!

परंतु सूर्यापेक्षा कितीतरी मोठे तारे विश्वात असणारच. आपल्याला म्हणजे अभ्यासकांना त्यातल्या अनेक ताऱ्यांची तपशीलवार माहिती असते. नेहमीच्या आकाश दर्शनात दिसणारे काही काही अंधुक आणि काही केवळ शक्तीशाली दुर्बिणीतूनच दिसतील असे आकाराने मोठे तारे लक्षावधी असतील. त्यातील निवडक पाच परिचित ताऱ्यांचा हा त्रोटक परिचय. एक गोष्ट लक्षात ठेवायची, विज्ञानात नवा शोध लागला की, जुना मागे पडतो हे खरं, पण त्याचं महत्त्व कमी होत नाही. नवा पुरावा समोर आला की, जुन्याचं महत्त्व सांगणाऱ्यांचे परिश्रम मान्य करून नव्याचं स्वागत करतो तो वैज्ञानिक दृष्टिकोन. कारण त्या त्या काळातलं संशोधन ही त्या काळाची संसाधनांची मर्यादा असते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे टॉलेमी यांनी सारं विश्व पृथ्वीभोवती फिरतं असं म्हटलं, तर कोपर्निकस यांना ते सूर्याभोवती फिरणारं वाटलं. आज या दोन्ही संकल्पना मागे पडून विराट दृश्य विश्वाचं स्वरूप आपल्याला बऱ्यापैकी समजलंय. अर्थात यातही काही बदल संभवतात. तसेच काहीसं यूव्ही स्कटी आणि स्टीफन्सन स्टारबद्दल झालं, पण त्यापूर्वी आपल्याला ठाऊक असलेल्या विशाल ताऱ्यांपैकी काही ताऱ्यांचा मागोवा घेऊया.

एका लेखात आपण वृश्चिक राशीचं चित्र पाहिलेलं आठवत असेल तर त्यात अनुराधाच्या तीन ठळक ताऱ्यांच्या नक्षत्रानंतर मध्ये कंठमण्यासारखा लालसर ज्येष्ठा नक्षत्राचा तारा दिसतो. इंग्लिशमध्ये त्याला ‘अॅन्टॅरेस’ असं म्हटलं जातं. कोणत्याही क्षणी विस्फोट होऊन तेजोमेघात रूपांतरित होण्याचे जे ‘उमेदवार’ (कॅन्डिडेट) तारे आहेत, त्यात या ज्येष्ठाचं महत्त्व ज्येष्ठत्वाने आहे खरं. आता आकाराच्या बाबतीत हा तारा सूर्याच्या 700 पटीहून मोठा आहे. म्हणजे त्याची त्रिज्या सूर्याच्या त्रिज्येच्या सातशे पट असणार. त्याचा व्यास सुमारे 97 कोटी किलोमीटर आहे, तर सूर्याचा फक्त 14 लाख किलोमीटर. अॅन्टॅरेस पिंवा ज्येष्ठा हा वृश्चिक (स्कॉर्पिअस) तारकासमूहातला सर्वात तेजस्वी तारा. तो आपल्यापासून 605 प्रकाशवर्षे अंतरावर आहे.

आणखी एक असाच ‘रेड जायन्ट’ पिंवा महारक्तवर्णी तारा म्हणजे मृग या प्रसिद्ध तारकासमूहाच्या बीट्ल ज्यूज किंवा काक्षी हा रूपविकारी तेजस्वी तारा. ज्ञात तारामंडळात नवव्या क्रमांकाची तेजस्वीता बाळगून आहे. त्याचा व्यास सूर्याच्या 550 पट पिंवा 770 कोटी किलोमीटर एवढा असून तो मृग नक्षत्रात अगदी ठळकपणे दिसतो. त्याचे वस्तुमान मात्र सूर्याचा अवघे 20 पट असल्याने त्याच्या आकारमानाच्या तुलनेत तो कृत्रिम निर्वात पोकळी निर्माण केल्यागत विरळ आहे. आपल्यापासून सुमारे 430 प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या बीट्ल ज्यूजचे तेजोमेघात रूपांतर झाले की, ते आपल्याला 430 वर्षांनी समजेल किंवा तेवढय़ाच वर्षांपूर्वी तसं घडलं असेल तर आता या क्षणी लक्षात येईल.

मृगातच दुसरा महाकाय तारा आहे, त्याचं नाव ‘रिगेल’ किंवा ‘राजन्य’. ही दोन ताऱ्यांची जोडगोळी किंवा ‘बायनरी स्टार सिस्टिम’ आहे. राजन्यचा व्यास सूर्याच्या 50 पट आहे, तर त्याची दीप्ती (ल्युमिनॉसिटी) सूर्याच्या 57 हजार पट आहे.

आता विश्वातल्या सर्वात मोठय़ा दोन ज्ञात ताऱ्यांबद्दल. गेली अनेक वर्षे आम्ही स्कटम किंवा ‘ढाल’ तारकासमूहातला ‘यूव्ही स्कटी’ हा तारा विश्वातला सर्वात मोठा तारा असल्याचं समजत होतो. त्याची त्रिज्या सूर्याच्या 1700 पट असून धनु तारकासमूहाच्या उत्तरेला हा तारकासमूह एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये रात्रभर आकाशात दिसतो. त्याने अवकाशाचा सुमारे 110 चौरस अंश एवढा भाग व्यापलेला आहे. सध्या मात्र अमेरिकेतील चार्ल्स स्टीफन्सन यांनी 1990 मध्ये शोधलेला एका खुल्या तारकागुच्छातील (ओपन स्टार क्लस्टर) स्टीफन्सन यांच्याच नावाच्या महामहाताऱ्याची त्रिज्या सूर्याच्या 2150 पट असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे त्याने आकाराने महाताऱ्यांच्या स्पर्धेत ‘स्कटी’ला मागे टाकलंय. यापुढे कोणी व्यावसायिक पिंवा हौशी आकाश निरीक्षकाने विश्वाचा धांडोळा घेताना यापेक्षाही मोठा तारा शोधला तर हा ताराही पिछाडीवर जाईल. अशी निकोप स्पर्धा वैज्ञानिक माहितीत भर टाकते. इथे पुणाचा पराजयसुद्धा दुसऱ्याच्या विजयाचं द्योतक असल्याने महत्त्वाचा ठरतो. पुढच्या पायऱ्यांची चढण अनुभवताना मागे पडलेल्या पहिल्या पायरीचं महत्त्व कमी होत नाही, तसेच हे आहे.

[email protected]