दखल – अनुभवसिद्ध कार्यपद्धती

>> जीवन मुळे

सध्या भारतात आत्मनिर्भरतेचे वारे जोरात वाहत आहेत. प्रत्येक जण विशेषत तरुण पिढी याबाबत अधिक सजग झालेली दिसते. प्रस्थापित उद्योग-व्यावसायिकांनाही या ज्ञान-कौशल्याची व्यवसाय विकासासाठी आवश्यकता आहे. अनेक बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक आणि उद्योजक रँडी कर्क यांनी लिहिलेले व सुनीती काणे यांनी अनुवादित केलेले ‘इलॉन मस्क’ हे पुस्तक आपल्या व्यवसायात यशस्वी होण्याची इच्छा बाळगणाऱया प्रत्येक व्यक्तीला या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो. कारण या पुस्तकात जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क याच्या अनुभवसिद्ध कार्यपद्धतींची तपशीलवार माहिती उपलब्ध आहे.

स्पेसएक्स आणि टेस्ला या जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार बनवणाऱया कंपनीचा संस्थापक एलॉन मस्क याचे नाव आज सर्वांना परिचयाचे झाले आहे. कारण जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती होण्याचा बहुमान त्याला नव्या वर्षात प्राप्त झाला आहे, परंतु ‘आजच्या जगातील सर्वात प्रभावशाली द्रष्टा उद्योजक’ हीच त्याची खरी ओळख आहे. त्याची उद्योजकीय कार्यपद्धती आणि त्यामागची तत्त्वे नीटपणे जाणून घेतली व त्याची तंतोतंत प्रभावी अंमलबजावणी केली तर आपल्या उद्योग-व्यवसायात यशस्वी होणे व्यावसायिकांना शक्य आहे.

या पुस्तकामध्ये यशस्वी उद्योग उभारण्यासाठी आवश्यक असणारी आणि एलॉन मस्क याने प्रत्यक्षात उपयोगात आणलेली सोळा गुणतत्त्वे विस्ताराने समजावून सांगितली आहेत. जिज्ञासा (कुतूहल), चिकाटी, सर्जनशीलता, विश्लेषण क्षमता, आऊट ऑफ बॉक्स थिंकिंग, नेतृत्वगुण, जोखीम घेण्याची पात्रता, गुणवत्तेचा आग्रह, सुधारणा सातत्य, इत्यादी गुणक्षमता प्रत्येक उद्योजकाने मिळवायला हव्यात, असे मस्क याचे प्रामाणिक मत आहे. या संकल्पनांमागील तत्त्वांचे पाठबळ, उपयोगिता याबाबतही वेळोवेळी त्याने केलेले मार्गदर्शन उपलब्ध आहे. त्याची कार्यपद्धतीही लक्षणीय आहे. यशापयशाविषयी त्याच्या धारणा सुस्पष्ट आहेत. ‘प्रत्येक अपयश मला धडा शिकवून गेले आणि असे धडे शिकल्यावाचून यश मिळाले नसते.’ या वाक्यातून मस्कची वैचारिक बैठक आणि यशस्वितेच्या संकल्पना किती प्रगल्भ आहेत याची प्रचीती येते.

एलॉन मस्क

लेखक ः रँडी कर्क, अनुवाद ः सुनीती काणे

प्रकाशक ः साकेत प्रकाशन, औरंगाबाद n मूल्य ः 250 रुपये.