हत्तींवरून पेटलेले वाक्युद्ध!

बोत्सवानाचे राष्ट्राध्यक्ष मोक्ग्वेतसी मेस्सी यांनी जर्मनीमध्ये 20 हजार हत्ती धाडण्याची धमकी दिली आहे. ही जगावेगळी धमकी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. बोत्सवानामध्ये असलेली हत्तींच्या शिकारीची कायदेशीर परवानगी, त्यातून होणारी हत्तींच्या हत्या, त्याविरोधात जर्मनी आणि इंग्लंडमध्ये निर्माण झालेले वातावरण हे या वाक्युद्धाचे मूळ आहे. तसेच बोत्सवानासारख्या देशाची आर्थिक मजबुरीदेखील त्यातून समोर आली आहे. ही धमकी सांकेतिकच ठरणार आहे. फक्त बोत्सवानाच्या राष्ट्राध्यक्षांनी लक्ष वेधून घेण्यासाठी ही धमकी दिली हे उघड आहे.

जगात सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात युद्धाची ठिणगी केव्हाही पडेल अशी स्थिती आहे. त्याचवेळी बोत्सवाना आणि जर्मनी यांच्यात एका भलत्याच विषयावरून वाक्युध्द पेटले आहे. बोत्सवानाच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या देशातील जंगली हत्तींना जर्मनीत पाठवण्याची धमकी दिली आहे. ही एक प्रकारची आगळीवेगळी जैविक हल्ल्याचीच धमकी म्हणता येईल. अर्थात ही धमकी सांकेतिकच ठरणार आहे; कारण जर्मनी आणि बोत्सवानाचे अंतर बघता ते अशक्यच आहे. बोत्सवानाची होणारी आर्थिक कुचंबणा ही जगासमोर यावी इतकाच राष्ट्राध्यक्ष मेस्सी यांचा उद्देश स्पष्ट आहे. हत्तींच्या शिकारीवर बोत्सवानाचा उदरनिर्वाह मोठय़ा प्रमाणात अवलंबून आहे. इंग्लंड, जर्मनी आणि पाश्चिमात्य देशांतून मोठय़ा प्रमाणात पर्यटक बोत्सवाना येथे हत्तींच्या शिकारीला कायदेशीर मान्यता असल्याने आपले शौर्य दाखवण्यासाठी जात असतात. हजारो डॉलर, पाऊंड, युरो खर्च करून पाश्चिमात्य देशातील कृत्रिम शिकारी हत्तींची शिकार करून हत्तींचे शिर मायदेशी घेऊन येतात. एका हत्तीच्या शिकारीसाठी हे पर्यटक 50 हजार डॉलर खर्च करतात. 2022 मध्ये बोत्सवानाला तब्बल 5 दशलक्ष डॉलरचे उत्पन्न शिकारीतून प्राप्त झाले.

भौगोलिक प्रदेश
बोत्सवाना हा दक्षिण आफ्रिकेतील एक लहानसा देश. त्याचे एकूण क्षेत्रफळ 581,730 चौरस कि.मी. त्यातील 70 टक्के भाग हा वाळवंटाने व्यापलेला. दक्षिण आफ्रिकेतील एकूण पाच देश बोत्सवाना, नामिबिया, लेसोथो, स्वाझीलँड आणि दक्षिण आफ्रिका मिळून एकूण हत्तींची संख्या 2 लाख 30 हजार. त्यापैकी एकटय़ा बोत्सवानात हत्तींची संख्या ही 1 लाख 30 हजार इतकी प्रचंड आहे. बोत्सवानाची एकूण लोकसंख्या 26.3 लाख. बोत्सवानाची लोकसंख्या घनता ही केवळ 3.4 टक्के आहे. जगातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेल्या देशांच्या यादीत बोत्सवानाची गणना होते. 1966 पर्यंत इंग्रजांची वसाहत असलेल्या बोत्सवानाने लहानसा देश असूनही केलेली प्रगती दखल घेण्याजोगी आहे. बोत्सवानाच्या एकूण क्षेत्रफाळाच्या 40 टक्के भूभाग हा वनक्षेत्र म्हणून राखीव असल्याने पर्यटक मोठय़ा प्रमाणात इथे भेट देतात. आफ्रिकेतील सर्वाधिक हत्तींची लोकसंख्या, हिऱयांची सर्वात श्रीमंत ज्वानेंग खाण असलेला देश आणि दुसरीकडे एड्सग्रस्तांची मोठय़ा प्रमाणात संख्या असलेला बोत्सवाना एकाच वेळी प्रसिध्द आणि कुप्रसिध्द आहे.

हत्तींच्या शिकारीवर जर्मनी आणि इंग्लंड
2014 ते 2019 या दरम्यान बोत्सवानाने हत्तींची शिकार आणि त्यांचे शिर पर्यटकांना मायदेशी नेण्यास बंदी घातली होती. स्थानिकांच्या दबावामुळे 2019 साली बोत्सवाना सरकारने ही बंदी उठवली आणि पुन्हा एकदा शिकारीच्या खेळाला सुरुवात झाली. त्याच दरम्यान अनेक वन्यजीव संस्थांनी यावर आक्षेप नोंदवले. अनेक अभ्यासपूर्ण अहवाल जाहीर झाले. बोत्सवानातून शिकार झालेल्या हत्तींचे सर्वाधिक शिर आणणारा जर्मनी असल्याचे निष्पन्न झाले आणि जर्मनीत याविरोधात मोठा दबाव गट निर्माण झाला. 2022 सालापासून या विरोधात चर्चा सुरू झाल्या. या वर्षाच्या सुरुवातीला जर्मनीच्या पर्यावरण मंत्रालयाने शिकार झालेल्या हत्तींचे शिर जर्मनीत आणण्यावर निर्बंध लादण्याची गरज असल्याचे मत प्रदर्शित केले. इंग्लंडमध्ये तर 2019 सालच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या जाहीरनाम्यात कन्झर्व्हेटिव्ह पक्षाने हत्तींच्या शिकारींचे शिर देशात आणण्यावर बंदी घालण्याचे जाहीर केले. इंग्लंडच्या संसदेत त्यावर चर्चा आणि मतदानसुध्दा झाले. परंतु काही सुधारणा करण्याच्या दृष्टीने त्या विधेयकाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यावेळी बोत्सवानाच्या वन्यजीव मंत्र्यांनी लंडनच्या हाईड पार्कला दहा हजार हत्ती पाठवण्याचा इशारा दिला होता.

बोत्सवानाकडून प्रत्युत्तर
बोत्सवानाकडून वार्षिक 300 हत्तींच्या शिकारीचा पर्यटकांना परवाना दिला जातो. बोत्सवाना सरकारच्या मते त्यांना प्राप्त अहवाल आणि शिफारसीनुसार 400 हत्तींची शिकार करणे व्यवहार्य आहे. बोत्सवाना प्रशासनाकडून त्यापेक्षा कमी म्हणजे केवळ 300 हत्तींच्या शिकारीलाच मान्यता आहे, जी हत्तींच्या एकूण संख्येच्या 0.3 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. उलट हत्तींच्या शिकारीपेक्षा हत्तींच्या प्रजननाचे प्रमाण कित्येक पटीने अधिक असल्याचा बोत्सवानाचा युक्तिवाद आहे. मोठय़ा प्रमाणात हत्तींचे वास्तव्य हे बोत्सवानाच्या नागरिकांसाठी धोकादायक ठरू लागले आहे. हत्तींचे कळप हे शेती, मालमत्ता याचे प्रचंड प्रमाणात नुकसान करीत असल्याने हत्तींची शिकार केल्यास काही प्रमाणात त्यांची संख्या नियंत्रणात येते. जर्मनी आणि इंग्लंडच्या शिकारीच्या शिराबाबतचा संभवित निर्णय हा दोन देशांनी बोत्सवानाच्या अंतर्गत बाबींवर केलेले अतिक्रमण ठरेल. या देशांना जर हत्तींच्या प्रति इतकी सहानुभूती असल्यास आम्ही त्यांच्या देशात हत्ती पाठवतो. त्यांनी हत्तींच्या सहवासात वास्तव्य करावे, असे बोत्सवानाकडून प्रत्युत्तर देण्यात आले.

बोत्सवाना, जर्मनी आणि इंग्लंड यांच्यात हत्तींवरून सुरू असलेले वाक्युध्द बघता इंग्लंड आणि जर्मनी हे फार तर शिकार केल्यावर हत्तीचे शिर मायदेशी आणण्यापासून आपल्या देशातील नागरिकांना प्रतिबंध घालू शकतात. बोत्सवानाला पर्यटन करण्यास बंदी अथवा त्या देशात जाऊन शिकारीला प्रतिबंध या निर्णयाप्रत ही दोन राष्ट्रे येतील याची शक्यता फार कमी आहे. फार तर बोत्सवानाचा हत्तींचे शिर मायदेशी नेण्याचा महसूल तेवढा कमी होण्याची शक्यता यातून दिसते. बोत्सवानाचे राष्ट्राध्यक्ष मेस्सी आणि पर्यावरण मंत्री यांनी अनुक्रमे जर्मनी आणि इंग्लंडला हत्ती पाठवण्याचा इशारा दिला असला तरी तो प्रत्यक्षात येणे निव्वळ अशक्य आहे. म्हणजे पोकळ म्हणावा असाच आहे. फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी हे विधान केले इतकेच म्हणता येईल. कारण जर्मनी- इंग्लंडने आपल्या देशात कुठले कायदे करावे हासुध्दा त्यांचा अंतर्गत
विषय आहे, याची जाणीव बोत्सवानाच्या राष्ट्राध्यक्षांनादेखील असेलच!