ठसा – कॅप्टन आनंद जयराम बोडस

प्राचीन विमानशास्त्राचे अभ्यासक, व्याख्याते, लेखक अशी कॅप्टन डॉ. आनंद जयराम बोडस यांची ओळख होती. कॅप्टन बोडस यांनी 33 वर्षे वैमानिक म्हणून नोकरी केली. ते मुंबई फ्लाइंग क्लबच्या पायलट ट्रेनिंग सेंटरचे प्रमुख होते. प्रॅक्टिकल आणि थिअरी असे दोन्ही विषय ते शिकवायचे. याव्यतिरिक्त कॅप्टन बोडस हे नॅचरोपॅथीचे डॉक्टर होते. त्यांनी नॅचरोपॅथीची पदवी संपादन केली होती. साठ वर्षे मुंबईत वास्तव्य केल्यानंतर ते गेल्या दीड वर्षापासून नाशिक येथे वास्तव्यास होते. 2015 साली मुंबईत 102 व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत कॅप्टन बोडस यांचा प्राचीन व पौराणिक काळातील विज्ञान या विषयावरील परिसंवाद गाजला होता. त्यामध्ये कॅप्टन बोडस यांनी दावा केला होता की, विमानाचा शोध राईट बंधूंनी नव्हे तर सात हजार वर्षांपूर्वीच हिंदुस्थानींनी लावला होता. जगातले पहिले विमान महर्षी भारद्वाज ऋषींनी तयार केले होते. एवढेच नव्हे तर ऋषी भारद्वाज यांनी या विषयावर बरीच पुस्तके लिहिली आहेत. रडारपासून वैमानिकांचा आहार, गणवेश कसा असावा, याबाबतची माहिती ग्रंथात दिली आहे, असा दावा बोडस यांनी केला होता. त्यांच्या दाव्यानंतर सायन्स काँग्रेसला वादाची किनार लाभली होती. अनेकांनी त्यांच्या वक्तव्याचे समर्थन केले तर अनेकांनी विरोध. मात्र या सगळ्यांचा वेदांमध्ये उल्लेख असल्याचे सांगत कॅप्टन बोडस आपल्या विधानांवर ठाम राहिले होते. विमानातून किल्ले दर्शन हा कॅप्टन आनंद बोडस यांनी राबवलेला अनोखा उपक्रम होता. अनेक वयस्कर लोकांना इच्छा असूनही किल्ले चढणे जाणे शक्य नसते. त्यांना विमानातून किल्ले दाखवायचे ही संकल्पना बोडस यांची होती. या उपक्रमाचे खूप कौतुक झाले.

मराठीत ’विमान’ या विषयावर लिहिणारे एकमेव व्यक्ती म्हणजे कॅप्टन बोडस. इंग्लिशमध्ये ’विमान’ या विषयावर अनेकांनी लिहिले आहे, पण ते मराठीत लोकांना कळावे म्हणून कॅप्टन बोडस यांनी दैनिक ’सामना’ मधून लेखमाला लिहायला सुरुवात केली. ‘विमानगाथा’ हे त्यांचे पहिले पुस्तक. या पुस्तकाला सी.डी. देशमुख यांच्या नावाचा राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे. ‘प्राचीन भारतीय विमानशास्त्र’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. विमानशास्त्र या विषयाप्रमाणे कॅप्टन बोडस यांचा दासबोधाचा प्रचंड अभ्यास होता. रामदास स्वामी हे त्यांचे दैवत. बोडस यांनी ‘श्रीमत दासबोध- द एनलायटनिंग बाय रामदास स्वामी’ हे इंग्रजी पुस्तक लिहिलंय. परदेशात या ग्रंथाचा खूप खप झाला. लोकांना रामदास स्वामी म्हटले की, मनाचे श्लोक आणि दासबोध एवढंच माहीत असतं. याव्यतिरिक्तही रामदास स्वामी यांचे साहित्य आहे. यासंदर्भात कॅप्टन बोडस यांनी समर्थ संदेश, समर्थ शिकवण आणि समर्थ विचार ही तीन पुस्तके लिहिली आहेत. रामदास स्वामींच्या अप्रकाशित साहित्यावर आधारित ही पुस्तके आहेत.

’सावरकरांची तिसरी जन्मठेप’ हे त्यांचे आणखी एक महत्त्वाचे पुस्तक. कॅप्टन बोडस यांचे म्हणणे असायचे की, ब्रिटीश सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांना दोन जन्मठेप दिल्या. तिसरी जन्मठेप त्यांना आपल्याच सरकारने दिली. आपल्या सरकारला सावरकर कळले नाही. याशिवाय ’गणपती अथर्वशीर्ष आणि विज्ञान’ हे छोटेखानी पुस्तकही वेगळे आहे. अथर्वशीर्ष हे फक्त पूजापाठ, श्लोक असे नाही, तर त्यात संपूर्ण विज्ञान आहे. हे उलगडून सांगण्याचे काम कॅप्टन बोडस यांनी या पुस्तकाद्वारे केले आहे. ’चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचे प्रणेते आचार्य वराहमिहिर’ या पुस्तकाचे लेखनही असेच वेगळे आहे.

कॅप्टन बोडस यांचे अखेरच्या दिवसापर्यंत लेखन सुरू होते. गेल्या वर्षीच त्यांचे ‘थोर नाटककार आचार्य अत्रे’ हे पुस्तक प्रकाशित झाले. याशिवाय त्यांच्या लेखमालाही सुरू होत्या. त्यांच्या निधनाने प्राचीन विमानशास्त्राचे गाढे अभ्यासक, विज्ञाननिष्ठ लेखक, विचारवंत हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या