वेब न्यूज -कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजी

>> स्पायडरमॅन

‘ग्लोबल वार्मिंग’ ही सध्या संपूर्ण जगाला भेडसावणारी समस्या आहे. कार्बन वायूचे उत्सर्जन हा यातील सर्वात गंभीर असा भाग आहे. सध्या जगभरात कार्बन वायूचे उत्सर्जन कमी करण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत आणि नियमदेखील आखले जात आहेत. अशातच ‘कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजी’वर सर्वोत्तम तंत्रज्ञान शोधणाऱ्या व्यक्तीसाठी जगातील सर्वात श्रीमंत अशा एका व्यक्तीनं अर्थात टेस्ला आणि स्पेस एक्स कंपनीचे सर्वेसर्वा असलेल्या एलॉन मस्क यांनी तब्बल 10 कोटी डॉलर्स अर्थात 730 कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर केला आहे.

सध्या कार्बन वायूचे उत्सर्जन रोखण्यासाठी जगभरातील मोठय़ा मोठय़ा कंपन्या आणि गिरण्यांना प्रोत्साहित केले जात आहे. आजकाल यासाठी मोठय़ा उत्पादन कंपन्या, गिरण्या आणि पॉवर प्लँटमधून उत्सर्जित होणाऱ्या कार्बन डाय ऑक्साइडला वातावरणात मिसळण्याआधीच गोळा केला जाते आणि एका वेगळ्या ठिकाणी साठवले जाते, ज्यामुळे प्रदूषणाला आवर घातला जातो. यासाठी कार्बन डाय ऑक्साइड बाहेर टाकणाऱ्या या चिमण्यांवर सॉल्व्हेंट फिल्टर लावले जातात. त्यानंतर या कार्बनला साठवून, जमिनीत खोल भागात, जिथून जीवाश्म इंधन मिळते तिथे साठवले जाते. जोडीलाच याचा उपयोग प्लॅस्टिक बनविण्यासाठी, ग्रीन हाऊसमधील झाडे वाढवण्यासाठी आणि कार्बोनेट पेय बनवण्यासाठीदेखील केला जातो.

हे सर्व जरी असले, तरी सध्या वायुमंडळात अर्थात आपल्या अवतीभोवती, अवकाशात जो कार्बन डाय ऑक्साइड आधीपासून साठलेला आहे, त्याचे काय? त्या कार्बनला वातावरणातून शोषून घेऊन हवा शुद्ध करण्याच्या तंत्रज्ञानासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत आणि अशाच ‘कार्बन कॅप्चर टेक्नॉलॉजी’साठी एलॉन मस्क यांनी हा पुरस्कार जाहीर केला आहे. ‘इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी’च्या एका अहवालानुसार गेल्या वर्षी कार्बन उत्सर्जनात मोठय़ा प्रमाणात वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या वातावरण प्रदूषित करणाऱ्या सर्वच प्रकारच्या वायूंचे प्रमाण इतके खाली आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत की, ते नैसर्गिकरीत्या वृक्ष, माती आणि महासागर यांच्याद्वारे शोषले जातील आणि वातावरण शुद्ध राहील.