गाणी नवी-जुनी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>डॉ. संजीवनी चव्हाण, अंधेरी

संगीत… मनास आनंद देणारं… सुखावणारं… शांतवणारं… संगीत न आवडणारा माणूस विरळाच. आपले आजी-आजोबा तर दर्जेदार गाणी ऐकत, अनुभवत इथवर पोहचलेले… आज अनेक आजी-आजोबा केवळ गाणी ऐकण्यासाठी मोबाईल, टॅब वापरायचा कसा हे शिकून घेतात. पाहूया आजी-आजोबांना आजची गाणी आवडतात, की त्यांचे मन अजून जुन्यातच रमते…

radio0

जुन्याची मजा औरच!

नव्या गाण्यांपेक्षा मला जुनी गाणी चांगली वाटतात. सगळीच जुनी गाणी आवडतात. पण आता फारसं लक्षात राहत नाहीत. त्यामुळे जास्त कोणतं आवडतं ते सांगता येणार नाही. पण वाजवल्यानंतर आठवते. काही दिवसांपूर्वीच एक संगीत कार्यक्रम पाहिला होता. तेव्हा सगळीच माझ्या आवडीची गाणी त्यात ते गायक-गायिका गात होते. खूप मजा आली. जुन्या गाण्यांची मजाच काही और असते. नवीन सिनेमे आता बघतच नाही. म्हणजे मला ते बघावेसेच वाटत नाहीत. वेगवेगळ्या चॅनेल्सवर त्या सिनेमांच्या जाहिराती येत असतात. त्यातली गाणी दाखवत असतात. ती इतकी कंटाळवाणी असतात की तो नवा सिनेमा पाहावासाच वाटत नाही. ‘सैराट’मधलं एक गाणं आहे. त्यावर तरुण नाचत असतात. ते मलाही खूप आवडतं. बाकी सगळी गाणी लक्षातही राहिलेली नाही.

>>प्रभाकर कानजी, मीरा रोड

जुनी गाणी ऐकताना समाधान मिळतं

जुनी गाणी, लता मंगेशकरची गाणी आवडतात. जुन्या गाण्यांत चांगले विचार, संस्कार असायचे. अलीकडची भक्तीगीतं असली पाहिजेत. आजच्या सिनेमातली गाणी लक्षातच राहात नाही. जुन्या गाणी ऐकताना समाधान वाटतं. ती गाणी शांत आणि कधीही ऐकावीत अशी असायचं. पूर्वीची गाणी कर्णमधुर होती. म्हणूनच ती आजही आपण लक्षात ठेवून गातो. त्या गाण्यांमुळे आपल्याला समाधान मिळतं.

>>सीता बेलोसे, पाली

जुन्या गाण्यांत हरवतो

जुनी गाणी आवडतात. कारण जुन्या गाण्यांना काहीतरी अर्थ असतो. ती नुसती ऐकतच राहावीशी वाटतात. ती ऐकता ऐकता छान झोपही लागते. त्यामुळे जुन्या गाण्यांमध्ये मी हरवून जातो. मी वारकरी नसलो तरी पांडुरंगाचा भक्त आहे. त्यामुळे पांडुरंगाची सगळी भक्तीगीतं आवडतात. त्यातही ‘रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साजणी’ हे गाणं मला खूपच आवडतं. ही अशी पारंपारीक आणि भक्तीगीतं जास्त आवडतात. मोहम्मद रफी, किशोर कुमार यांच्या गाण्यांची मजा कमीच होत नाही. किशोरकुमार, मोहम्मद रफी यांची गाणी ऐकताना गुंग जातो. या दोघांची खूप गाणी माझ्या मोबाईलमध्ये मी साठवून ठेवली आहेत. दुपारच्या वेळी निवांतपणा मिळाला की ती ऐकत असतो. जुन्या गाण्यांमध्ये गेयता होती. आताच्या गाण्यांमध्ये अर्थ, शब्द यांचं त्यांना जणू देणंघेणंच नाही. जुनी व नवी गाणी यांच्यात फरक करायचा तर सांगेन की जुनी गाणी, त्यातली वाद्ये, त्यात काव्य होतं.

>>दत्ताराम कदम, जोगेश्वरी

जुनं संगीत हृदयाला भिडतं

मराठी- हिंदी जुन्या गाण्यांमधली शब्दरचना, त्यातलं संगीत, शब्दरचना आणि गाण्यातील भाव फारच ताकदवान आहे. हृदयाला भिडणारं आणि मनाला निर्भेळ आनंद देणारं आहे त्यामुळे मला ही गाणी प्रचंड आवडतात. ही गाणी हृदयाला भिडणारं आहेत, म्हणूनच ती अजून टिकलेली आहेत आणि युगानुयुगं टिकतील. जुन्या गाण्यांमध्ये मोहम्मद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, सुमन कल्याणपूर, वाणी जयराम यांनी गायलेली गाणी मला आवडतात. ‘ए मेरे दिले नादान’, ‘इशारों इशारों में ही दिल लेनेवाले’, ‘मधुबन में राधिका’, ‘लागा चुनरी में दाग’, ‘दीवाना हुआ बादल’, ‘वक्त ने किया क्या हसीं सितम’ ही काही जुनी गाणी तसेच ‘निगाहे मिलाने को दिल चाहता है’ ही अशा गझल मला खूप आवडतात. मराठी गाण्यांमध्ये भावगीतं, ‘तुला पाहते रे’, ‘महाराष्ट्र गीत’, ‘रात्रीस खेळ चाले’, ‘आला आला वारा’, ‘सांज ये गोकुळी’, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘गगन सदन तेजोमेय’, ‘जांभुळ पिकल्या झाडाखाली’, ‘मी कात टाकली’ अशी काही गाणी मी ऐकते. गायकांमधील भावामुळे ती हृदयाला आनंद देतात. नवीन गाणी म्हणजे निसटतं संगीत झालंय. उडती गाणी काही महिनेच टिकतात. त्यानंतर विस्मृतीत जातात. थोडा काळ टिकली की त्यांचं अस्तित्व संपतं. नवीन सिनेमांमध्ये ‘कटय़ार काळजात घुसली’, ‘बाजीराव मस्तानी’ यामधली शास्त्र्ााrय-उपाशास्त्र्ााrय संगीतावर आधारित गाणी, सुरेश भट यांच्या गझला मला आवडतात.