लेख – समाजमाध्यमांसाठी केंद्राची नवी नियमावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
social-media

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन 

हिंदुस्थान सरकारने माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया नीतिशास्त्र) नियमांमध्ये बदल केले आहेत. सुधारित नियमांनुसार, ट्विटर, फेसबुक, यूटय़ूब आणि इन्स्टाग्राम या समाज माध्यमांना राज्यघटनेतील तरतुदी आणि देशाच्या सार्वभौमत्वाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असेल. अधिकृत राजपत्रात माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) सुधारणा नियम, 2022 प्रकाशित करण्यात आले आहेत. नव्याने लागू केलेल्या नियम 3 अ द्वारे दुरुस्ती, तक्रार अपील समिती स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

केंद्राने स्वतःकडे समाजमाध्यम प्लॅटफॉर्मना वापरकर्त्यांच्या तक्रारींवर काही विवादास्पद सामग्री काढून टाकण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी निर्देशित करण्याचा अधिकारदेखील घेतला आहे. नवीन नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीने वादग्रस्त मजकूर होस्ट करण्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या निर्णयाविरोधात तक्रार केल्यास तो आता सरकारच्या समितीकडे अपील दाखल करू शकतो. नवीन नियमांमध्ये वापरकर्ते अश्लील सामग्री, ट्रेडमार्क उल्लंघन, बनावट माहिती आणि राष्ट्राच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणारी कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही आक्षेपार्ह धार्मिक सामग्री (हिंसा भडकवण्याच्या उद्देशाने) हटविण्यासाठी त्यास फ्लॅग करू शकतात. त्यानंतर संबंधित समाज माध्यमांनी 24 तासांच्या आत वापरकर्त्याच्या तक्रारी स्वीकारण्याची आणि त्यानंतर 15 दिवसांच्या आत त्यांचे निराकरण करण्याची आणि अहवाल दिल्यानंतर 72 तासांच्या आत काही विवादास्पद सामग्री काढून टाकण्याची तरतूद देण्यात आली आहे.

समाजमाध्यमांचे पेव हिंदुस्थानात 2005च्या सुमाराम पसरायला सुरुवात झाली. समाजमाध्यमे आज प्रत्येकाच्या जीवनाचाच एक मूलभूत भाग बनली आहेत. अगदी कामांपासून ते मित्रांपर्यंत सगळे काही सध्या समाजमाध्यमांच्या अवतीभवती फिरताना दिसते. हिंदुस्थानसारख्या 125 कोटींपर्यंत लोकसंख्या पोहोचलेल्या देशामध्ये जानेवारी 2021पर्यंतच्या केलेल्या सर्वेक्षणानुसार, 79.1 टक्के जनतेकडे मोबाईल आहेत, तर 45.3 टक्के मोबाईल वापरणाऱ्यांकडे इंटरनेटची सुविधा उपलब्ध असून त्यातील 32.3 टक्के लोक हे या समाजमाध्यमांचा वापर करताना दिसतात. टाळेबंदीच्या काळामध्ये म्हणजेच जानेवारी 2020 ते जानेवारी 2021 या काळात समाजमाध्यमे वापरणाऱ्यांमध्ये 78 दशलक्ष वापरकर्त्यांची वाढ नोंदवण्यात आहे.

समाज माध्यमे आणि गोपनीयता जगभरातच ऐरणीवर

केंद्र सरकारची नवी नियमावली म्हणजे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेचा भंग होत असल्याचा दावा काही करतात. समाजमाध्यमे आणि गोपनीयता हा सध्या जगभरातच ऐरणीवर असलेला विषय आहे. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम ही सध्याची आघाडीची आणि सर्वाधिक वापरकर्ते असलेली समाज माध्यमे आहेत. जगासह हिंदुस्थानातही त्यांचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो. त्यांचा समाजात एवढा प्रभाव निर्माण झाला आहे की, त्यांच्याशिवाय आता पान हलत नाही. त्यामुळे सर्वच लाईक, डिसलाईक, ट्विट, रिट्विट, शेअर यामध्ये अडकले आहेत. अनेकांना तर समाजमाध्यमांद्वारे सामाजिक क्रांती वगैरे घडविता येणे शक्य आहे, असेही वाटते. असे असले तरीही हा सर्व खेळ आहे तो माहितीचा. कारण, समाज माध्यम वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची माहिती या कंपन्यांकडे आहे. त्यामुळे तुम्ही ‘गुगल’ या ‘सर्च इंजिन’वर एखाद्या गोष्टीची माहिती घेतल्यास लगेच तुमचे फेसबुक, इन्स्टाग्राम यावर त्याविषयीच्या जाहिराती सुरू होतात. कारण, ‘डाटा इज द न्यू ऑईल’ या नव्या संकल्पनेप्रमाणे समाजमाध्यम वापरकर्त्यांची माहिती विविध कंपन्यांना विकली जाते अथवा सामाईक केली जाते.

अपप्रवृत्ती कमी झाल्या नाहीत

समाजमाध्यमांबाबत ती वापरणाऱ्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी विविध समित्या नेमण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाआधी पार्श्वभूमी पाहणे महत्त्वाचे ठरते. समाजमाध्यमांमुळे सर्वसामान्यांना अभिव्यक्त होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. मात्र, आपले मत इतरांवर लादण्यासाठी खरे आणि खोटय़ाचे बेमालूम मिश्रण करणाऱ्यांमुळे, द्वेष फैलावून समाजात फूट पाडणाऱ्यांमुळे आणि बिभत्स धंदेवाईक वृत्ती असलेल्यांमुळे समाजमाध्यमे अशांतता निर्माण करण्याला, ऐक्याला तडे देण्यालाही कारणीभूत ठरत आहेत. ही नवी माध्यमेसमाजासाठी आणि देशासाठी धोकादायक ठरण्याची भीती आहे. यासाठी त्यांच्या नियमनाची आवश्यकता आहे. याबाबत कायदे केले गेले. समाज माध्यमांनाच अधिक उत्तरदायी बनविण्यासाठी प्रयत्न झाले. समाजात द्वेष पसरविणाऱ्यांपासून समाजविघातक कारवायांना उद्युक्त करणाऱ्यांपर्यंत सर्व अपप्रवृत्तींना रोखण्याचा प्रयत्न झाला खरा; परंतु अपप्रवृत्ती काही कमी झाल्या नाहीत. या माध्यमांचा गैरवापर कायमच राहिला आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्यात नव्याने दुरुस्ती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला.

या कायद्यातील दुरुस्तीनुसार, तक्रारींच्या निराकरणासाठी विविध प्रकारच्या समित्या पुढील तीन महिन्यांत स्थापल्या जातील. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यू टय़ूब आदी विविध समाजमाध्यमांबद्दल या समित्यांकडे थेट तक्रार करण्यात येणार आहे. एक अध्यक्ष आणि दोन स्थायी सदस्य यांचा समावेश असलेल्या समित्या तक्रारींवर तज्ञांची मदत घेऊन निकाल देणार आहेत. त्यांचे पालन करणे संबंधित माध्यमांना बंधनकारक असेल. द्वेषमूलक, प्रक्षोभक किंवा समाजात फूट पाडण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्यांचे खातेही बंद करण्याचा आदेश या समित्या देऊ शकतात. त्यामुळे माध्यमांतून समाजात फूट पाडणाऱ्यांचे नियंत्रण केले जाईल .

कोणा एका समाज माध्यमाला समोर ठेवून हा कायदा किंवा त्यातील दुरुस्ती करण्यात आली नसल्याची माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिली. आपल्याबाबतच्या तक्रारींबद्दल समाज माध्यमे सजग राहून दोषींवर कारवाई करीत नसतील तर ते स्वीकारण्यासारखे नाही.

दोषी खातेधारकांचे खाते बंद करण्यापासून विविध दंडात्मक कारवाई समाजमाध्यमे आताही करीत असली तरी ती कठोरपणे पावले उचलत नाही. समाज माध्यमांचा वापर दहशतवादी आणि मूलतत्त्ववादी करीत असल्याकडे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही लक्ष वेधले आहे. अनेक दहशतवादी संघटना प्रक्षोभक आशय ‘टूल किट’प्रमाणे वापरत असल्याकडे त्यांनी अंगुलिनिर्देश केला आहे. आपल्याले हवे तसे कथन निर्माण करण्यासाठी समाजमाध्यमांवर काही विचारधारा, चळवळी आणि पक्ष ‘टूल किट’चा वापर करीत असल्याकडे यापूर्वीही लक्ष वेधले गेले आहे. आता केंद्र सरकार समित्यांमार्फत दंडात्मक कारवाई करणार आहे, जे देशाकरिता अत्यंत महत्त्वाचे आहे.

[email protected]