लेख – छत्रपती शिवरायांचे थोरपण

788

>> सुभाष देसाई 

हिंदुस्थानच्या आणि तमाम हिंदूंच्या सुदैवाने सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी एक सोनेरी पान लिहिले गेले. चीनपासून इराणपर्यंत पसरलेल्या आशिया आणि आप्रिâकन खंडात सर्वत्र मुस्लिम राजवटींचे नगारे वाजत असताना महाराष्ट्रात सह्याद्रीच्या कुशीतील रायगडावर राजे शिवाजी शहाजी भोसले हे छत्रपती झाले. सार्वभौम सम्राट म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. म्हणून दरवर्षी आपण आजच्या या ज्येष्ठ शुद्ध चतुर्दशीला शिवराज्याभिषेक दिनाचा उत्सव साजरा करतो.

शिवाजी महाराजांचे दर्शन पहिल्यांदा घडले ते तिसरीत असताना. पुस्तकात त्यांचे चित्र छापलेले होते. गणपती, राम, कृष्ण तसे शिवाजी महाराज देवांपैकीच एक वाटत. त्या पुढच्या वर्गांमध्ये इतिहासाच्या धड्यांमधून महाराज भेटत गेले. सावळ्या नावाच्या पोरसवदा मावळ्याची कविता तर वेड लावून गेली. `खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या, उडवीन राई राई एवढ्या!’ अशी कडक धमकी देणारा सावळ्या पुढे  म्हणतो- हे हाडही  माझे लेचेपेचे नसे, या नसानसातून हिम्मतबाजी वसे’ आणि त्यानंतर हिणवतो- आपण मोठे दाढीवाले असे शूर बायकी, किती ते आम्हाला ठाऊकी!  मग वेशांतर करून सरहद्द ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेले खरे तर सावळ्याची परीक्षा घ्यायला आलेले स्वत: शिवाजी महाराज वेश बाजूला करून प्रकट होत सावळ्याला शाबासकी देतात. हे सगळे दृश्य डोळ्यासमोर घडत आहे असे वाटे.

त्यानंतर रायगडावर अडकून पडलेली हिरकणी गवळण बुरजावरून आपल्या बाळाच्या ओढीने गडाखाली उतरते, तो प्रसंग आणि महाराजांनी तिच्या पराक्रमाचे साडी-चोळी देऊन केलेले कौतुक व बुरुज पक्का बांधून घ्या म्हणून दिलेला हुकूम हे प्रसंग समोर घडल्यासारखे वाटत. पुढे इतिहासाच्या पानापानांवर महाराज भेटत गेले. अफजलखान भेट, शाहिस्तेखानाची बोटे छाटली, आग्र्याहून सुटका या अद्भुत कहाण्या उलगडू लागल्या. पण महाराजांचे सुसंगत चरित्र समजले ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवचरित्रमालेमुळे. `राजा शिवछत्रपती’ पुस्तकाची पारायणे आम्ही मित्र करू लागलो. गडकिल्ल्यांच्या सहलींमधून महाराजांना शोधू लागलो. यातून महाराजांची मुत्सद्देगिरी, धोरणीपणा समजू लागला. डोंगरी किल्ले जिंकून ते अभेद्य करण्याची त्यांची प्रथा हे खोलवर विचार करून राबविलेले धोरणच होते. समोरच्या शत्रूंकडे म्हणजे मोगलांकडे किंवा आदिलशहाकडे अफाट फौजा होत्या. त्या तुलनेत शिवरायांकडे घोडदळ, शस्त्रास्त्रे, मातब्बर सेनापती संख्येने कमी होते. तेव्हा अशा बलाढ्य शत्रूंसमोर मैदानांच्या सपाटीवर निभाव लागणे शक्य नव्हते हे हेरून महाराजांनी दुर्गम किल्ल्यांच्या मदतीने आणि गनिमी काव्याच्या माध्यमातून बलाढ्य शत्रूला जेरीस आणले. तंजावरपर्यंत स्वराज्याचा विस्तार करणे त्यांना त्यामुळेच शक्य झाले. अशा विस्तारापूर्वी शाहिस्तेखान, बहलोलखान, दिलेरखान, सिद्धी जौहर आणि अफजलखान यापैकी कोणी कोणी शिवरायांचे तडाखे खाल्ल्यावाचून सुटले नाहीत. महाराजांच्या भक्तांनी, चाहत्यांनी त्यांची महती गाणे आपण समजू शकतो. परंतु जगाच्या इतिहासातील पानांवर ज्यांना महत्त्वाच्या जागी नोंदविले गेले त्यांनी शिवरायांच्या गुणांचे जे वर्णन केले त्यातून महाराजांचे जगावेगळेपण सिद्ध होते. यांतील अनेक जण आपआपल्या काळातील नायक किंवा महानायक होते.

उण्यापुर्‍या तीस वर्षांच्या पराक्रमात शिवाजी महाराज फक्त दोन एतद्देशीय योध्द्यांशी लढले.  त्यांचे इतर सर्व बलाढ्य शत्रू हे परदेशातून आलेले आक्रमक होते! कोण होते हे यवन?

– जो स्वप्नातही शिवाजी दिसला तर घाबरत असे तो शाहिस्तेखान हा तुर्कीचा होता.

– बहलोल खान पठाण, सिकंदर पठाण, चिदनखान पठाण हे सर्व सरदार अफगाणचे होते.

– दिलेरखान पठाण हा मंगोलियातून आलेला होता. या सर्वांना शिवाजीराजांनी धूळ चारली होती.

– सिद्धी जौहर आणि सलबखान हे दोघे इराणी सरदार महाराजांच्या हातून पराभूत झाले.  पैकी सिद्धी जौहरने स्वराज्यावर समुद्रमार्गे हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून महाराजांनी आरमार उभारले. पहिले भारतीय आरमार!

सर्वश्रेष्ठ आणि विशाल हृदयाचा महान योद्धाऔरंगजेब

दस्तुरखुद्द औरंगजेबालाही अखेरीस `शिवा’ चे थोरपण आणि वेगळेपण कळून चुकले होते. आयुष्याच्या शेवटाकडे निघालेल्या आलमगिराला महाराज कसे कळले होते? ‘‘काबूल ते कंदहारपर्यंत माझ्या तैमूरवंशाने मोगल साम्राज्याचा जम बसवला. इराक, इराण, तुर्कस्तान आणि इतर अनेक देशांतील बलाढ्य योद्ध्यांना आमच्या सैन्याने धूळ चारली. हिंदुस्थानात फक्त शिवाजीने आम्हाला रोखले! मी माझी सारी ताकद आणि उभी हयात शिवाजीविरुध्द खर्च केली. पण मी शिवाजीला शरण आणू शकलो नाही! या अल्ला! तू मला शत्रू दिलास तोही शिवाजीसारखा निर्भय आणि कणखर. आता तुझ्या स्वर्गाचे महाद्वार त्याच्यासाठी उघड. कारण जगातील सर्वश्रेष्ठ आणि विशाल हृदयाचा महान योद्धा तुझ्याकडे येतो आहे.’’  – औरंगजेब

(नमाज पढत असताना औरंगजेबाला महाराजांच्या मृत्यूची बातमी देण्यात आली तेव्हा त्याने त्याच्या सर्वात मोठ्या शत्रूबद्दल हे उद्गार काढले.)

शिवाजीने `त्या’ भयंकर दिवशी माझी बोटेच छाटली नाहीत, तर माझा स्वाभिमानच छाटून टाकला. त्याला स्वप्नात भेटायचीही मला भीती वाटते – शाहिस्तेखान

शिवाजीचा पराभव करील असा एकही योद्धा माझ्या राज्यात नाही काय? – बेगमअली आदिलशहा

नेताजी, ब्रिटिशांना झुगारून देण्यासाठी तुमच्या देशाला कोणा हिटलरची नव्हे, तर फक्त शिवाजीच्या इतिहासाची शिकवण पुरेशी आहे! – अ‍ॅडॉल्फ हिटलर

हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर एकच मार्ग आहे. शिवाजीसारखे.  – नेताजी सुभाषचंद्र बोस

शिवाजींनी इंग्लंडमध्ये जन्म घेतला असता तर आम्ही जगावर नव्हे तर विश्वावर राज्य केले असते – लॉर्ड माऊंट बॅटन

शिवाजी आणखी दहा वर्षे जरी जगले असते तर हिंदुस्थानचे तोंडही आम्हाला दिसले नसते! – एक ब्रिटिश गव्हर्नर

शिवाजी हे फक्त एक नाव नाही.  भारतीय युवकांसाठी तो उâर्जेचा महान स्त्रोत आहे.ज्याच्या प्रेरणेने भारताला स्वतंत्र करता येईल – स्वामी विवेकानंद

शिवाजींनी अमेरिकेत जन्म घेतला असता तर आम्ही त्यांना `सूर्य’ हेच नाव दिले असते. – बराक ओबामा

बोस्टन विद्यापीठात `शिवाजी – एक व्यवस्थापन गुरू’ हा अभ्यासाचा एक पूर्ण विषय आहे. – ‘गुगल’वरून

`गिनिज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्डस्’ या जगन्मान्य ग्रंथात सुप्रसिद्ध उंबरिंखड युद्धाचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे –

उझबेकिस्तानातून आलेल्या लढवय्याकार तलबखानाच्या 30 हजार ताकदवान फौजेची शिवाजीच्या फक्त एक हजार मावळ्यांनी दाणादाण उडवली. एकही उझबेकी सैनिक सुखासुखी परत गेला नाही. हे सर्व वाचल्यावर प्रत्येक देशप्रेमी भारतीयाला आपण त्या महान राजाबद्दल किती अल्पसे जाणतो याची खंत वाटल्याशिवाय राहत नाही.  निदान नव्या पिढीला शिवाजी महाराजांची पूर्ण ओळख करून देऊन ही खंत मागे सारूया! आजच्या शिवराज्याभिषेक उत्सवदिनी महाराष्ट्राच्या नव्हे, हिंदुस्थानच्या दैवताला मनोभावे वंदन करुया!

(लेखक शिवसेना नेते व महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहेत)

आपली प्रतिक्रिया द्या