
>> वैश्विक
गेल्या आठवडय़ात दोन अवकाशी घटनांची चर्चा होती. सध्याच्या ढगाळ हवामानामुळे निरभ्र आकाश दिसणं कठीण. तरीही उत्तर-पश्चिम म्हणजे वायव्य दिशेला संध्याकाळी क्षितिजापासून साधारण तीस अंश अंतरावर सप्तर्षी या ठळक तारकासमूहाजवळ एक सुंदर धूमकेतू दिसत होता. त्याचं नाव होतं ‘निओवाइज’. आकाश स्वच्छ असतं आणि ‘कोरोना’चं संकट नसतं तर नक्कीच हजारो खगोलप्रेमींनी आणि उत्सुक नागरिकांनी ‘निओवाइज’चं दर्शन घेतलं असतं.
आपल्या सगळय़ांनाच ठाऊक आहे की, हॅलीचा प्रसिद्ध धूमकेतू दर 76 वर्षांनी येतो. 1834 नंतर तो 1910 मध्ये येणार हे जगात प्रसिद्ध झालं होतं. त्यामुळे त्याचे खूप फोटो घेण्यात आले. एखाद्या धूमकेतूचं इतकं कौतुक आणि छायाचित्रण त्यापूर्वी कधी झालं नव्हतं. त्यानंतर ‘हॅली’ पुन्हा 1986 मध्ये येण्याची वेळ झाली तेव्हा जग तंत्रज्ञानात खूपच पुढे गेलेलं होतं. त्यामुळे हा धूमकेतू पाहण्यासाठी खगोल अभ्यासक तयारी करू लागले. विशेष कार्यक्रम आयोजित करून अनेक खगोल संस्थांनी वैज्ञानिक कर्तव्य बजावलं. त्यात आम्हीही होतो, पण ‘हॅली’ काही छान दिसला नाही. 1910च्या तुलनेत त्याने चांगलाच अपेक्षाभंग केला. त्यातून चांगली गोष्ट एकच झाली ती म्हणजे अवकाशस्थ घटनांबद्दलची भीती कमी होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीला लागला.
धूमकेतूची नोंद हिंदुस्थानात आधुनिक काळात ज्या एका व्यक्तीच्या नावे आहे त्याचं नाव वेणू बापू. एका अमेरिकन संशोधकासह त्यांनी एक धूमकेतू शोधला तो 1957 मध्ये. शूमेकर आणि लेव्ही यांनी तर अनेक धूमकेतू शोधले. त्यातला 9वा धूमकेतू गुरू ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणाने खेचून घेतला आणि त्याचे तुकडे तुकडे झालेले पाहायला मिळाले. त्याची फोटो नोंद करता आली.
हेल बॉप, हय़ाकुताके असे सुंदर धूमकेतू नंतरच्या काळात अनेकांनी पाहिले. धूमकेतू पाहायला काही खग्रास सूर्यग्रहणाला लागतो तसा विशेष चष्मा वगैरे लागत नाही. तो नुसत्या डोळय़ांनी पाहता येतो. दुर्बीण असेल तर उत्तम आणि दुर्बिणीद्वारे फोटो काढता आले तर अधिक उत्तम. ‘निओवाइज’चे फोटो इतर देशांतून अनेकांनी घेतले. हे धूमकेतू म्हणजे अवकाशातील भटक्यांपैकी एक. त्यांची भ्रमंती अव्याहत सुरू असते. तसं पाहिलं तर विश्वातील प्रत्येक गोष्टच गतिमान आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आपली अख्खी सूर्यमाला आपल्या गॅलॅक्सी किंवा दीर्घिकेच्या केंद्रकाभोवती फिरते. त्यातच आपली शेजारी दीर्घिका देवयानी ऊर्फ ऍन्ड्रोमीडा आपल्या दिशेने येत आहे. ग्रह-तारे, दीर्घिका, धूमकेतू, अशनी, उल्का साऱयांना अवकाशात गरगरण्याचा वसा लाभला आहे. यातलेच काही ‘पाहुणे’ आपल्या सूर्यमालेत ‘घुसखोरी’ करून कधी आनंद देतात तर कधी धडकी भरवतात. बरेचसे छोटे धुमकेतू आपल्या सूर्याच्या सपाटय़ात सापडून त्याच्यातच विलीन होतात. त्यांना ‘सन ग्रेझिंग धूमकेतू’ असं म्हणतात. मोठे धूमकेतू येतात नि जातात. त्यांच्या कक्षेनुसार त्यांचा कालावधी ठरतो. काही धूमकेतू पुनःपुन्हा येतात, तर अनेक एकदाच ‘दर्शन’ देतात. म्हणजे त्यांचाही कालावधी ठरलेला असतो, पण कक्षा एवढी विशाल असते की, हजारो वर्षांच्या काळानंतर ते पुन्हा येणार असल्याचा गणिती हिशेब मांडता आला तरी पाच-सहा पिढय़ांना ते दिसू शकत नाहीत. हा निओवाइज तर आता तब्बल 6700 वर्षांनी येणार आहे! त्यामुळे ज्यांना तो यावेळी पाहायला मिळाला ते खुश असतील. गेल्या 23-24 तारखेच्या सुमाराला एक अशनी पृथ्वीजवळच्या कक्षेतून पसार झाला. अशी ‘निअर अर्थ ऑब्जेक्टस्’ किंवा पृथ्वीजवळच्या अवकाशातील ‘भटके’ महापाषाण पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या पन्नास-साठ वर्षांत एखादा ‘अशनी’ पृथ्वीवर आदळणार की काय अशी भीती अनेकदा व्यक्त करण्यात आली. मात्र पृथ्वी अशा संभाव्य संकटातून प्रत्येक वेळी बचावली. काही वेळा अशा बातम्या अतिरंजितही असतात. पूर्ण अभ्यास न करता जोरजोरात सांगितल्या जातात. गेल्या आठवडय़ातील अशनी तसा पृथ्वीपासून बराच दूर होता, पण चर्चा झालीच.
अवकाशाच्या अनेक गोष्टी मनमोहक तर काही अक्षरशः दाहक असतात. एखादा अशनी आदळणं किंवा सौर वारे, सौर ज्वालांचं तांडव अशा गोष्टी चिंता वाढवू शकतात, पण आता त्याचीही पूर्वकल्पना मिळू शकते. ‘निओवाइज’सारखे धूमकेतू मात्र क्वचित दिसतात. पुन्हा कधी असा धूमकेतू आला तर तो पाहण्याची संधी सोडू नका. तोपर्यंत ‘कोरोना’ धास्तीही संपलेली असेल. आकाश पुन्हा निरीक्षणासाठी मोकळं झालेलं असेल.






























































