लेख – शिक्षकांना निवडणूक कामांची सक्तीः पर्याय हवाच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्र. ह. दलाल

आपला देश लोकशाहीप्रधान देश आहे. त्यामुळे कधी ग्रामपंचायत तर कधी जिल्हा परिषद, कधी नगरपालिका तर कधी विधानसभा–लोकसभा तर कधी पोटनिवडणुका होत असतात. मग त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक स्वतंत्र जिल्हा निवडणूक कार्यालय का नसावे? त्याचे उपकार्यालय प्रत्येक तालुक्यात असावे. या कार्यालयात आवश्यक अशी पदे निर्माण करून त्यासाठी सुशिक्षित बेरोजगार तरुण–तरुणींची भरती करावी. त्यांना संबंधित कामाचे प्रशिक्षण द्यावे. शिक्षकांना निवडणूक कामांची सक्ती करण्यापेक्षा हा पर्याय निश्चित चांगला ठरेल.

राज्यात सर्वत्र फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे महिने म्हणजे दहावी, बारावी व शालेय वर्गांच्या वार्षिक परीक्षांचा आणि लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणारा अत्यंत महत्त्वाचा काळ. दहावी, बारावी बोर्डाच्या प्रात्यक्षिक ते लेखी परीक्षांच्या आयोजनापासून, पर्यवेक्षक उत्तरपत्रिका तपासणे, मॉडरेटर इ. कामात शिक्षक गर्क असताना सरकार शिक्षकांचे रास्त म्हणणेही ऐकून न घेता, हुकूमशाही पद्धतीने त्यांना बीएलओच्या कामाची केवळ सक्तीच करीत नसून शिक्षकांवर पोलिसात गुन्हेही दाखल करीत आहे.

राज्यात शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस देणे व पोलिसांत गुन्हे दाखल करणे असे प्रकार होत आहेत. उदा. हिंगोली जिल्ह्यातील एक शिक्षक. सेवानिवृत्तीला अवघे पाच महिने शिल्लक आणि मुळात त्यांना बीएलओची कोणतीच ऑर्डर नसतानाही त्यांनी काम केले नाही म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची तक्रार त्यांनी केली आहे. त्या जिह्यात आठ शिक्षकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे त्यातील अनेक शिक्षक बोर्डाच्या परीक्षेच्या कामात आहेत.

परळी-वैजनाथ येथील एका शाळेत अनेक वर्गांना एकाच शिक्षक. तोच शिपाई, तोच अध्यापक आणि तोच मुख्याध्यापकसुद्धा शाळा झाडून मुलांना शिकविणे, मुख्याध्यापक म्हणून वरिष्ठांकडे दररोज अनेक अहवाल पाठविणे, असलेल्या सर्व वर्गांच्या परीक्षांचे नियोजन करणे, परीक्षा घेणे, उत्तरपत्रिका तपासून परीक्षेचा निकाल तयार करणे इ. कामातून भरडून जात आहे. ही वस्तुस्थिती कळवूनदेखील त्या शिक्षकाला बीएलओची सक्ती करणे, एवढेच नाही तर त्याला करणे दाखवा नोटीस देणे, गुन्हा दाखल करण्याची भाषा वापरणे याला काय म्हणावे? अनेक वर्गांना एकच शिक्षक आहे. तोही जर बीएलओच्या कामासाठी गेला तर शाळेला कुलूप लावायचे का? आणि शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे काय? अशा अधिकाराची नशा डोक्यात शिरलेल्या अधिकाऱ्यांच्या कथा राज्यातील अनेक जिल्ह्यांत घडत असल्याच्या तक्रारी आहेत.

शिक्षकांना निवडणुकीसंबंधी कामे देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयात परिच्छेद 32 मध्ये तत्त्वतः मान्य करून दिशादर्शक म्हटले आहे की, शिक्षकांना निवडणुकीसंबंधी कामे देणे अपरिहार्यच असेल तर ते फक्त शाळेला सुट्टी असेल, अध्यापनाचे काम नसेल त्याच वेळी द्यावे. शाळा व अध्यापनाचे काम सुरू असताना देऊ नये. अशाच प्रकारे निर्भयसिंग व इतर विरुद्ध उत्तर प्रदेश शासन दिनांक 11 ऑगस्ट 2022 या निर्णयात आणि मुंबई उच्च न्यायालयाने एका निर्णयात म्हटले आहे की, राज्य अधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर न करता शिक्षकांना शाळा सुरू असताना ही कामे देणे चूक आहे. याशिवाय RTE म्हणजे बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 27 नुसार शिक्षकांना अशैक्षणिक कामे करण्यासाठी नियुक्त करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. एवढे नाही तर, उपसचिव, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय (क्रमांक संकीर्ण – 2023/ प्र. क्र./ 506/ टी एन टी – 1, मंत्रालय, मुंबई 32) याचे अवलोकन तरी करा. या आदेशात शिक्षकांची अशैक्षणिक कामं  नेमकी कोणती ते स्पष्ट करण्यासाठी परिशिष्ट ब यात म्हटले आहे की, प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी आवश्यक कामाव्यतिरिक्त निवडणूकविषयक नियमित चालणारी कामे ही अशैक्षणिक कामे असून ती कामे शासनाच्या कोणत्याही विभागाकडून शिक्षकांना बंधनकारक करण्यात येऊ नये. राज्य शासनाचा इतका सुस्पष्ट आदेश असूनही याकडे मुद्दाम दुर्लक्ष करून कायदा, न्यायालय निर्णय या सर्वांना झुगारून मनमानी करणाऱ्यांवर शासनाने आणि शिक्षक संघटनांनी न्यायालयात याचिका दाखल करायला हवी, अन्यथा गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण हे कागदावरचे विशेषण ठरेल. शिक्षणावर शासन करीत असलेला कोटय़वधींचा निधी व्यर्थ जाईल. राज्यातील लाखो बालके ‘शिक्षण म्हणजे काय रे भाऊ?’ असाच आर्त प्रश्न विचारतील. मात्र तेव्हा वेळ निघून गेलेली असेल.

आपला देश लोकशाहीप्रधान देश आहे. त्यामुळे अगदी वर्षभर, कधी ग्रामपंचायत तर कधी जिल्हा परिषद, कधी नगरपालिका तर कधी विधानसभा-लोकसभा तर कधी पोटनिवडणुका होत असतात. मग त्यासाठी प्रत्येक जिह्यात एक स्वतंत्र जिल्हा निवडणूक कार्यालय का नसावे? त्याचे उपकार्यालय प्रत्येक तालुक्यात असावे. या कार्यालयात शिपाई, क्लार्क, अधीक्षक इ. आवश्यक अशी पदे निर्माण करून त्यासाठी सुशिक्षित तरुण बेरोजगार तरुण-तरुणींची भरती करावी. त्यांना संबंधित कामाचे प्रशिक्षण द्यावे, जबाबदारी निश्चित करावी. त्यामुळे पुढील लाभ होईल.

  • अनेक सुशिक्षित, लायक बेरोजगारांना नोकरी मिळेल.
  •  निवडणुकीची कामे करण्यासाठी शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना नियुक्त करणे टळेल.
  • जिल्हाधिकारी व त्या कार्यालयातील कार्यभार कमी होऊन उर्वरित काम व्यवस्थित करता येईल.
  • निवडणुकीबाबत सर्व काम एकच कार्यालयातून पार पडतील. कारण त्यांना त्याव्यतिरिक्त अन्य कामे नसतील. त्यामुळे अधिक बिनचूक व वेळेवर सर्व कामे होतील.