वेबन्यूज – संगणकाचे मॉनिटर होणार प्रदूषणमुक्त

>> स्पायडरमॅन

‘ग्लोबल वॉर्मिंग’ समस्येला हातभार लावण्यासाठी अनेक घटक कार्यरत असतात. जगात प्रचंड प्रमाणावरती वापरल्या जाणाऱया संगणकाचे ‘सर्व्हर्स’ हे या उष्णतावाढीत भर घालणाऱया खलनायकांपैकी एक होय. या सर्व्हर्सचा प्रचंड ऊर्जा वापर ही कायमच एक मोठी समस्या होती. मात्र आता डॅनिश संशोधकांच्या एका गटाने एक अभिनव असा ‘अल्गोरिदम’ शोधून काढला आहे, जो जागतिक पातळीवर या सर्व्हर्सच्या ऊर्जावापराला कमी करू शकणार आहे. हे सर्व्हर्स करत असलेल्या प्रचंड विजेच्या वापरामुळे सध्या ‘डाटा सेंटर्स’मधून होणारे कार्बन वायूचे (CO2) उत्सर्जन हे जागतिक हवाई वाहतुकीमुळे होणाऱया कार्बन उत्सर्जनाच्या तोडीस तोड बनले आहे. संगणकाच्या सर्व्हरचा वर्क-फ्लो आधीच्या पेक्षा अधिक सुरळीत आणि वेगवान करण्यास या नव्या अल्गोरिदममुळे मदत होणार आहे. आपसूकच त्यामुळे सर्व्हरची कमी ऊर्जेत अधिक काम करण्याची क्षमता वाढणार आहे आणि कार्बन उत्सर्जनाचा वेगदेखील मोठय़ा प्रमाणात कमी होणार आहे. सध्या ‘व्हिमिओ (Vimeo)’ आणि गुगल (Google) सारख्या टेकजायंट कंपन्यांनी आपल्या सर्व्हरमध्ये हा अल्गोरिदम अत्यंत उत्साहात वापरायला सुरुवातदेखील केली आहे. या अल्गोरिदमच्या वापराने आपल्या व्हिडिओ प्लॅटफॉर्मच्या बॅंडविडथच्या वापराचा रेट सर्व्हरमध्ये असलेल्या आठ घटकांकडून कमी झाला असल्याचे ‘व्हिमिओ’तर्फे नुकतेच जाहीरदेखील करण्यात आले. मर्यादेपेक्षा अधिक युजर्सना तोंड द्यावे लागत असल्याने सध्याच्या सर्व्हर्सवर प्रचंड ताण पडला आहे. एकाच वेळी मर्यादेपेक्षा जास्त युजर्सच्या विविध मागण्या पुरवणे, आदेशांचे पालन करणे सध्या या सर्व्हर्सच्या एकूणच मर्यादेच्या पलिकडे चालले आहे. त्यामुळे सर्व्हर बंद पडणे, सेवा ठप्प होणे, तापमान वाढीला पोषक ठरणाऱया घटकांचा सर्व्हरकडून अतीवापर होणे अशा घटना वाढत चालल्या आहेत. हा नवा अल्गोरिदम सर्व्हरची मर्यादा ओळखून, त्याची कार्यशक्ती युजर्समध्ये समान प्रमाणात विभाजीत करतो. त्यामुळे सर्व्हरचा ताण मोठय़ा प्रमाणावर कमी होतो. भविष्यात जगभरातील इंटरनेटचा वाढणारा वापर विचारात घेता या अल्गोरिदमचे महत्त्व सामान्य माणसालादेखील लगेच उमजेल.

आपली प्रतिक्रिया द्या