अंतरंग –  भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे!

>> नीलांबरी जोशी

कोरोना विषाणूने सगळ्या जगाला घेरताना सर्वच पातळीवर आपली परीक्षा पाहिली आहे. आपली आरोग्य, आर्थिक, सामाजिक घडी काहीशी विस्कटलेली आहे. यातून आपण नक्कीच सावरू, परंतु विस्कटलेली मानसिक घडी पुन्हा सांधताना आपल्याला वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर जबाबदारी पेलणं अपेक्षित आहे.

एका शेतकर्‍याचा मुलगा एका नवीन घोड्यावर खोगीर चढवून त्याच्यावरून रपेट करायच्या प्रयत्नात होता. मात्र त्याला घोड्यानं फेकून दिलं आणि त्या मुलाचा पाय मोडला. संध्याकाळी गावकरी शेतकर्‍याकडे या घटनेबद्दल सहानुभूती दाखवायला आले आणि म्हणाले, ‘‘आता तुला तुझ्या क्षमतेपेक्षा जास्त काम करावं लागेल. ते जमलं नाही तर तू गरीब होत जाशील. हे भयंकर काहीतरी घडलंय.’’ शेतकरी म्हणाला, ‘‘कदाचित हो, कदाचित नाही.’’ त्याच्या पुढच्या दिवशी शहरातले अधिकारी गावातल्या तरुण मुलांना लष्करात भरती करून घेण्याचं फर्मान घेऊन आले, पण शेतकर्‍याच्या मुलाचा पाय मोडला असल्यानं त्याला अधिकाऱयांनी नाकारलं. परत जेव्हा संध्याकाळी शेजारीपाजारी जमले तेव्हा म्हणाले, ‘‘तू किती सुदैवी आहेस! आमची मुलं काही युद्धात जिवंत राहतील याची शाश्वती नाही.’’ शेतकरी म्हणाला, ‘‘कदाचित हो, कदाचित नाही.’’

ही आहे एक झेन कथा. कोरोना व्हायरसची साथ सुरू झाल्यापासून आर्थिक, सामाजिक, मानसिक, बौद्धिक, शारीरिक, राजकीय आणि सांस्कृतिक अशा निरनिराळ्या दृष्टिकोनांमधून कोरोनानंतरचं जग कसं असेल याच्या उलटसुलट चर्चा सतत चालू असतात, पण या सगळ्या चर्चांचा सूर या झेन कथेतल्या शेतकर्‍यासारखाच असतो. तो म्हणजे कदाचित असं होईल किंवा कदाचित असं होणार नाही असं सर्वजण सांगतात.

यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे गेल्या दोन हजार वर्षांमध्ये साथीच्या रोगाचं संकट इतकं भयावह नव्हतं. साहजिकच या सगळ्याचं उत्तर एखाद्या ‘सेल्फ हेल्प’ या पुस्तकात चुटकीसरशी सापडणं शक्त नाही. त्यामुळे पुढचं चित्र धूसर आणि अनिश्चित असणं हेच नॉर्मल आहे, पण आपल्याला सगळ्यांना आता सर्वात मोठा त्रास या अनिश्चिततेचा होतोय. संपूर्णपणे लॉकडाऊन कधी उठेल, कोरोनावर लस कधी सापडेल, आपली, आपल्या कुटुंबाची आणि सगळ्या जगाची गाडी पूर्वपदावर येईल का? आणि ती कधी येईल? या आणि अशा प्रश्नांनी सगळ्यांनाच सतावलं आहे.

अनिश्चिततेबरोबरच जी मानसिक भावना सगळ्यांना सर्वात जास्त सतावते आहे, ती म्हणजे भीती. प्रत्येक वर्तमानपत्र, रेडिओ-टीव्हीवरच्या बातम्यांचं प्रत्येक चॅनेल, सामाजिक माध्यमं, जाऊ तिथे गेले चार महिने फक्त कोरोनाचीच चर्चा आहे. कोरोनानं झालेले मृत्यू, रोज वाढणारी रुग्णसंख्या, घाबरवणारे आकडे आणि त्यावरचे काही वेळा खरे आणि काही वेळा विनोदी भासणारे उपाय यांनी सगळी माध्यमं ओसंडून वाहत आहेत. याचा परिणाम म्हणजे सततची अस्वस्थता वाढून आपल्याला कोरोना होईल ही भीती दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

साथीच्या रोगाची ही भीती आपल्यात कशी रुजली याचा विचार करून मानवजातीचा इतिहास पाहिला, तर आधुनिक वैद्यकशास्त्र जन्माला येण्याआधी साथीचे रोग हा मानवजातीच्या अस्तित्वाला सर्वात मोठा धोका होता. त्यामुळे त्या रोगांना घाबरणं साहजिक होतं. आजही वास येणारं अन्न किंवा नासलेलं फळ खाणं अशा गोष्टी खाणं आपण प्रतिक्षिप्तपणे टाळतो. त्यामागे अशा नासलेल्या गोष्टी खाऊन आपल्याला संसर्ग होऊ शकतो ही हजारो वर्षे मनात रुजलेली भीती हे कारण आहे. माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्यामुळे ही भीतीची लाटही समाजात पसरत जाते. इतरांच्या मूडस्प्रमाणे आपले मूड नेहमीच बदलत जातात. उदाहरणार्थ, आा@फिसमध्ये सगळे जण मीटिंगमध्ये शांतपणे, विचारपूर्वक, आनंदानं नवीन योजना आखत असताना एक मूड असतो, पण तिथे नुकताच आलेला टीम मेंबर जर दुःखी किंवा अस्वस्थ असेल तर टीमचा मूड बदलायला वेळ लागत नाही. फार कशाला, आपण फेसबुकवर मस्त धमाल मूड असताना लॉग इन झालो आणि कोणावर तरी ओढवलेल्या संकटाची/मृत्यूची बातमी वाचली तर आपला मूड बदलतो. तेच कोरोनासारख्या रोगांची भीती फैलावताना घडतं.

कोरोनाच्या काळात जोडप्यांमधले बेबनाव वाढत चालले आहेत. 24 तास एकत्र राहणं जमत नाही अशा तक्रारी वाढल्या आहेत. याचं एक कारण नार्सिसिस्टिक, आत्मकेंद्रित असणारा जोडीदार हेही आहेच..! अशा नकारात्मक विचारांमधून आणि ताणलेल्या नातेसंबंधांमुळे कोरोनाच्या काळात नैराश्यदेखील खूप वाढलं आहे. सुशांतसिंग राजपूतची आत्महत्या हे त्याचं एक उदाहरण आहेच, पण अमेरिकेतल्या एका चौकोनी हिंदुस्थानी कुटुंबाची एक कथाही पुरेशी बोलकी आहे. या कुटुंबात आपापल्या नोकरी-व्यवसायात स्थिरावलेली मुलं आणि आईवडील कोरोना काळात वेगवेगळ्या शहरांमध्ये होते. ते सगळे आठवड्यातून दोन-तीन वेळा संध्याकाळी झूम कॉलवर बोलायचे. एका कॉलवर मुलगा दिसला नाही. त्याच्या मैत्रिणीला फोन केल्यावर मैत्रीण त्याच्या घरी गेली. मुलानं एकटं राहून आलेल्या नैराश्यामुळे आत्महत्या केली होती. असे प्रसंग वाढले आहेत.

या सगळ्यावर एक महत्त्वाचा उपाय आहे तो म्हणजे सोशल इंटेलिजन्स वापरणं. स्वतःच्या भावभावना ओळखून त्याप्रमाणे आपलं वागणं लक्षात घेणं, आपल्याबरोबरच्या माणसाच्या भावना, स्वभाव लक्षात घेऊन त्याचं वागणं कसं बदलतं आहे ते लक्षात घेणं आणि कोरोनाची साथ जास्त पसरत चालल्यावर एकूण समाजाचं वागणं कसं बदलत चाललं आहे ते लक्षात घेणं हे त्यातले तीन टप्पे आहेत. ते लक्षात घेऊनच आपण आपल्या मनाशी आणि घरातल्यांशी संवाद साधताना भावनांचा समतोल राखून प्रतिक्रिया देणं ही परीक्षा पार पाडावी लागणार आहे. कोरोना इतक्यात जात नाही असं दिसल्यावर फोनवर किंवा प्रत्यक्षात कोणाशी बोलताना आपली आवाजाची पट्टी चढते आहे का? उगाच रडू येतंय का? काही करावंसं वाटत नाही, झोप येत नाही, खूप खाणं किंवा अजिबात न खाणं असं होतंय का? हे सगळं लक्षात घेणं गरजेचं आहे.

यासाठी स्वतःला काही प्रश्न विचारायला हवेत ते म्हणजे तुम्हाला समोरचा माणूस कोणत्या परिस्थितीत आहे ते लक्षात घेऊन त्यानुसार त्याच्याशी वागता येतं का? त्याच्या भावना आणि त्याचे हेतू काय आहेत ते कळू शकतं का? घडलेल्या घटनेमागचा अन्वयार्थ तुम्हाला लावता येतो का? त्यामागची पार्श्वभूमी लक्षात घेता येते का? समोरच्या माणसाची सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, बौद्धिक विचारसरणी काय आहे ते तुम्ही लक्षात घेता का? समोरच्या माणसाचा या सर्व गोष्टीतला दृष्टिकोन जर तुम्हाला समजावून घेता आला तर तर तो माणूस ताण, वादविवाद अशा प्रसंगांना किंवा (कोरोनाच्या साथीसारख्या) अनिश्चित/अनपेक्षित घटनांना कसं तोंड देईल ते तुम्हाला समजावून घेता येऊ शकेल.

एरवी जरा बेदरकारपणे आपण गाडी चालवत असलो तरी बरोबर मुलं असली तर गाडी जपून चालवतो. तशा प्रकारची जबाबदारी आपण कोरोनाच्या काळात घेणं गरजेचं आहे. केवळ मी जगेन का? एवढय़ा एकाच प्रश्नाभोवती विचारांचं गाडं फिरत राहण्यापेक्षा कोरोनामुळे मानवजात नष्ट होईल का? यासाठी सामूहिक पातळीवर काय करायला हवं हा दृष्टिकोन जोपासायला हवा. ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ या ज्ञानेश्वरांच्या ओळींचा अर्थ तेव्हाच सार्थ होईल.

(लेखिका मानसिक समुपदेशक आहेत)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या