
>> डॉ. अविनाश भोंडवे
कोरोनाच्या दुसऱया लाटेतून मोकळा श्वास घेत नाही तोवरच पुन्हा निर्बंध, लॉकडाउन असे शब्द कानावर पडू लागले आहेत. या तिसऱया लाटेची नक्कीच धास्ती काटत आहे. नुकतंच नीती आयोगानेही सप्टेंबरपासून कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र ही लाट कशी असेल, तिची दाहकता कितपत असेल या संभ्रमात अडकण्यापेक्षा एक सुजाण नागरिक म्हणून आपली कर्तव्य आपण पार पाडली पाहिजेत.
कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय. लॉक डाऊन आणि कडक निर्बंधातून अखिल जनतेने नुकताच निःश्वास सोडला होता. तोच तिसऱया लाटेची कुजबूज सुरू झाली आहे. यामध्ये भर म्हणून सप्टेंबरपासून कोरोनाची तिसरी लाट येणार आहे, ती खूप मोठी असणार आहे, असे हिंदुस्थानच्या नीती आयोगाने मागील आठवडय़ात जाहीर केले. त्यासाठी सरकारी स्तरावर हॉस्पिटल्सच्या बेड्सची संख्या किती वाढवावी याबाबत नियोजनाचे सल्ले दिले आणि एकच गहजब उडवून दिला.
तिसऱया लाटेची भाकिते
अनेकांना प्रश्न पडतो की, तिसरी लाट येणार अशी भाकिते सरकार आणि संशोधक कशाच्या आधारावर करतात? या प्रश्नाच्या उत्तराला अनेक कंगोरे आहेत.
- जगभरात आतापावेतो येऊन गेलेल्या साथीच्या आजारांचा इतिहास हे दर्शवतो, की अशा आजारांच्या अनेक लाटा काही वर्षे येत राहतात. लाट म्हणजे एखाद्या विषाणूचा किंवा जीवाणूचा संसर्ग सुरू होतो, तो सर्वत्र पसरतो. त्या आजाराने बाधित लोकांची संख्या खूप वाढू लागते. याला लाटेची सुरुवात म्हणतात. मग काही काळाने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक अशा लॉक डाऊनसारख्या उपायांनी किंवा लसीकरणामुळे रुग्णसंख्या कमी होत जाते आणि लाट ओसरते. मग काही काळाने विषाणूमध्ये म्युटेशन होते, अंतर्गत बदल होतात. मग पुन्हा रुग्णसंख्या वाढते आणि मग याला दुसरी लाट म्हणतात. या इतिहासाच्या आधारे, कोरोनाच्याही अशा लाटा येत राहणार. त्यामुळे पहिली आणि दुसरी लाट आली, आता तिसरी लाट येणार, असे भाकीत करायला वेगळ्या कौशल्याची गरज नसते.
- साथीच्या आजाराबाबत एक शास्त्र आहे, त्याला एपिडेमियालॉजी म्हणतात. यामध्ये विषाणूची आर-ओ व्हॅल्यू, पॉझिटिव्हिटी रेट असे अनेक शास्त्रीय मुद्दे आणि त्या भागातील लोकांचा प्रतिबंधक उपायांबाबतची सतर्कता, हवामान अशा इतर गोष्टी धरून एक गणितीय प्रारूप (मॅथॅमॅटिकल मॉडेल) बनवले जाते. कोरोनाच्या बाबतीत बनवलेल्या मॉडेलनुसार तिसरी लाट सप्टेंबर ते नोव्हेंबर 2021 च्या सुमारास येईल, असे दर्शवलेले आहे.
- युरोपमध्ये सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येचा उद्रेक होतो आहे. ब्रिटन, स्पेन, हॉलंड, जर्मनी अशा देशात मे महिन्यापासून रुग्णसंख्या खूप वाढू लागली. ही तेथली तिसरी-चौथी लाट होती. आणि जानेवारी 2020 पासून असे लक्षात आले आहे की, युरोपात लाट आली की तीन ते चार महिन्यांनी आपल्याकडे येते. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आपल्याकडे तिसरी लाट येईल, असा ठोकताळा आहे.
रुग्णसंसर्गाच्या आकडय़ांचे अनुमान
अमेरिकेमध्ये गेल्या दोन महिन्यांत रुग्णसंख्येची वाढ मोठय़ा प्रमाणात होते आहे. त्याबाबत केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की ज्यांनी लसीकरण अजिबात केलेले नाही त्यांना मोठय़ा प्रमाणात लागण होते आहे. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत अशांनाही कोरोनाची बाधा होत्येय, पण ती संख्या लस न घेतलेल्या लोकांच्या मानाने खूप कमी आहे. आजमितीला हिंदुस्थानात जेमतेम 10 टक्के नागरिकांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. म्हणजेच पूर्ण लसीकरण न झालेल्या लोकांची संख्या 117 कोटी भरेल. याचाच अर्थ हिंदुस्थानात यापुढे येणाऱया लाटेत हे 117 कोटी लोक बाधित होऊ शकतील. त्यामुळे लाटेचा भर जेव्हा वाढेल तेव्हा मागील दुसऱया लाटेपेक्षा जास्त लोक दिवसागणिक बाधित होतील. हिंदुस्थानातल्या दुसऱया लाटेमध्ये 6 मेच्या दरम्यान दिवसाला 3 लाखांपेक्षा जास्त लोक कोरोना पॉझिटिव्ह निघत होते. साहजिकच ही तिसरी लाट दुसरीपेक्षा मोठी असल्यास दिवसाला 4 ते 5 लाख रुग्ण बाधित होण्याची शक्यता आहे, असे नीति आयोगाला वाटते.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱया लाटेच्या आकडेवारीनुसार, बाधित होणाऱया रुग्णांपैकी 22 टक्के लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागत होते आणि 2.5 टक्के लोकांना आयसीयुची गरज भासत होती. त्यामुळे नीति आयोगाच्या हिशेबानुसार 5 लाखांच्या आकडय़ात व्हेन्टिलेटर्स असलेले 1.25 लाख आयसीयू बेड्स, 5 लाख ऑक्सिजन बेड्स आणि 10 लाख आयसोलेशन बेड्स लागू शकतील. हे आकडे तिसऱया लाटेच्या भावी आपत्तीला तोंड देण्याच्या तयारीसाठी दिलेले आहेत. रुग्णांचे हाल टाळण्यासाठी नीति आयोगाने हा इशारा दिला आहे.
तिसऱया लाटेबाबत आणखी काही मुद्दे
कोणतीही लाट येण्यासाठी कारणीभूत ठरणाऱया घटकांचा विचार केला, तर तिसरी लाट येणार याबाबतचे अंदाज खरे ठरण्याची शक्यता जास्त आहे. विषाणूचे म्युटेशन आणि त्याची वाढ, दुसऱया लाटेपूर्वी डेल्टा या नव्या म्युटेशनचे विषाणू महाराष्ट्रात अमरावतीमध्ये आढळले होते. सध्या डेल्टा प्लस हा नवा म्युटंट महाराष्ट्रात आढळत असून त्याची संख्या महिन्यागणिक वाढते आहे.
प्रतिबंधक उपायांचे जनतेकडून उल्लंघन– ऑगस्टच्या सुरुवातीपासून शिथिल केलेल्या लॉक डाऊनमुळे रस्त्यावर सर्वत्र गर्दी उसळत आहे. पुन्हा एकदा मोठे समारंभ, राजकीय सभा, सार्वजनिक कार्यक्रम, जेवणावळी होत आहेत, बाजारात, हॉटेल्समध्ये, प्रवासासाठी सर्वत्र कमालीची गर्दी होते आहे. या सर्व ठिकाणी मास्क न वापरणाऱयांची संख्या वाढते आहे.
प्रशासकीय उपाय कमी– टेस्टिंगची संख्या रोडावली आहे. पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग गेल्या पाच-सहा महिन्यांत थांबले आहे.
कमी लसीकरण– लसींचा तुटवडा, मर्यादित लसीकरण केंद्रे आणि कोविन ऍपद्वारे अत्यावश्यक रजिस्ट्रेशन यामुळे लसीकरणाचा वेग खूप मंद आहे. 16 जानेवारीपासून आजपर्यंत गेल्या साडेसात महिन्यांत 130 कोटी लोकांपैकी फक्त 12-13 कोटी लोकांचेच पूर्ण लसीकरण झाले आहे.
या सर्व गोष्टींचा विचार केला, तर तिसरी लाट येईल हे सांगायला कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज आहे का? तिसरी लाट येईल किंवा नाही, ती मोठी असेल किंवा छोटी याचा आपण जास्त विचार करणे चुकीचे आहे. प्रत्येक हिंदुस्थानी नागरिकाने प्रतिबंधक उपाय पाळले आणि प्रशासनाने त्यांची कर्तव्ये योग्य पद्धतीने पार पाडली तर कोणत्याही लाटेचा आपण सामना करू शकू, हे नक्की.
प्रतिबंधक उपाय – लाट कोणतीही येवो, आपणा सर्वांसाठी प्रतिबंधक उपाय तेच आहेत. z मास्क वापरा, शक्य असल्यास दुहेरी मास्क वापरा. z अकारण बाहेर पडू नका. गर्दी करू नका. दुकानात, भाजी मार्केटमध्ये किंवा ऑफिसात जाताना शारीरिक अंतर किमान 3 फूट ठेवा. z नाका-तोंडाला हात लावण्यापूर्वी साबणपाण्याने किंवा सॅनिटायझरने हात स्वच्छ धुणे विसरू नका. दुकानदारांनी, हॉटेल व्यावसायिकांनी आणि ऑफिसमध्येसुद्धा या नियमाचे कडक पालन झाले पाहिजे. z सर्दी, खोकला, ताप, जुलाब, डोके दुखणे अशापैकी काहीही लक्षण असल्यास मनाने औषधे घेऊ नका, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. z मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, यकृताचे किंवा मूत्रपिंडाचे आजार असतील तर ते डॉक्टरांच्या सल्ल्याने सतत नियंत्रणात ठेवा. वरचेवर त्याबाबत चाचण्या करून घ्या. z लसीकरण करून घेतले नसल्यास त्वरित लसीकरण करून घ्या.
(लेखक इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.)




























































