प्रासंगिक – लसनिर्मितीचा मागोवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी विज्ञान परिषदेचे पंचावन्नाव्या ‘ऑनलाइन’ अ. भा. मराठी विज्ञान अधिवेशन 13 ते 17 डिसेंबर या कालावधीत होत आहे. या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. शेखर मांडे (महासंचालक, सीएसआयआर, नवी दिल्ली) यांच्या अध्यक्षीय भाषणाचा गोषवारा… 

लस आपण रोग व्हायच्या आधी, रोग होऊ नये म्हणून घेतो. लस दिल्यामुळे त्या व्यक्तीला हा रोग होण्याची शक्यता खूप कमी होते, कारण त्यामुळे शरीरात त्या रोगाविरुद्ध लढण्यासाठी प्रतिक्षमता निर्माण होते. रोग झाल्यावर तो बरा व्हावा त्यावर उपचार म्हणून जे आपण घेतो, त्याला आपण औषध म्हणतो. सध्या आपण विश्वास ठेवून आहोत की, लस आली तर आपण ‘कोविड-19’वर मात करू आणि मग आपल्याला पूर्णपणे समाधान मिळेल. पण प्रत्यक्षात कोणत्याही औषधाने रोगावर सर्वकाळ आणि पूर्णपणे मात केली असे कधीच होत नाही.

त्यामुळे आपल्याला नेहमीच सावध राहावे लागणार आहे. कारण लस किंवा औषध 100 टक्के लोकसंख्येवर काम करतेच असेही नाही. जेव्हा आपण लस तयार करतो तेव्हा असे मानले जाते की, 50-60 टक्के लोकांवर जर त्याचा चांगला परिणाम होत असेल तर तिला यशस्वी लस म्हणता येईल. याचा अर्थ असा की, 30-40 टक्के जनतेला लसीद्वारे संरक्षण मिळणार नाही.

प्लाज्मा ही लस नसून एक वेगळ्या प्रकारची उपचारपद्धती आहे. कारण प्लाज्मा ज्या लोकांकडून घेतो त्यांच्या प्लाज्मामध्ये प्रतिपिंडे/प्रतिद्रव्ये (अँटीबॉडीज) असतात. ती विषाणूंवर हल्ला करू शकतात. जो माणूस कोरोनापासून मुक्त झाला आहे, त्याच्या शरीरात अँटीबॉडीज असतात आणि या अँटीबॉडीज कोरोना रुग्णाच्या शरीरात सोडल्या तर तो रुग्ण कोरोनावर मात करू शकेल, अशी अपेक्षा असते.

एखाद्या रोगावर लस तयार करायची तर पुढीलप्रमाणे टप्पे असतात

संशोधन

या प्रथम टप्प्यात नैसर्गिक किंवा संश्लेषित प्रतिजनाचा शोध घेणे, जो मारक/प्रभावी प्रतिद्रव्य निर्मितीला चालना देईल; जेणेकरून रोगकारकाला प्रतिबंध घालू शकेल किंवा त्याचा प्रभाव कमी करू शकेल. 2. चिकित्सापूर्व (प्रि-क्लिनिकल) स्थिती : हा पुढील टप्पा आहे. या टप्प्यात ऊती-संवर्धन किंवा पेशी-संवर्धन पद्धतीने प्रतिजन मोठय़ा प्रमाणावर वाढवले जाते. अशा संवर्धित पेशी किंवा ऊतींचा प्रयोग प्रथम प्राण्यांवर करतात; त्या पेशी प्राण्यात संबंधित रोगाविरुद्ध प्रतिक्षमता निर्माण करू शकतात किंवा नाही हे पाहिले जाते. बहुतेक वेळा लसीसाठी निवडलेले अनेक प्रतिजन-उमेदवार पहिल्याच वेळी अयशस्वी ठरतात; कारण ते रोगाविरुद्ध प्रतिक्षमता तर निर्माण करू शकत नाहीतच, उलट रुग्णाला हानी पोहोचवण्याचे कार्य करतात. अशा वेळी दुसऱ्य़ा प्रतिजन-उमेदवाराचा शोध घेतला जातो. त्यात यश मिळाल्यानंतर पुढील वाटचाल सुरू होते.

चिकित्सालयीन (क्लिनिकल) टप्पा

या टप्प्यात संशोधन-संस्था, अन्न आणि औषध महामंडळ (एफडीए) यांच्याकडे नवीन लसनिर्मितीसाठी अर्ज करतात. आणि या अर्जात नवीन औषधी द्रव्याच्या चाचण्या ते कशाप्रकारे घेऊ इच्छितात, हे नमूद केले जाते. त्यानंतर ती संशोधन संस्था समीक्षकांची एक बैठक बोलावते; त्यांच्याकडून मान्यता मिळवते. एफडीएला अर्ज केल्यानंतर
30 दिवसांत मान्यता/नकार द्यावा लागतो. एफडीएकडून मान्यता मिळाल्यावर मानवी चाचण्यांचे तीन टप्पे पार पाडावे लागतात.
नियामक मंडळ निरीक्षण व मान्यता (रेग्युलेटरी रिह्यू आणि ऍप्रूव्हल) : तीन मानवी चाचण्या यशस्वीरीत्या पार पाडल्यानंतर ती संस्था एफडीएकडे बी.एल.ए. म्हणजे बायोलॉजिक्स लायसेंस ऍप्लिकेशन करते, म्हणजेच परवान्यासाठी अर्ज करते.

उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग)

परवाना मिळाला की मोठय़ा प्रमाणावर उत्पादनाची प्रक्रिया सुरू होते.

दर्जा नियंत्रण (क्वालिटी कंट्रोल)

परवाना, उत्पादन आणि वितरण झाले म्हणजे संस्थेचे काम संपले असे नाही. लस कशी कार्य करते, तिचे परिणाम / दुष्परिणाम, लसीचा दर्जा हेही पाहणे संस्थेची जबाबदारी आहे. लसीची कार्यप्रवणता व सुरक्षितता व्यवस्थित राखली जाईल याची काळजी संस्थेलाच घ्यावी लागते.

सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव हिंदुस्थानात कमी झाल्यासारखा वाटत असला तरी तो संपलेला नाही आणि परत येईल का, याची भीती आहेच. त्यावर लस शोधण्यासाठी अनेक राष्ट्रांत चढाओढ आणि प्रयत्न चालू आहेत. चढाओढीतील प्रत्येक स्पर्धकाला वाटते की, आपली लस प्रथम बाजारात यावी आणि श्रेय प्रथम आपल्याला मिळावे. रशियाने आपली लस बाजारात प्रथम आणली, परंतु सध्या तरी ती रशियापुरतीच मर्यादित आहे.

नुकताच रशियाने हिंदुस्थानातील रेड्डीज लॅबोरटरीशी ‘स्पुटनिक-5’ या लसीच्या 10 कोटी मात्रा (डोस) पुरवण्याचा करार केला आहे. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने शोधलेल्या लसीच्या मानवी चाचण्या चालू आहेत. या लसीचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन हिंदुस्थानातील सिरम इन्स्टिटय़ूट करणार असून पुढील तीन-चार महिन्यांत ही लस बाजारात येण्याची शक्यता वर्तवली जातेय. अमेरिकेच्या मॉडर्ना कंपनीच्या लसीच्या मानवी चाचण्या चालू असल्याचे वाचनात आले. हिंदुस्थानी लस ‘कोवॅक्सिन’ हीसुद्धा प्रगतिपथावर आहे.