मुद्दा – कोरोनाला हरवूया, सकारात्मक राहूया!

>> सीमा श्रीराम शास्त्री-मोडक

सध्या कोविडने पुन्हा एकदा उसळी मारली आहे. मागच्या वर्षी 22 मार्चला जनता कर्फ्यू होता. त्यावेळी कोरोनाने हिंदुस्थानात बस्तान मांडलं होतंच, पण या वर्षी तर मार्चमध्ये कहरच केला आहे. मध्यंतरी सगळीकडे कोविडचे रुग्ण बोटांवर मोजण्याइतके मिळत होते तेव्हा सगळय़ांची खात्री झाली की, हा कोरोना जाईल, पण मला वाटतं ती वादळापूर्वीची शांतता होती.

सगळय़ा प्रसारमाध्यमांतून कोरोनाशी कसं लढायचं? त्याच्यापासून स्वतःला वाचवायचं? काय प्यायचं? काय खायचं? आपली जीवन पद्धती कशी ठेवावी? कोणत्या क्रियांनी आपली प्रतिकारशक्ती वाढते? जलनीती, योगासने, प्राणायाम, व्यायाम…एक ना अनेक मार्ग सगळय़ा तज्ञांनी सांगितले. मास्क आणि सॅनिटायझर्स तसेच साबणाचे महत्त्व आयुष्यात कधी पटलं नाही एवढं पटलं आणि त्याचा आपण बहुतांश लोक वापर करू लागलो.

सगळय़ा उपाययोजना करून झाल्या. अगदी कोरोनाची लस पहिली, दुसरी घेऊन झाली तरी काहींना कोरोना झालाच. काही दवाखान्यात ऍडमिट होतात तर काही घरीच एकांतात राहणं पसंत करतात. या दोन्ही बाबी काहीशा अवघड वाटतात, पण खरं सांगू, अवघड वाटणारी वाट जर सोपी करायची असेल तर आधी मनाची तयारी करावी. आपलं मन जर तयार झालं ना तर आपण ‘एव्हरेस्टही’ सर करू शकतो. मग कोरोना क्या चीज है!

याचा अर्थ कोरोनाला खूप सहजतेने घेऊ नकाच, पण जर आपल्यावर दवाखान्यात जाण्याची, राहण्याची किंवा घरीच आयसोलेशन/क्वारंटाईन होण्याची वेळ आली तर घाबरून जाऊ नका. प्रत्येक समजूतदाराला कोरोनाच्या भीतीने पछाडलंच आहे. त्याच वेळी आपण आपल्या अंतर्मनात मला कोरोना झाला तर मी काय करेन याचा थोडासा तरी विचार केलेला असतो. मग जर आपण तोच विचार सकारात्मक केला तर? सगळय़ात आधी पुन्हा एकदा उजळणी करूया. खूप महत्त्वाचं असेल तरच घराबाहेर जाऊया. गर्दीची ठिकाणं टाळायलाच हवीत. हॉटेल्स, लग्न, वाढदिवस, पार्टी, अंत्ययात्रा या ठिकाणी जाणं टाळूया आणि कोणाला आपल्या घरी याच किंवा इतर गर्दी करणाऱया कारणांसाठी बोलावणं टाळूया.

त्यामुळे रागवू नका आणि आपल्या भावनांना मुरड घाला. फोन, मेसेज, व्हिडीओ कॉल करूनच संपर्कात रहा. याचा अर्थ कोविड झालेल्या आपल्या जवळील कुटुंबाला मदत करू नका असा नक्कीच नाही. त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राहून त्यांच्या जेवण-नाश्त्याची सोय नक्की करा. या काळात एकमेकाला भावनिक मदतीची गरज आहे. ती मदत म्हणजे ‘धीर देणं’, ती करा.

हाच धीर, संयम आपल्या बाबतीतही असू द्या. कोरोनाच्या काळात दवाखान्यात राहण्याची वेळ आलीच तर अजिबात घाबरून जाऊ नका. ताप, सर्दी, अशक्तपणा, भूक न लागणे अशी तक्रार साध्या आजारातही असतेच. मग कोरोना झाला म्हणजे सगळं संपलं असं अजिबात नाही. तर थोडं संयमाने घ्या. डॉक्टरांना सहकार्य करा. ते दिवस-रात्र आपल्या तब्येतीसाठी झटत आहेत. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागा. सकारात्मकता ठेवा. दवाखाना, तेथील वातावरण, जेवण, इतर सोयी, डॉक्टर्स, नर्स व इतरांना नावं ठेवू नका. उलट त्यांच्या सेवाभावाचा आदर करा. त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्या बरोबर इतर कोरोनाबाधित रुग्ण असतील तर त्यांच्याशी छान गप्पा मारा.

तुमच्यात जर ताकद असेल तर छान गाणी म्हणा. तुमच्यात जर एखादी कला असेल तर ती इतरांसमोर सादर करा. मग चित्रकला, मेंदी किंवा अन्य तुमच्यातील गुण असतील तर ते सादर करा. म्हणजे शक्यतो निरुत्साही, निराश न होता आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करून आनंदात ‘ते दिवस’ काढा. मग बघा औषधाची मात्रा बरोबर लागू होऊन तुम्ही लवकर बरे होऊन घरी जाल आणि हो, सोबत कागद आणि पेन नक्की न्या. का? कारण इतकी वर्षे तुम्ही सगळय़ांसाठी वेळ दिला. आता या वेळी तुम्ही तुमच्या मनात काय करायचे आहे किंवा भविष्यातील योजना लिहा. तुमच्या करायच्या राहून गेलेल्या गोष्टी, आयुष्यातील आनंदाचे क्षण, घटना लिहा. तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काय वाटते ते लिहा आणि घरी गेल्यावर त्यांना द्या. आपण आपल्या स्वभावात, आचार-विचारात काय बदल करायला हवा?

सगळय़ात महत्त्वाचं, दवाखान्यातील डॉक्टर्स व इतर स्टाफचे घरी येताना आभार मानायला विसरू नका. कारण त्यांच्या सेवाभावामुळेच तुम्ही ठणठणीत बरे होता. आपल्या अस्तित्वाने दवाखान्यातील वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करा. हो, पण हे सगळं करताना स्वतःची काळजी घ्या. कारण ‘सर सलामत तो पगडी पचास.’ मला वाटतं, दवाखाना काय किंवा घर काय, दोन्ही ठिकाणी ‘मन’, विचार सकारात्मक ठेवा. रुग्णांच्या आसपासच्या व्यक्तींनीदेखील त्यांना हीनपणाची, अपराधीपणाची भावना देऊ नका. आपण सगळेच ‘कोरोना’ या भयंकर चक्रव्यूहात अडकलो असलो तरी ‘लसरूपी’ बाणाने हे चक्रव्यूह आणि मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करून कोरोनाचे हे चक्रव्यूह भेदून त्यातून सुरक्षितपणे बाहेर येऊया.

आपली प्रतिक्रिया द्या