India Vs England Test Series – हिदुस्थानी संघात बदल हवाच !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

क्रिकेट हा खेळ लहरी आहे. तो कधी कुणाला अंतराळात घेऊन जाईल आणि अंतराळातून पृथ्वीवर आणून सोडेल हे सांगता येत नाही.

हिंदुस्थानी क्रिकेट संघाने अंतराळ आणि पृथ्वी फिरण्याचा अनुभव अक्षरशः दहा दिवसांत घेतला. आमचा वासू परांजपे नेहमी म्हणायचा, ‘चांगले निर्णय घ्यायला क्रिकेटच्या इतिहासाचा अभ्यास हवा. विशेषतः इंग्लंडमध्ये हा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. ‘पण हल्ली इतिहास हा विषय कॅप्टन आणि प्रशिक्षक यांनी बहुदा ऑप्शनला टाकलेला असतो. ज्या मैदानावर क्रिकेट खेळलं जातं त्या मैदानावर आधी घेतलेले निर्णय आपला निर्णय घेताना अतिशय उपयुक्त ठरतात. पण हिंदुस्थानी संघाने त्याचा विचारच केलेला दिसत नाही.
2000 सालापासून लीडस्वर टॉस जिंकून कुठल्याही संघाने फलंदाजी घेतली नव्हती. काहीतरी कारण असेल ना यामागे?

इतिहास ऑप्शनला टाकल्यामुळे आपण पाहिली फलंदाजी घेतली. आणि आपला 78 धावांमध्ये ऑलडाऊन झाला.

इतिहासाचा अभ्यास मात्र अँडरसनने केला होता. लीड्सच्या मैदानालाही उतार आहे. अँडरसनला हेडिंग्लेमध्ये 2016पूर्वी फारसं यश मिळालेलं नव्हतं. त्याने तब्बल 41च्या सरासरीने तिथे फक्त 19 बळी घेतले होते. 2016 साली त्याच्या लक्षात आलं की फुटबॉलएंडच्या टोकाकडून म्हणजेच चढावरून जर धावत जाऊन गोलंदाजी केली तर ती उपयुक्त ठरते. आणि त्यानंतर त्याने पुढच्या 4 सामन्यांत फक्त 12च्या सरासरीने 23 बळी घेतले. यावेळीही त्याने तो इतिहास पक्का लक्षात ठेवून त्या टोकाने गोलंदाजी टाकली आणि 8 षटकाच्या अविश्वसनीय स्पेलमध्ये त्याने फक्त 6 धावा देऊन 3 महत्त्वपूर्ण बळी घेतले. त्याने का कुणास ठाऊक दुसऱया डावात पुन्हा इतिहास बाजूला ठेवला आणि समोरच्या बाजूने उतारावरून धावत येत गोलंदाजी केली आणि अँडरसनचे चेंडू वाट चुकले. तसं होणं म्हणजे पतिव्रतेचा पाय घसरणं होतं. फॉर्मात नसलेला पुजारासुद्धा मग त्याच्या गोलंदाजीवर धावा काढून गेला.

या मालिकेत आजपर्यंत हिंदुस्थानी संघाला राहुल आणि रोहित या जोडीने चांगली सुरुवात करून दिली होती. इथे पहिल्याच षटकात अँडरसनने राहुलची विकेट घेतली आणि आधीच आत्मविश्वास नसलेली मधली फळी थेट अँडरसनच्या नव्या चेंडूच्या वादळात सापडली. आपण नेहमी पुजारा, रहाणेच्या अपयशाबद्दल बोलतो पण कोहलीचं अपयश काही कमी नाहीये. मागच्या पुण्याईच्या झगमगाटात ते आपल्याला दिसत नाही. 2019मध्ये त्याने शेवटचं शतक ठोकलं. त्यानंतरची त्याची सरासरी या इनिंगपर्यंत म्हणजे लीडस् कसोटीच्या पहिल्या डावापर्यंत फक्त 23 होती.

रोहित शर्मा त्याच्या फलंदाजीची आता एक वेगळी बाजू दाखवतोय. ती संयमाची बाजू आहे. संयमी रोहित शर्माला पाहताना थोडा आनंदही होतोय. त्याने त्याचं बचावात्मक तंत्रसुद्धा सुधारलं. पण तरीही संयमी रोहित शर्माला पाहताना सलमान खानला देवदासची भूमिका करताना पाहिल्यासारखं वाटतं. कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला फटक्यांबरोबर चांगलं तंत्र आणि संयम यांची गरज असते आणि इंग्लडमध्ये तर ती असतेच असते. पण खूप वेळा ज्यावेळेला तुम्ही बचावात्मक मूडमध्ये जाता त्यावेळेला मग पटकन बाहेर येऊन गिअर बदलणं कठीण होतं. या डावामध्ये म्हणजे पहिल्या डावामध्ये त्याने 19 धावा करण्यासाठी तब्बल 105 चेंडू घेतले आणि त्यानंतर त्याच्या देवदास झालेल्या बॅटचा संयम सुटला. आखूड टप्प्याचा चेंडू त्याला चंद्रमुखीसारखा दिसला. त्या आकर्षणात तो गुंतला आणि तो जो फटका मारला तो थेट त्याने मिड ऑनला सोपा झेल दिला. रोहित शर्मा नेहमी चांगल्याच चेंडूवर आपली विकेट देतो असं नाही. पण हे तर अत्यंत कुपात्री असं दान होतं.

रोहित शर्माची विकेट मिळाल्यानंतर लॉर्डस्ची चूक इंग्लंडने पुन्हा केली नाही. इंग्लंडने हिंदुस्थानचं शेपूट गुंडाळण्यासाठी बाऊन्सर वगैरेचा काही उपयोग केला नाही. त्यांनी खोलवर टप्पा ठेवला आणि स्विंग, यॉर्करने त्यांना यश मिळवून दिलं. लीडस्च्या पहिल्या दिवसाची सकाळ ही फक्त अँडरसनची सकाळ नव्हती. ऑली रॉबिन्सन, ओव्हरटन आणि सॅम करणचीही ती सकाळ होती. अँडरसनने बुंध्यावर घाला घातला आणि मग इतरांनी हिंदुस्थानी फलंदाजीच्या मोठय़ा फांद्या तोडल्या.

तिसऱया दिवशी हिंदुस्थानी फलंदाजांनी लढाऊ वृत्ती दाखवली. खेळपट्टी अर्थातच फलंदाजीला पोषक होती आणि इंग्लिश गोलंदाजांचे चेंडूही स्विंग होत होते पण पुजारा आणि कोहलीला इनस्विंगवर बाद करण्याच्या ओघात बऱयाच वेळेला अँडरसनचे चेंडू हे पुजाराच्या पायावर गेले आणि पुजाराने त्याचा पूर्णपणे फायदा उठवला आणि पुजारा अक्षरशः सेट झाला. बुडणाऱया पुजाराला अँडरसनच्या या पायावरच्या चेंडूंनी अक्षरशः आधार दिला. बुडत्याला काडीचा नाही तर हा लाइफ बोटचा आधार होता. रोहित शर्मानेही अत्यंत जबाबदारीने फलंदाजी केली पण पन्नाशी ओलांडली आणि तो अडखळला. पन्नाशीनंतर कुठेतरी त्याचं कॉन्सन्ट्रेशन गेलं आणि इंग्लंडमध्ये एकाग्रता जाऊन चालत नाही. कारण चांगला चेंडू हा पुढच्या वळणावर तयार असतो. त्यामुळे प्रत्येक चेंडू हा डोळ्यांत तेल घालून खेळावाच लागतो.

कोहलीने आल्यावर आपला जम बसवला. पण रूट एक अतिशय मस्त डावपेच खेळला. तिसऱया दिवशी संध्याकाळी त्याने फिरकी गोलंदाजी स्वतः टाकली आणि मोईन अलीला दिली. अंधुक प्रकाशाचा फायदा घेऊन त्याने पटापट षटकं उरकली. 80 षटकांनंतर त्याने पंचांना वेगवान गोलंदाजांना चेंडू देतो असं सांगितलं त्यामुळे पंचांनी अर्थातच डाव बंद केला. त्याचा त्याला फायदा असा झाला की, दुसऱया दिवशी सकाळी खेळपट्टीत प्रज्वलित झालेले निखारे असताना त्याने नवीन चेंडू घेतला आणि यावेळेला इंग्लिश गोलंदाजांनी त्यांची दिशा चुकवली नाही. टप्पा चुकवला नाही. पुन्हा चेंडू त्यांनी उत्कृष्टरीत्या स्विंग केले. यावेळी ऑली रॉबिन्सनने प्रमुख भूमिका घेतली. बघता बघता तो चांगला गोलंदाज झालाय . मग ‘ढुंडो ढुंडो रे साजणा’ सुरू झालं.

‘तुमने पुकारा और हम चले आये, विकेट हतेली पे लेके आये,’ हे गीत हिंदुस्थानी फलंदाजांनी आऊटस्विंगवर पुन्हा सुरात म्हटलं. यावेळी इनस्विंगरने पुजाराला 91 धावांवर रोखलं. विराट कोहलीने आपलं अर्धशतक पूर्ण केलं पण पुन्हा बाहेरच्या चेंडूला ड्राइव्ह मारताना तो स्लिपमध्ये बाद झाला. इंग्लडमध्ये एक गोष्ट जाणवली की हिंदुस्थानी फलंदाजी कधी कोसळेल हे सांगता येत नाही. म्हणजे आदल्या दिवशी 2 बाद 215 होती तर पुढच्या 41 धावांमध्ये 8 विकेटस् पडल्या आणि हिंदुस्थानी संघ हरला.

एक गोष्ट याच्यातून दिसते की हिंदुस्थानी संघामध्ये बदल होण्याची गरज आहे. रहाणेने विश्रांती घेऊन परत यावं. पंत, स्विंगसमोर गरबा खेळतोय. अजून खरं तर गरब्याचे दिवस यायला वेळ आहे. योग्य तंत्र दाखवलं नाही तर आक्रमक फलंदाज बेफिकीर ठरतो.

मधल्या फळीत बदल होण्याची गरज आहे. एक फलंदाज वाढवण्याची गरज आहे पण या सगळ्या गोष्टीसाठी विराट कोहलीला त्याचा हट्ट सोडावा लागेल.

एक वेळ चांदोबातला विक्रम हट्ट सोडेल पण विराट?
हिंदुस्थानी संघातील विक्रम वेताळ अधिक हट्टी आहेत.