टीम इंडियाचं टायटॅनिक!

टायटॅनिक बोट जेव्हा बांधली गेली तेव्हा ती बांधणाऱया मालकाने मोठय़ा अभिमानाने सांगितलं होतं, ही बोट कधीही बुडू शकणार नाही. त्यामुळे त्या बोटीवरच्या जीवरक्षक बोटीसुद्धा कमी करण्यात आल्या होत्या. पण तिच्या पहिल्याच प्रवासात एका आइसबर्गने तिला समुद्राच्या पोटात नेऊन कायमचं बसवलं. टीम इंडियाचंही तस्संच झालं. पहिले दहा सामने लिलया जिंकल्यानंतर अकरावा सामना जिंकणं हे विधीलिखीत वाटत होतं, पण आयुष्यात एखादी छोटी गोष्टही तुमचा शो उलथवून टाकते. हिंदुस्थानचा फायनल शो असाच उलथला गेला.

त्याची सुरुवात डावाच्या सुरुवातीपासूनच झाली. ज्या खेळपट्टीवर हिंदुस्थानी संघाने पाकिस्तानला हरवलं होतं तीच खेळपट्टी निवडायची चूक हिंदुस्थानने केली. खरंतर त्यांना तसा मोह झाला, असं म्हटलं पाहिजे. या विश्वचषकात दर्जेदार फिरकी गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन संघ एकदा हरला होता. मग ती हिंदुस्थानची असेल किंवा अफगाणिस्तानची असेल किंवा दक्षिण आफ्रिकेची. अशीच खेळपट्टी निवडली जाईल, अशी अपेक्षासुद्धा ऑस्ट्रेलियाला होती. त्यामुळे अशा खेळपट्टीसाठी काय आखणी करायला पाहिजे, हे ऑस्ट्रेलियाने आधीच ठरवलं होतं. अत्यंत सुंदर अशी आखणी ऑस्ट्रेलियन संघाने केली आणि जवळपास जशीच्या तशी ती मैदानात उतरवलीसुद्धा. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर अनेक दिग्गजांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.

अंतिम सामन्यात चक्क धावांचा पाठलाग करायचा? 1996 सालीलाहोर – गद्दाफीवरच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध श्रीलंकेने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली होती, त्या वेळी इम्रान खानने अर्जुना रणतुंगालाही असेच वेडय़ात काढलं होतं. तेव्हाही श्रीलंकेने तो सामना पाठलाग करून जिंकला होता. या वेळीसुद्धा ऑस्ट्रेलियाला आपण नेमपं काय करतोय, याची पूर्ण जाणीव होती. रात्री दवाचा फायदा कसा उठवता येईल, याचा व्यवस्थित विचार त्यामागे होता. तो कसा यशस्वी ठरला हे आपण डोळ्यांनी पाहिलं.

हिंदुस्थानचा कर्णधार रोहित शर्माने सुरुवात नेहमीप्रमाणेच निःस्वार्थी आक्रमणाने केली. पण हे निःस्वार्थी आक्रमण कधी-कधी लक्ष्मणरेषा ओलांडतं आणि बेदरकार बनतं. मॅक्सवेलच्या ऑफस्पिनचा फायदा उठवताना त्याची मनःस्थिती कांचनमृगाच्या मोहात पडलेल्या सीतेसारखी झाली.

एक षटकार, एक चौकार मिळाल्यावर त्याला आणखी एक षटकार मारायचा मोह झाला आणि ट्रव्हिस हेडने कव्हर क्षेत्रात आयुष्यातला सर्वोत्कृष्ट झेल घेतला. त्या वेळी त्याला लक्षात आलं नसेल, हा नुसता झेल नाही तर हा वर्ल्ड कप आहे. पुढे चूक विराट आणि राहुलच्या जोडीने केली. वन डेच्या नव्या नियमाप्रमाणे 11 ते 40 षटके फलंदाजांसाठी कमीत कमी जोखीम घेऊन धावा लुटण्याची असतात. कारण वर्तुळाबाहेर चार क्षेत्ररक्षक असतात. या वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीने आपल्या शतकांचा पाया आणि काही मजले याच ओव्हर्समध्ये उभारलेत. वर रोहित शर्माने वेगात धावा केल्यामुळे त्याला त्या शतकांच्या वेळी जोखीम घेऊन फलंदाजी करावी लागली नाही. त्याचं विक्रमी पन्नासावं शतक तर झालं होतं. पण कदाचित अंतिम सामन्यात जिंकताना एखाद्या मौलिक हिऱयाप्रमाणे आपल्या मुकुटात शतक असावं, याचा मोह कोहलीला झाला असावा. त्याने चेंडू ढकलण्यापलीकडे किंवा एकेरी-दुहेरी धावा काढण्यापलीकडे किंचितसुद्धा जोखीम घेतली नाही. ना समोर राहुलने घेतली. त्यामुळे सुरुवातीची आतषबाजी सोडली तर पुढे चार-पाचच चौकार मारले गेले. म्हणजे कर्णधाराने जोखीम घेऊन 10 षटकांत 80 धावा फटकावल्या. त्याचा सर्व परिणाम पुसला गेला. मुख्य म्हणजे या ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी टाकली. क्षेत्ररचना आणि फलंदाजांच्या कमकुवत व ताकदवान दुव्यांप्रमाणे गोलंदाजी कशी टाकावी याचं ते प्रात्यक्षिक होतं. त्यामुळे हिंदुस्थानी संघाला किमान 40-50 धावा कमी पडल्या.

ना वर्ल्ड कप जिंकू शकलो, ना विराट आपलं शतक पूर्ण करू शकला. या सगळ्या धावा रोखताना ऑस्ट्रेलियन संघाने जे क्षेत्ररक्षण केलं ते पाहाणं हा आनंद आणि शिक्षण होतं. पाण्यात सूर मारावा तसा ते गवतावर सूर मारत होते. जणू क्रिकेटऐवजी वॉटरपोलोचा खेळ असावा. हिंदुस्थानी वेगवान गोलंदाजांनी सुरुवात तर सुसाट केली. चेंडू भन्नाट स्विंग होत होते. पण त्या भन्नाट स्विंगला नियंत्रणात कसं ठेवावं हे फक्त बुमराला माहीत होतं. मागचे डावपेच बदलून नवा चेंडू हा सिराजऐवजी शमीला देण्यात आला. शमीने सवयीप्रमाणे पहिल्याच षटकात विकेट काढली. पण भन्नाट स्विंग होणारा चेंडू त्याला ताब्यात ठेवायला जमलं नाही.

3 बाद 47 अशी ऑस्ट्रेलियाची अवस्था असताना हिंदुस्थानी संघ टॉपवर होता. पण मग हेड आणि लाबुशन यांच्या भागीदारींनी एक वेगळीच गीता आपल्या डोळ्यांसमोर ठेवली. लाबुशनने थेट कसोटी फलंदाजाप्रमाणे फलंदाजी केली. हेडनेसुद्धा आपलं डोपं शांत ठेवलं. मान खाली घातली आणि अप्रतिम फलंदाजी केली. पण विराट कोहलीप्रमाणे मोठय़ा फटक्यांची जोखीम आपल्या पाठय़पुस्तकातून पूर्णपणे काढली नाही. संधी मिळताच त्याने मोठे फटकेसुद्धा मारले. 3 बाद 170च्या आसपास हिंदुस्थानी संघाने सामना सोडून दिल्यासारखं वाटलं. त्यांच्या शारिरीक भाषेतून फक्त तेवढाच अर्थ निघतोय, असं वाटत होतं.

दव म्हणा किंवा आणि काही. खेळपट्टी फलंदाजीसाठी उत्तम वाटू लागली. ऑस्ट्रेलियन संघाने स्वीकारलेले क्षेत्ररश्रण पूर्णपणे यशस्वी ठरलं. हा ऑस्ट्रेलियन संघ स्टीव्ह वॉ, रिकी पॉण्टिंच्या संघासारखा ताकदवान नव्हता. अक्रोडाप्रमाणे कठोर कवच त्याच्याभोवती आहे, असं जाणवतही नव्हतं. पण शेवटी तो ऑस्ट्रेलियन संघ आहे. वाघ तरुण असो किंवा म्हातारा, तो लांडगा होऊ शकत नाही. सर्वोच्च स्टेज आल्यावर त्याने आपला खेळ खूप उंचावला आणि आकाशाला भिडलेल्या हिंदुस्थानी संघाची उंची खुजी करून टाकली!