ध्येयाने झपाटलेले दादासाहेब फाळके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> विवेक पुणतांबेकर

विसाव्या शतकाच्या प्रारंभी अनेक शोध लागले ज्यांनी माणसांचे जीवन आमूलाग्र बदलून टाकले. यात सिनेमाची जादू जगभर वेगाने फैलावली. हिंदुस्थानातही तिचा प्रसार झाला. एक सुशिक्षित हरहुन्नरी महाराष्ट्रीयन तरुण या वेडाने झपाटून गेला. पाश्चिमात्य लोकांकडे असलेले तंत्रज्ञान आपल्याला आलेच पाहिजे या भावनेने अतिशय प्रतिकूल परिस्थितीत यावरची पुस्तके वाचून ही विद्या शिकतो. कुठलेही पैशाचे पाठबळ नसतानाही जिद्दीने पैसे उभारून सिनेनिर्मितीची सुरुवात करून चित्रपटसृष्टीचा पाया घालतो. केवढी विलक्षण घटना. त्या वेळी लावलेल्या लहान रोपटय़ाचे अतिविशाल वृक्षात रूपांतर झाले. हे ज्यांच्यामुळे घडले त्या दादासाहेब फाळके यांची 150वी जयंती 30 एप्रिलला झाली. त्यानिमित्त दादासाहेब फाळके यांच्या कर्तृत्ववान जीवनाचा परिचय…

वेदशास्त्री घराण्यात जन्मलेल्या धुंडिराज ऊर्फ दादासाहेब फाळके यांना पारंपरिक पौराहित्याचा व्यवसाय करायचा नव्हता. लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे दादासाहेब सुंदर मखर बनवत. गणपती उत्तम तयार करत. शालेय शिक्षण नाशिकमध्ये संपवून जे.जे. स्कूलची पदविका घेतलेले दादासाहेब बडोदा येथे कलाभवनला शिकायला गेले. प्रोफेसर गज्जर यांनी त्यांचे गुण हेरून फोटोप्रोसेसिंग शिकवले. इथेच ते अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, मेकअप, सेट डिझायनिंग शिकले. तसेच जादूविद्येतही पारंगत झाले. मग उपजीविकेसाठी गोध्रा येथे अनेक उद्योग केले. फारसे यश लाभेना. तशातच विवाह झाला, पण प्रथम पत्नी प्लेगच्या साथीत दगावली. उदास झालेले दादासाहेब परत बडोदा येथे आले. नाटकाचे पडदे रंगवायचे काम करू लागले. इथे त्यांचा द्वितीय विवाह कावेरी करंदीकर यांच्याशी झाला. अतिशय विरुद्ध स्वभावाचे जोडपे होते. दादासाहेब शीघ्रकोपी तर कावेरीबाई शांत व सोशिक. मग दादासाहेब मुद्रण व्यवसायात शिरले. यशस्वी झाले. एका धनिकाने भांडवल दिले. लक्ष्मी आर्ट प्रिंटिंग प्रेस सुरू झाला. अतिताणामुळे तात्पुरते अंधत्वही आले, पण नशिबाने परत दृष्टी आली. नियती अशी की, या यशस्वी उद्योगातून त्यांना बाहेर पडावे लागले. याच कालखंडातल्या एका घटनेने त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. एक अमेरिकन सिनेमा कंपनी मुंबईत हरकिशनदास हॉस्पिटल शेजारी सिनेमाचे खेळ दाखवीत होती. सिनेमा पाहायला गेलेले दादासाहेब इतके झपाटले की ही जादू पत्नीला दाखवली. तिथे फेकून दिलेले फिल्मचे तुकडे घरी आणून टॉय कॅमेऱयाच्या सहाय्याने पडद्यावर दाखवायचा नाद त्यांना लागला आणि आपण सिनेमानिर्मिती करायचीच या ध्येयाने ते पछाडले गेले. त्या विषयावरची अनेक पुस्तके वाचून, पत्नीचे दागिने गहाण ठेऊन ते सिनेनिर्मितीची साधने आणायला इग्लंडला गेले. मेट्रो सिनेमा जवळच्या फोटो दुकानाचे मालक यशवंत नाडकर्णी यांनी त्यांना आर्थिक सहाय्य दिले.

या आधीही हिंदुस्थानात सिनेनिर्मितीचे प्रयत्न झाले होते. फोटोग्राफी सामान आयात करणारे दादा सावे यांनी दोन पहिलवानांची कुस्ती, माकडांचे खेळ, लॉर्ड कर्झनचा दरबार असे छोटे सिनेमे तयार केले होते. कोलकाता येथे हिरालाल सेन, ज्योती सरकार, जे.एफ मादन यांनीही चित्रनिर्मिती करायचा प्रयत्न केला होता. दादासाहेब तोरणे आणि नानाभाई चित्रे यांनी भक्त पुंडलिक हा सिनेमा निर्माण केला, पण पहिल्याच खेळात प्रिंट जळून गेली. हे सगळे प्रायोगिक प्रयत्न होते. यात सातत्य नव्हते. खऱया अर्थाने सिनेमासृष्टीची व्यावसायिक सुरुवात दादासाहेब फाळके यांच्या राजा हरिश्चंद्र सिनेमाने झाली आणि म्हणूनच त्यांना हिंदुस्थानी सिनेसृष्टीचे जनक म्हणतात.

पहिला सिनेमा निर्माण करताना अनंत अडचणींचा डोंगर होताच. हरिश्चंद्र तारामतीचे कथानक निवडले खरे, पण मदतीला नोकर नाहीत. अशा वेळी घरच्यांची मदत घेऊन यंत्रसामग्रीची जुळवाजुळव, फिल्मला भोके पाडणे, कथानक लिहिणे, सेटिंगचे स्केचेस बनवणे, डेव्हलपिंग करणे, भांडवल उभे करणे या कसरती कराव्याच लागल्या, पण सगळ्यात कसोटी अभिनेते निवडायची होती. यासाठी पेपरला जाहिरात दिली. नको असलेले नट-नटय़ा आल्या. योग्य ते नट शोधताना खूप त्रास झाला. आऊटडोअर शूटिंगला पोलिसांनी त्रास दिला, फक्त सूर्यप्रकाशात शूटिंग करावे लागायचे. त्यामुळे सकाळी साडेअकरापूर्वी व दुपारी अडीचनंतर शूटिंग करावे लागे. परफेक्शनिष्ट असल्याने 3700 फूट लांबीचा सिनेमा पूर्ण करायला दादासाहेबांना आठ महिने लागले. काही निमंत्रितांसाठी एक खास खेळ आयोजित केला. त्यांच्या प्रतिक्रिया पाहून उत्तेजित झालेल्या दादासाहेबांनी 3 मे 1913 ला कॉरोनेशन थिएटरमध्ये राजा हरिश्चंद्र सिनेमा रिलिज केला. तिकीट होते एक आणा. पहिल्या दिवशी फक्त 24 प्रेक्षक. या मग तिकीट दोन पैसे ठेवले तरी प्रतिसाद नाही, मग बक्षिसांची लालूच दाखवली. पुण्यात एका थिएटरवाल्या पाठकांची चक्की शेजारी होती. त्यांनी जाहीर केले दळण दळून घेतले तर तितक्या रकमेची तिकीटे देणार. यात चक्कीचा पण धंदा झाला आणि सिनेमाचा पण झाला. सुरतला दादासाहेबांनी कल्पक जाहिरात दिली फक्त दोन आण्यात दोन मैल लांबीचे पाऊण इंच रुंदीचे 57,000 फोटो पहा. जाहिरातीचा जबरदस्त परिणाम झाला आणि 23 दिवस तुडूंब गर्दीत सिनेमा धंदा करू लागला.

या नंतर दादासाहेबांनी सिनेनिर्मिती नाशिकहून सुरू केली. पहिला सिनेमा मुंबईत निर्माण केला होता. यानंतर भस्मासुर मोहिनी आणि सत्यवान सावित्री हे दोन यशस्वी सिनेमे निर्माण करून ते कर्जमुक्त झाले. देशात 700 सिनेमागृहांना दादासाहेबांचे सिनेमे प्रदर्शनासाठी हवे होते. 20 प्रती परदेशात हव्या होत्या. विजेवर चालणारी सामग्री हवी होती त्यासाठी ते परत इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी आपले तीनही सिनेमे दाखवले. तेथील लोक चकित झाले. लंडनमध्ये हिंदुस्थानी सिनेमा निर्मितीची ऑफर देशाभिमानामुळे त्यांनी नाकारली. पहिले महायुद्ध सुरू झाले होते त्यामुळे आर्थिक व्यवहार न होता निराश होऊन हिंदुस्थानात परतावे लागले. इथे पण भांडवलदारांनी अर्थपुरवठा थांबवला, पण सहकारी विनावेतन काम करायला तयार झाले. स्वदेशी सिनेमाचे महत्त्व जाणून लोकमान्य टिळकांनी दादासाहेबांना मदत करण्याचे आवाहन केले. यामुळे भांडवल उभे राहिले. मग लंकादहन हा सुपर डुपर सिनेमा त्यांनी काढला. यातले ट्रीक सिन्स पाहून लोक चकित झाले. सकाळी आठ ते रात्री 2 वाजेपर्यंत याचे खेळ चालत. आर्थिक गणित जमवायला भागीदारीत हिंदुस्थान फिल्म कंपनीची स्थापना त्यांना मनाविरुद्ध करावी लागली. श्रीकृष्ण जन्म, कालिया मर्दन हे दोन यशस्वी सिनेमे दिल्यावर पण मतभेद झाल्याने दादासाहेबांनी कंपनी सोडली. काशीला निघून गेले. अनेकांच्या आग्रहामुळे कंपनीत परतले. मग महानंदा, शिशुपाल वध, गोरा कुंभार, आग्राहून सुटका, श्रीकृष्ण शिष्टाई, वसंतसेना, म्युनिसिपल निवडणुका आणि विंचवाचा स्पर्श असे 44 यशस्वी मूकपट तयार केले. मनाविरुद्ध तडजोडी कराव्या लागल्या तरी सिनेमात स्पेशल इफेक्ट अतिशय कल्पकतेने करत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सेतुबंधन, कालिया मर्दन, रुक्मानंद मोहिनी आणि श्रीकृष्ण जन्म हे मूकपट.

मूकपटाचा जमाना संपला. अर्देशिर इराणी यांच्या आलमआरा ने बोलपटाचे युग सुरू झाले. अर्देशिर इराणी यांनी सुचवल्यामुळे सेतूबंधन हा मूकपट हिंदीत डब केला. हिंदुस्थानी सिनेमात डबिंग करायचा मान पण दादासाहेबांनाच मिळाला. कोल्हापूरच्या राजाराम महाराजांनी बोलपट काढायचे ठरवले. दादासाहेबांना मानाने बोलावले. ना. ह. आपटे यांनी कथा, पटकथा, संवाद लिहिले. गाणी मात्र दादासाहेबांनी लिहिली. हा सिनेमा होता गंगावतरण. यात ट्रिक सीन्स भरपूर होते. वास्तवतेच्या हट्टापायी सिनेमाचा खर्च अफाट झाला. यामुळे निर्मात्यांशी वाद झाला. दादासाहेबांनी कसातरी गंगावतरण सिनेमा पूर्ण केला आणि ते नाशिकला निघून गेले. 6 ऑगस्ट 1937 ला मुंबईत ऑपेरा हाऊसला हा त्यांचा पहिला बोलपट रिलीज झाला. सिनेमा पहायला खिशात पैसे नव्हते. हाच सिनेमा भावी जावयांनी पुसाळकर यांनी तिकिटे घेऊन दादासाहेबांना दाखवला. केवढा दैवदुर्विलास. यानंतर त्यांनी चित्रनिर्मिती बंद केली. गंगावतरण हा त्यांचा शेवटचा सिनेमा.

उदास आणि निष्कांचन अवस्थेत ते पुण्याला सहकुटुंब राहायला आले. शरीर साथ देत नव्हते. व्ही. शांताराम यांना समजल्यावर ते भेटायला गेले. त्यांना आधार दिला. दरमहा पेन्शन सुरू केली. 1939 साली हिंदुस्थानी सिनेमाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात त्यांचा सत्कार झाला. 5000 रुपयांची थैली भेट दिली. नाशिकच्या माधवराव शुक्ल यांनी पुढाकार घेऊन नाशिकला दादासाहेबांसाठी घर बांधले. घराला नाव दिले हिंद सिने जनकाश्रम. आर्थिक अडचण सतत असायचीच. मग वेगवगळ्या स्टुडिओत चकरा मारून पटकथा विकायचे प्रयत्न सुरू असायचे. त्यांच्या मुलाने चित्रपट निर्मितीसाठी केलेला अर्ज सरकारने नाकारला. दादासाहेब हताश झाले. आजारी पडले आणि 16 फेब्रुवारी 1944 ला त्यांचे निधन झाले. अंत्ययात्रेला मोजकीच माणसे होती, पण बाजूचे सिनेमा थिएटर तुडूंब भरले होते.

(लेखक ज्येष्ठ चित्रपटअभ्यासक आहेत)
[email protected]