लेख : संपन्न कोकणच्या निर्मितीसाठी…

86

>> सद्गुरू उमाकांत कामत ([email protected])

कोकणी माणूस आणि शासनाने जर मनावर घेतले तर संपन्न कोकण, सुखी कोकण वास्तवात उतरवण्यासाठी कुठल्याही अणुऊर्जा अथवा रासायनिक अथवा अवजड उद्योगाची गरज भासणार नाही आणि पर्यटन, बागायती शेती, मत्स्य व्यवसाय, हॉटेल व्यवसायसारख्या उद्योगावर कोकण संपन्न आणि सुखी होऊ शकतो. गरज आहे ती सर्वांच्या इच्छाशक्तीची. मत्स्य व्यवसाय, फलोत्पादन आणि निसर्गावर आधारित पर्यटन हे कोकण विकासाचे तीन प्रमुख स्तंभ आहेत. मत्स्य विकासासाठी कोकण किनारा हा सर्वार्थाने योग्य असून या व्यवसायातून मुबलक पैसे आणि रोजगार निर्माण होऊ शकतो.

कोकणात तुरळक प्रमाणात बांबू आणि रबराची शेती केली जाते. येणाऱ्या काळात शासनाने आणि कोकणी माणसानेदेखील उपरोक्त पिकांच्या जोडीने मोठय़ा प्रमाणावर बांबू आणि रबर शेतीसाठी जास्त जमीन लागवडीखाली आणली पाहिजे. चांगल्या प्रतीच्या बांबूचा उपयोग घर बांधणीत, बैठी घर उभारणीत, आलिशान मंडप आणि दिवाणखाने उभारणीत, फर्निचर, कलात्मक वस्तू तयार करण्यासाठी केला जातो. चांगल्या प्रतीच्या बांबूची बाजारपेठ ही आंतराष्ट्रीय बाजारपेठ आहे हे लक्षात घेतले पाहिजे. ‘बांबू आर्ट’ ही एक वैशिटय़पूर्ण कला असून काही प्रतिभावान पदवीधर कलाकारांनी ‘बांबू आर्ट’साठी स्वतःचे जीवन झोकून देऊन उच्च दर्जाच्या ‘बांबू आर्ट’चा खजिना तयार केलेला मी पाहिला आहे. कोकणच्या आर्थिक विकासासाठी बांबू लागवटीचे क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. हे वेळीच ओळखून शासनाने ‘बांबू बोर्ड’ स्थापनेसाठी केंद्र शासनाकडे आग्रहाची मागणी आणि पाठपुरावा करून लवकरात लवकर बांबू बोर्ड स्थापन करून घेतले पाहिजे.

कोकणात जवळजवळ दीडशे इंच पाऊस पडतो. पण हे सर्व पाणी अडवण्यासाठी कोकणात पुरेशी धरण, बंधारे, तलाव नसल्यामुळे सदर पाणी समुद्रात वाहून जाते. जानेवारीनंतर कोकणात पाणीटंचाई सुरू होते. कोकणातून अनेक नद्या वाहतात. या नद्यांपैकी वाशिष्टी, शास्त्राr, मुचकंदी, वैतरणा आणि अलकनंदासारख्या नद्यांची पाण्याची क्षमता ही कोयना धरण्यापेक्षा कैकपट मोठी आहे. या समुद्रात वाहून जाणाऱ्या विशेषतः डोंगरावरून खाली वाहत जाणाऱ्या पाण्याला बंधारे, लघुपाटबंधारे, तलावाची साखळी गावागावांत करून सदर पाण्याचा उपयोग सिंचन, पिण्यासाठी आणि वीजनिर्मितीसाठी करण्यास सुरुवात केली पाहिजे. त्याचप्रमाणे कोयना धरणातून वीजनिर्मितीनंतर पाणी वर उचलून कोकणातील काही नद्यांत सोडले जाते. तेथून सदर पाणी वाहत समुद्रात सोडले जाते. या समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याला अडवून त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी आणि सिंचनासाठी केला गेला पाहिजे. किंबहुना त्याची आज नितांत गरज आहे. आधुनिक तंत्राच्या मदतीने सदर पाणी अवजड पंपाने वर खेचून कोकणात आणणे सहज शक्य आहे. स्वामिनाथन समितीदेखील आपल्या अहवालात तसे नमूद केले आहे. कोकणातील हजारो एकर जमीन त्यामुळे सिंचनाखाली येऊ शकते आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटू शकतो.

कोकणच्या आर्थिक विकासासाठी पाण्याबरोबरच अखंडित वीजपुरवठा होणे गरजेचे आहे. कोकणात विजेचा लपंडाव 365 दिवस सुरू असतो. जगात अणू वीजनिर्मितीचे दुष्परिणाम जोखल्यानंतर अणू वीजनिर्मितीचे प्रकल्प थांबविण्यात आले आहेत.  दुसऱ्या बाजूला वातावरण दूषित करून कार्बन फैलावणारे कोळशावर वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाबाबत पुनर्विचार सुरू आहे.  उपरोक्त पार्श्वभूमीवर निसर्गाचा समतोल राखणारे, ग्राहकांना आणि उत्पादकांना स्वस्तात वीज मिळवून देणारे हाइड्रो-इलेक्ट्रिक म्हणजेच पाण्याद्वारे वीजनिर्मिती करणारे प्रकल्प कोकणात उभे राहणे गरजेचे आहे. कोकण हा उंच-उंच डोंगर आणि दऱ्याखोऱ्यात विखुरलेला प्रदेश असून डोंगरावरून खाली वाहत येणाऱ्या पाण्याचा उपयोग करून वीजनिर्मिती करणे शक्य आहे. दहा मेगावॅट ते पन्नास मेगावॅटचे विद्युत जलनिर्मितीचे प्रकल्प आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून उभारणे आणि स्वस्त दराने वीज उपलब्ध करून देणाऱ्या छोटय़ा-छोटय़ा प्रकल्पांची साखळी यशस्वीरीत्या उभारणे कोकणात सहज शक्य आहे. याच पाण्याचा उपयोग वीजनिर्मितीनंतर पिण्यासाठी आणि सिंचनासाठी, उद्योगासाठी करून संपन्न कोकणच्या होणाऱ्या सुबत्तेत नक्कीच वाढ होऊ शकते.

कोकणातील प्रत्येक गावात किंबहुना प्रत्येक घराच्या अंगणात सुरंगीच्या सुहासिक फुलाचे झाड असतेच. ‘सुरंगीचे वळेसर’ हे प्रत्येक कोकणी स्त्राrला अत्यंत प्रिय असतात. याच सुरंगीच्या सुहासिक फुलांची व्यावसायिक स्तरावर लागवड करून ती फुले सुखवून पुढे सदर फुलांचा उपयोग पर्फ्युम बनवण्यासाठी केला जातो. नारळाच्या सुतापासून गालिचे आणि सुरंगीच्या फुलापासून पर्फ्युम बनवण्याचे उद्योग जोडधंदा म्हणून कोकणात उभा राहू शकतो. सुरंगीप्रमाणेच जाई आणि जुई या फुलांचादेखील उपयोग अत्तर बनवण्यासाठी केला जाऊ शकतो.

मत्स्य व्यवसाय, फलोत्पादन आणि निसर्गावर आधारित पर्यटन हे कोकण विकासाचे तीन प्रमुख स्तंभ आहेत. मत्स्य विकासासाठी कोकण किनारा हा सर्वार्थाने योग्य असून या व्यवसायातून मुबलक पैसे आणि रोजगार निर्माण होऊ शकतो.  कोकणच्या समुद्रात आणि खाडय़ांमध्ये उपलब्ध असणारे कोळंबी,  शार्क-मोरी,  टुना,  सुरमई, सार्दिन, पापलेट, कर्ली,  कॅटफिश, बोंबील आणि कुर्ल्या खेकडे यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जोरदार मागणी आहे. कोकणातील तरुणाईने आणि कोळी बांधवांनी या व्यवसायात स्थिर होण्यासाठी मेहनत केली पाहिजे. शक्य असेल तर व्यक्तिगत स्तरावर अथवा सहकारी तत्त्वावर मासेमारी आणि मासेमारीवर आधारित निर्यात प्रकल्प सुरू करणे आवश्यक आहे. सहकारी तत्त्वावर छोटे-मोठे ट्रॉलर घेऊन त्यातून मासेमारी आणि त्या मासेमारीतून छोटे-मोठे मासे निर्यात प्रकल्प यशस्वीरीत्या राबविणे सहज शक्य आहे.

शासनानेदेखील कोकणात अधिकाधिक फिशरीज महाविद्यालय आणि फिशरीज संशोधन केंद्रे सुरू केली पाहिजेत. कोकणी माणूस आणि शासनाने जर मनावर घेतले तर संपन्न कोकण, सुखी कोकण वास्तवात उतरवण्यासाठी कुठल्याही अणुऊर्जा अथवा रासायनिक अथवा अवजड उद्योगाची गरज भासणार नाही आणि पर्यटन, बागायती शेती, मत्स्य व्यवसाय, हॉटेल व्यवसायसारख्या उद्योगावर कोकण संपन्न आणि सुखी होऊ शकतो. गरज आहे ती सर्वांच्या इच्छाशक्तीची. कोकणचा कॅलिफोर्निया नव्हे तर संपन्न, सुखी कोकण उभा करण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया.

आपली प्रतिक्रिया द्या