
>> प्रदीप म्हात्रे
बऱ्याच वर्षांपूर्वी एक उत्पादनाची जाहिरात टीव्हीवर यायची त्यात ‘साठ साल के बुढे या साठ साल के जवान’ असं म्हटलं जायचं. खरे तर व्यक्तींवर असं विधान केलं जातं. कारण नाही म्हटलं तरी मानवी आयुष्याला मर्यादा आहेत. संस्थेच्या बाबतीत सरसकट विधान करता येत नाही. हे सांगण्याचं प्रयोजन म्हणजे महाराष्ट्रभर विज्ञान प्रसार आणि प्रचाराचं कार्य करणाऱ्या मराठी विज्ञान परिषदेला काल साठ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमिताने परिषदेच्या कार्याचा घेतलेला हा आढावा.
मराठी विज्ञान परिषदेची (मविप) स्थापना 24 एप्रिल 1966 रोजी श्री. म. ना. गोगटे यांच्या पुढाकाराने झाली. तत्पूर्वी मुंबई मराठी साहित्य संघात गोगटे सक्रिय असताना विविध विज्ञानविषयक कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले. तथापि विज्ञानाकरिता त्यांना स्वतंत्र व्यासपीठ न मिळाल्याने डॉ. रा. वि. साठे, डॉ. श्री. शां. आजगावकर, ज. ग. बोधे, प्रा. प. म. बर्वे यांसासारख्या तत्कालीन समविचारी आणि प्रतिष्ठत व्यक्तींच्या सहकार्याने त्यांनी ‘मविप’ची स्थापना केली. अल्पावधीतच कायदेशीर बाबींची पूर्तता करताना गोगटे यांनी पहिल्याच वर्षी विज्ञान संमेलनाचे आयोजन केले. सभांची इतिवृत्ते, हिशेब, अहवाल, आयकर सवलत इ. माध्यमांतून संस्थेची घडी बसवली.
परिषदेच्या स्थापनेपासूनच संस्थेला शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ असलेली बहुआयामी मंडळी अध्यक्ष म्हणून लाभली असून त्यामध्ये डॉ. रा. वि. साठे, प्रा. भा. मा. उदगावकर, प्रा. जयंत नारळीकर, डॉ. वसंत गोवारीकर, प्रभाकर देवधर आणि प्रा. ज्येष्ठराज जोशी यांचा समावेश आहे. त्यातल्या बहुतेक जणांनी विज्ञान शिक्षण आणि विज्ञान प्रसार इत्यादी क्षेत्रात मोलाचं व अजोड योगदान दिलेलं आहे.
विज्ञानाचा प्रसार सर्वत्र करण्यामध्ये परिषदेच्या अधिवेशनांचे महत्त्वाचे योगदान आहे. अधिवेशनांच्या संख्यावरून परिषदेचे वय लक्षात यावे इतके सातत्य त्यामध्ये आहे. 1968 सालापासून सुरू झालेले ‘पत्रिका’ मासिक हे खरे तर सुरुवातीला मुखपत्र-वार्तापत्र स्वरूपाचे होते. पत्रिकेने 1987 साली प्रा. उदगावकरांच्या पुढाकाराने ‘विज्ञान मासिक’ म्हणून कात टाकली. अनेक स्थित्यंतरे अनुभवलेल्या ‘मविप पत्रिके’चा आजचा खप दरमहा 6000 प्रती इतका असून सध्याच्या विज्ञान मासिकात ‘पत्रिका’ आघाडीवर आहे, असं अभिमानाने म्हणता येईल.
सुरुवातीच्या काळात परिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये प्रौढ व्यक्तींचा सहभाग असल्याचे प्रा. उदगावकर यांना जाणवले. विज्ञाननिष्ठ समाज निर्माण करायचा असेल तर त्याकरिता विद्यार्थीदशेतूनच सुरुवात करायला हवी या उद्देशाने 1983 पश्चात विद्यार्थ्यांकरिता कार्यक्रम घ्यायला खऱया अर्थाने सुरुवात झाली. त्यामध्ये सदीप व्याख्याने, प्रात्याक्षिके, दृकश्राव्य इत्यादींचा समावेश होता. नंतरच्या काळात विज्ञान मित्र, वयात येताना, विज्ञान प्रयोग मेळावे, खेळणी शिबीर, संकल्पना विकसन अभ्यासक्रम असे विविध आणि नावीन्यपूर्ण उपक्रम परिषदेने घेतले. सध्याच्या उपक्रमांमध्ये शनिवारी-विज्ञानवारी, राष्ट्रीय विज्ञान दिन, गणित दिन, शिष्यवृत्ती योजना, शालेय प्रयोग सहाय्यक प्रशिक्षण अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे.
मराठी माणसाचं ‘नाटकवेड’ लक्षात घेऊन ‘एकांकिका’ हे माध्यम विज्ञान प्रसाराकरिता वापरण्याची प्रा. ज्येष्ठराज जोशी (विद्यमान अध्यक्ष) यांची कल्पना परिषदेने अमलात आणली. त्याद्वारे राजस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा गेली अकरा वर्षे सातत्याने सुरू असून आता स्थिरावली आहे. परिषदेच्या या उपक्रमांव्यतिरिक्त सर्वसामान्य जनतेमध्ये विज्ञान प्रसाराकरिता परिषदेने अनेक माध्यमे चोखाळली आहेत. त्यामध्ये वृत्तपत्रे, आकाशवाणी आणि दूरचित्रवाणी (विज्ञान जनहिताय मालिका) यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल आणि त्याला मिळणारा प्रतिसाद परिषदेचा उत्साह निश्चितच वाढवणारा आहे.
विज्ञान प्रसाराकरिता झटणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याची दखल परिषदेतर्फे घेतली जाते, हे परिषदेचे आणखी एक वैशिष्टय़. एखाद्या संस्थेने 60 वर्षांचा टप्पा पूर्ण करत कार्यप्रवण राहणे ही बाब म्हणावी तितकी साधी-सोपी नाही. त्याकरिता आवश्यकता असते निःस्पृह पदाधिकारी आणि कार्यकर्ते! मराठी विज्ञान परिषद त्याबाबतीत निश्चितच ‘श्रीमंत’ आहे.





























































