ठसा – डॉ. दिलीप मोरे

>> दुर्गेश आखाडे

लरोगतज्ञ म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयात 35 वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणारे डॉ.दिलीप मोरे यांचे वयाच्या 64 व्या वर्षी कोरोनाच्या काळात लहान मुलांवर उपचार करत असताना कोरोनाची लागण होऊन दुःखद निधन झाले.

1978च्या दरम्यान डॉ.दिलीप मोरे रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रुजू झाले, त्या दिवसापासून ते मृत्यूपर्यंत जिल्हा शासकीय रुग्णालयात सेवा बजावत राहिले. ज्या शासकीय रुग्णालयात त्यांनी चाळीस वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली, त्याच रुग्णालयात त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. रत्नागिरीत बालरोगतज्ञ म्हणून ते प्रसिद्ध होते. अनेक बालकांना त्यांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत जीवदान दिले.. जिल्हा शासकीय रुग्णालयात काही काळ त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकाची भूमिकाही सांभाळली. अनेक वर्षे रुग्णालयात काम करत असल्यामुळे आणि उत्तम सेवा बजावल्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक आणि सामाजिक संस्थांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. अनेक वेळा जिल्हा शासकीय रुग्णालयात कटू प्रसंग उभे राहिले, संघर्ष पेटला. त्यावेळी डॉ.मोरे यांनी मध्यस्थाची महत्त्वपूर्ण भूमिका सांभाळली.

एखाद्या सामान्य व्यक्तीचे बाळ रुग्णालयात दाखल झाले असेल आणि त्या व्यक्तीने जरी डॉ.मोरे यांना फोन केला तरी ते रुग्णसेवा या नात्याने तत्काळ रुग्णालयात येत असत. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत पाळले. आपल्याला फोन करणारी व्यक्ती कोण आहे याचा विचार न करता एका रुग्णाला पाहण्यासाठी ते शासकीय रुग्णालयात येत असत. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे ते जनमानसात लोकप्रिय होते. डॉ. दिलीप मोरे 2014 साली जिल्हा शासकीय रुग्णालयातून निवृत्त झाले. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात बालरोगतज्ञ नव्हता. त्यामुळे डॉ.मोरे निवृत्त झाले असले तरी रुग्णांचे नातेवाईक त्यांना फोन करून तुम्ही रुग्णाला पाहायला तरी या असे सांगत. त्याप्रमाणे डॉ.मोरे जिल्हा रुग्णालयात येत असत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून 2015 नंतर पुन्हा ते रुग्णालयात सेवेसाठी येऊ लागले.

पल्स पोलिओ लसीकरणाच्या मोहिमेत डॉ.दिलीप मोरे नेहमी अग्रस्थानी असत. त्याचबरोबर जिल्हा शासकीय रुग्णालयात 14 नोव्हेंबरला होणाऱया बालदिनाच्या कार्यक्रमाचा सर्व खर्च ते स्वतः करत असत. मंगलमूर्ती प्रतिष्ठान या संस्थेतही ते कार्यरत होते. गतवर्षीच त्यांच्या मुलाचे दुःखद निधन झाले. त्यांचा मुलगा लहानपणापासूनच आजारी होता. स्वतःच्या मुलाच्या आजारपणाच्या वेदना सहन करून एक बापमाणूस इतर मुलांना निरोगी ठेवण्यासाठी धडपडत होता. डॉ. मोरे गोरगरीबांसाठी देवदूत होते. गरीब रुग्णांवर अनेक वेळा मोफत उपचार त्यांनी केले आहेत.

कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणेमध्ये सर्वात अग्रेसर असलेले कोविड योद्धे म्हणून डॉ.मोरे यांची ओळख निर्माण झाली होती. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सहा महिन्यांच्या बाळाला कोरोना झाला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. तेव्हा हा प्रसंग त्यांनी सहज हाताळला. सहा महिन्यांचे बाळ कोरोनामुक्त झाले. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात तब्बल 42 कोरोनाबाधित बालके दाखल झाली. या सर्व बालकांवर उपचार करून डॉ. दिलीप मोरे यांनी त्या बालकांना ठणठणीत बरे केले. जन्मलेल्या दोन बालकांनाही कोरोना झाला होता. त्या बालकांवरही त्यांनी यशस्वी उपचार केले. हे सर्व करत असताना कोरोनाने त्यांना गाठले. ज्या रुग्णालयामध्ये मी सेवा बजावली, त्याच रुग्णालयात माझ्यावर उपचार करा असे सांगून डॉ.दिलीप मोरे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले. जवळ जवळ दहा दिवस त्यांची कोरोनाविरुद्ध लढाई सुरू होती. अखेर कोरोनाविरुद्धची झुंज संपली. वय वर्षे 64 असतानाही कोरोनाची पर्वा न करता डॉ. दिलीप मोरे जिल्हा शासकीय रुग्णालयात सेवा बजावत होते. त्याचबरोबर सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळेत ते त्यांच्या खासगी दवाखान्यातही सेवा करत होते. कोरोना आहे म्हणून ते घरी बसले नाहीत. कोरोनाचा त्यांनी कधी बाऊ केला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या