
>>प्रशांत गौतम<<
मराठी नाटय़-सिनेसृष्टीतील एक प्रतिभावंत दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांना नुकताच पत्रमहर्षी अनंत भालेराव स्मृतीपुरस्कार घोषित झाला आहे. कसदार दिग्दर्शन आणि रंगभूमीचा अखंड ध्यास घेणारे रंगकर्मी अशी ज्यांची ओळख आहे ते चंद्रकांत कुलकर्णी यांनी गत तीसेक वर्षांत आपल्या कार्यकौशल्याची अमिट छाप सोडली आहे. चंदू या नावाने मित्रपरिवारात ओळखल्या जाणाऱ्या या कलावंताच्या जडणघडणीचे संभाजीनगर शहर हे साक्षीदार आहे. या महानगरामध्ये त्यांचा ऐन उमेदीचा कालखंड सुरू झाला व पुढील काळात मुंबई-पुण्यात विस्तारला. प्रारंभापासून ते पत्रकारिता क्षेत्राशी निगडित असल्याने त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रगतीसाठी हे क्षेत्र पोषकच ठरले. मित्रपरिवार आणि जनसंपर्क दांडगा होण्यास मदत झाली. याच शहरात चंद्रकांत कुलकर्णी यांची सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक जडणघडण झाली. याच प्रेरणादायी कालखंडात जिगिषा या संस्थेतून नाटय़चळवळीची पायाभरणीही भक्कम होत गेली, पण मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन आपले कार्यक्षेत्र अधिक विकसित करावे, असे त्यांना त्या काळात वाटले. जिगिषा संस्थेत अनेक समविचारी मित्रमंडळींचे सहकार्य आणि मुंबईस्थित प्रशांत दळवी यांचा मुंबईत येऊन करीअर करण्याचा दिलेला सल्ला चंद्रकांत कुलकर्णी यांनी मनावर घेतला. त्यांनी मुंबई गाठली आणि मागे वळून बघण्याची गरजच भासली नाही. 1988च्या सुमारास त्यांनी ‘पौगंड’ हे नाटक दिग्दर्शित केले. तेव्हापासून सुरू झालेला हा प्रवास 2018 पर्यंतच्या हॅम्लेट नाटकापर्यंत येऊन पोहचतो. नाटय़ क्षेत्रातील या दीर्घ प्रवासाच्या कालखंडात चंद्रकांत कुलकर्णी यांनी ‘ध्यानीमनी’, ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’, ‘चारचौघी’,‘ वाडा चिरेबंदी’ (त्रिनाटय़ धारा), ‘गांधीविरुद्ध गांधी’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ अशी एकापेक्षा एक दर्जेदार, महत्त्वाची नाटक मराठी रंगभूमीला दिली. हमीदाबाईची कोठी या नाटकाचे त्यांनी पुनरुज्जीवन केले. 1999च्या सुमारास ‘बिनधास्त’ या रौप्यमहोत्सवी चित्रपटापासून त्यांचा मराठी सिनेमा क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. ‘भेट’ हा चित्रपट तर लक्षणीय ठरला ज्याचा गौरव अनेक समीक्षकांनी केला. या चित्रपटाने सुवर्णमहोत्सवाचा पल्ला गाठला. ‘कायद्याचं बोला’, ‘संत तुकारामांवरील तुकाराम’, बनगरवाडी, कदाचित, दुसरी गोष्ट या चित्रपटांसह अकरा उत्तम चित्रपट कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केले. या दोन महत्त्वाच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केल्यानंतर छोटा पडदा त्यांनी काबीज केला. ‘पिंपळपान’, ‘टिकल ते पॉलिटिकल’, ‘व्यक्ती आणि वल्ली’ या दूरदर्शन मालिकांचे दिग्दर्शन त्यांनी केले. त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘बिनधास्त’, ‘भेट’, ‘कायद्याचं बोला’, ‘आजचा दिवस माझा’, ‘तुकाराम’ असे चित्रपट अल्फा गौरव, फिल्मफेअर ऍवॉर्डने सन्मानित झाले. या सर्व पुरस्कारांच्या प्रवासात आता त्यांचा गौरव पत्रमहर्षी अनंत भालेराव पुरस्काराने होतो आहे. चित्रपट, रंगभूमी, मालिका यांच्या दिग्दर्शनाप्रमाणेच त्यांनी अनेक चित्रपट, माहितीपट आणि विविध जाहिरातींचेही दिग्दर्शन केले. बनगरवाडी या चित्रपटात प्रमुख पात्राची (शिक्षकाची) भूमिका साकारून कसदार अभिनयही केला. कुलकर्णी यांच्या दिग्दर्शन प्रवासात 1990चा कालखंड अतिशय महत्त्वाचा ठरला. प्रशांत दळवी, अजित दळवी, अभिराम भडकमकर हे त्यांचे समकालीन. परंतु त्यांनी आधीच्या पिढीतील पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर, रत्नाकर मतकरी, महेश एलकुंचवार, श्याम मनोहर यांच्या नाटय़कृतीही दमदार सादर केल्या. समांतर रंगभूमीवर ‘यळकोट’, ‘आषाढवार’, ‘मौनराग’ सारखे प्रयोग त्यांनी केले. एलकुंचवारलिखित ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’, ‘युगांत’ रंगभूमीवर आठ तासांचा कालावधी असलेल्या त्रिनाटय़धारेने विक्रम केला. त्यास नाटय़ रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. त्यांनी दिग्दर्शित केलेली महत्त्वाचे नाटके म्हणजे प्रा. अजित दळवी लिखित ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’ आणि ‘गांधी विरुद्ध गांधी’ हे होय. ती मराठीसह हिंदी आणि गुजराती भाषेतही दिग्दर्शित केली गेली. छोटय़ा पडद्यावर अनेक मराठी मालिका येतात आणि संपतात. त्यातील फार कमी लक्षात असतात. परंतु प्रतिभावंत मराठी सारस्वतांच्या लेखनावर आधारित ‘पिंपळपान’ने वेगळी पाऊल वाट निर्माण केली.


























































