
>> डॉ. संजिवनी चव्हाण
2020 हे वर्ष जीव वाचवण्याचे आहे. विशेषत: सण साजरे करताना. दिवाळी उंबऱ्यापर्यंत आली आहे. लोकांचा उत्साहही ओसंडून वाहतो आहे. पण या उत्साहाला जरा सुरक्षिततेचं कोंदण घालूया.
या दिवसांत दिवाळी खरेदीसाठी बाजारात लगबग, गर्दी होतानाही दिसत आहे. यासाठी गर्दीची ठिकाणं टाळणं, आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. या दिवसांत फटाके मोठ्या प्रमाणात वाजवले जातात. त्यामुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता असते. फटाक्यांमध्ये सल्फर ट्रायऑक्साईड, व्हॅनिडियम पेंटॉक्साईड, पोटॅशियम ऑक्साईड आणि कॉपर ऑक्साईडस असे मानवी आरोग्यासाठी अत्यंत विषारी घटक आहेत. ही हानीकारक रसायने हवेत सोडली जातात. या फटाक्यांचा धूर मोठय़ा प्रमाणात वातावरणात मिसळला तर त्याचा त्रास कोरोना रुग्णांसह ज्येष्ठ नागरिकांना मोठय़ा प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे या वर्षी आरोग्यदायी दिवाळी साजरी करून कोरोनाला हरवण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे.
आनंदी दिवाळी कशी साजरी कराल?
- घरातून बाहेर जाताना चांगल्या प्रतीचं मास्क लावूनच घराबाहेर पडावं. सॅनिटायझर सोबत ठेवा..
- सामाजिक अंतर राखा, दोन व्यक्तींमध्ये दोन मीटरचं अंतर राहील याची काळजी घ्या, दिवाळीनिमित्त होणाऱया कार्यक्रमांकरिता सध्या ऑनलाइन पर्याय आहेत. हे कार्यक्रम घरबसल्या ऑनलाइन बघा.
- भीमसेनी कापूर जवळ ठेवावा, त्या कापराचा सुगंध अधूनमधून हुंगावा. कापरामुळे शरीरामध्ये ऑक्सिजनची क्षमता वाढते. नियंत्रणातही राहते.
- दिवाळीतल्या गोड, तिखट मैदायुक्त पदार्थांचा आस्वाद घेत असलात तरीही प्रथिनयुक्त आहाराकडे लक्ष द्या. एकदिवसाआड उकडलेलं अंड, मोड आलेली कडधान्यं, डाळींचे पदार्थ, मासे यांचा आहारात समावेश करा.
- जे मांसाहार करत नाहीत त्यांनी आहारात उडदाच्या डाळीचा समावेश करावा. मांसाहारातून मिळणारी प्रथिनं उडदाच्या डाळीत असतात. त्यामुळे उडीद मांसाहाराचं काम करतं.
नियम पाळून दिवाळी साजरी करा
वयोवृद्ध, लहान मुलं, रुग्ण यांनी स्वतःची जास्त काळजी घेण्याची गरज आहे. सणांच्या वेळी प्रवास जास्त प्रमाणात केला जातो. अशा वेळी रुग्ण, लहान मुलं, वयोवृद्ध यांना सोबत घेऊन प्रवास टाळावा. कोरोनाचं गांभीर्य कमी कमी होत जातंय असं दिसतंय. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी मोठय़ा प्रमाणात होते. काही जण मास्क तोंड-नाकावर ठेवतच नाहीत. सॅनिटायझरचा वापर करत नाहीत, सामाजिक अंतर न पाळणे अशा पद्धतीने अतिशय गाफील राहणे टाळायलाच हवे. सर्व नियम पाळले तर दिवाळीचा आनंद घेता येईलच, शिवाय आरोग्य चांगले राहील.
श्वसन विकारांना बळी पडू नका
आधीच आपल्याकडे प्रदूषणाचं प्रमाण जास्त आहे. त्यामध्ये कोरोनासारख्या आजाराने थैमान घातलंय. निरोगी माणसालाही काही वेळा श्वास घ्यायला त्रास होत असतो. अस्थमा, अलर्जिक अस्थमा, कार्डीयाक अस्थमा असे श्वसनाचे विविध विकार बळावण्याची शक्यता असते. सर्दी, खोकला तर होतच असतो काही अलर्जिक आणि प्रदूषित कारणांमुळे. कोरोना व्हायरस श्वासनलिका आणि फुप्फुसांवर हल्ला करतो. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे घसा आणि फुप्फुसांवर परिणाम होऊन कमकुवत होण्याची शक्यता असते. रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे फटाके वाजवणे, एकमेकांच्या भेटीगाठी घेणे, गर्दी करणे अशा गोष्टींमुळे श्वसन विकार आणि इतर आजार होऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ शकते. निमोनिया, ब्राँकायटीस असे आजारही या दिवसांत होण्याची शक्यता असते तसेच हे आजार असणाऱयांनीही काळजी घेणे आवश्यक आहे. फटाक्यांचं प्रदूषण बरेच महिने हवेत टिकून राहतं. प्रदूषणाचा शरीरावर परिणाम होऊन रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे होणाऱया आजारावर औषध घेणे, त्या औषधांचे दुष्परिणाम ही साखळी बंद करण्यासाठी सरकारी नियमांचे पालन करणे, भेटीगाठींपेक्षा घरी राहूनच एकमेकांच्या संपर्कात राहणे, पर्यावरणाची काळजी घेणे आणि त्याकरिता इतरांनाही जागरुक करणे हे आपल्याच हातात आहे.



























































