लेख – धडाडीचे धन्वंतरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रा. वैजनाथ महाजन

डॉक्टर हा समोरच्या रुग्णाला प्रत्यक्ष परमेश्वरच वाटत असतो. कधीकाळी असे म्हटले जात असे की, जिथे परमेश्वराला जाणे शक्य होणार नाही तिथे परमेश्वर आईला पाठवत असतो. आता त्याचबरोबर आपण असे म्हटले पाहिजे की, जिथे परमेश्वराला जाणे अशक्य आहे तिथे परमेश्वर प्रामाणिक आणि सचोटीच्या धन्वंतरीला पाठवत असतो. माणसाला कोणतीही व्याधी झाली की, तो मनोमन धास्तावून जात असतो. आपल्याला झालेल्या व्याधीचे नेमके स्वरूप काय व ती संपणार कशी अशा एकाच विचारात तो डॉक्टरकडे धाव घेत असतो. कधीकाळी आपल्याकडे प्रत्येक कुटुंबाचे असे स्वतंत्र धन्वंतरी असत. त्यांना त्या त्या कुटुंबातील व्यक्तींच्या प्रकृतीची व एकूण त्यांच्या सवयींची पुरेपूर कल्पना असे. त्यामुळे निदान नेमके होत असे आणि थोडय़ाशा उपचाराने तो माणूस बरा होत असे. हा काळ मागे पडला आणि हळूहळू वेगवेगळ्या तज्ञांचा काळ पुढे येत गेला. त्यातून हाडाचे डॉक्टर, हृदयाचे डॉक्टर, रक्तदाबाचे डॉक्टर असे वेगवेगळे तज्ञ समाजाला मिळू लागले. आपल्या विद्याभ्यासाच्या काळात अशा डॉक्टरांनी उत्तम अभ्यास केलेला असतो व तेवढाच मोठा सरावही केलेला असतो. त्याबरोबरच आपला पेशा हा कमाईचा पेशा नसून तो सेवाभावाचा पेशा आहे, याचीपण पुरेपूर जाणीव या डॉक्टरांच्या मनी रूजविली जात असे. पण समाजाच्या एकूण चलनवलनाबरोबर या पेशातही अपप्रवृत्तीचा प्रवेश झाला आणि अनेक डॉक्टरांच्या वैद्यकीय दरानेच माणूस आजारी पडू लागला. यातूनच डॉक्टर जगवतात का नागवतात यासारखी चर्चासत्रे झडू लागली. आणि डॉक्टर तुम्हीसुद्धा यासारखी नाटकेपण गाजू लागली. अर्थात सगळेच डॉक्टर असे नव्हते आणि नाहीत. तर केवळ साध्या बोलण्यातून रुग्णाचे निम्मे दुखणे बरे करून टाकणारे आजही असंख्य धन्वंतरी आहेत. त्यांच्या ठिकाणी सेवाभावाची जाणीव पुरेपूर रूजलेली दिसते. आणि त्याचा सुखद अनुभव त्यांच्या रुग्णांना येत असतो. डॉक्टरांचा सेवाभाव किती टोकाचा होता याचे एक उदाहरण याठिकाणी आवर्जून नमूद करावेसे वाटते. मिरजेच्या मिशन हॉस्पिटलमध्ये कधी काळी डॉक्टर फ्लेचर हे प्रमुख होते आणि ते त्यांच्या सेवाभावी वृत्तीबद्दल सर्वत्र परिचित होते. एक दिवस प्रचंड कफ झालेला एक रूग्ण त्यांच्यासमोर आला. कफामुळे त्याला श्वासोच्छ्वास करता येत नव्हता. तो अक्षरशः धापा टाकत होता. त्याची ती अवस्था बघून डॉ. फ्लेचर यांनी त्याच्या तोंडात आपले तोंड घालून त्याचा सर्व कफ शोषून घेतला आणि त्यातून त्याचे प्राण वाचविले. आज असे करण्यासाठी धजावणारे कमी असतील. पण ते आहेत निश्चित, नाहीतरी पैशापेक्षा जगण्याची अन्य काही कृतार्थता असू शकते हे ज्या डॉक्टरांना कळते ते आपला क्षण अन् क्षण रुग्णांसाठी वेचण्याकरिता कटिबद्ध असतात. कोरोनाच्या काळ्याकुट्ट पर्वात आपण याचा जवळून अनुभव घेतलेला आहे. आजच्या घडीला अशा सेवाभावी डॉक्टरांची संख्या वाढणे फार-फार गरजेचे आहे. कारण उद्याचे जग निकोप आणि निरामय ठेवण्यासाठी आपणा सर्वांना डॉक्टरांचाच आधार असणार म्हणून आपण त्यांची प्रतिष्ठा आणि सुरक्षितता जपली पाहिजे आणि मग ते आपला सेवाभाव जपण्यास सहजच सिद्ध होतील.