
ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. अनिल अवचट यांचे नुकतेच निधन झाले. कॉण्टिनेण्टल प्रकाशनाद्वारे त्यांचं ‘आपलेसे’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. या निमित्ताने कॉण्टिनेण्टल प्रकाशनाच्या संचालिका देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर यांचा स्नेहबंध जोडला गेला. मात्र बाबांचं म्हणजेच डॉ. अनिल अवचट यांचं त्यांच्या कुटुबियांशी असलेलं वेगळं नातं होतं. या स्नेहाच्या नात्याविषयी, बाबांविषयी त्यांनी जागवलेल्या आठवणी!
परवा गुरुवारी अनिल अवचट गेल्याचा मेसेज आला आणि मन एकदम खिन्न झालं. त्या दिवशी अनेकांची माझ्यासारखीच अवस्था झाली असणार. असंख्य आठवणी दाटून आल्या. बाबा कॉण्टिनेण्टलचे लेखक होते असं म्हणता येणार नाही. कारण आम्ही त्यांचं ‘आपलेसे’ नावाचं एकच पुस्तक प्रकाशित केलं आहे. पण अवचटांचा आणि कुलकर्णी कुटुंबीयांचा स्नेह मात्र फार जुना. ते जुन्नर, ओतूरचे तर माझे आजोबा पैलासवासी अनंतराव कुलकर्णी नारायणगावचे. त्यामुळे शेजारी शेजारी असा स्नेहबंध आमचा जोडला आणि जडला. माझे वडील पै. अनिरुद्ध कुलकर्णी आणि अनिल अवचट हे दोघेही समाजवाद, डाव्या विचारसरणीकडे झुकणारे. त्यामुळे त्यांची चांगल्यापैकी मैत्री. श्रीमंतीचे प्रदर्शन, मोठा डामडौल, बडेजाव दाखवणारे कार्यक्रम त्यांच्या विरोधीच. माझ्या आत्याचं लग्न प्रचंड थाटामाटात झालं. चार-पाच दिवस चाललं लग्न. त्यावेळी रिसेप्शनला हरभऱ्याच्या जुड्या घेऊन आले आत्याला भेट म्हणून. अकल्पिता, (माझी आत्या) इतक्या बोअर फंक्शनमध्ये तू किती बोअर होत असशील हे समजतं आहे मला. हरभरे सोल आणि खा. तेवढाच तुझा टाइमपास होईल, असा सुज्ञ सल्ला त्यांनी दिला. स्वतःचे साधेपणाचे, समानतेचे विचार लोकांपर्यंत खुलेपणाने पोहोचवण्यात त्यांनी कधीच संकोच केला नाही. 1970 साली कॉण्टिनेण्टलची नवीन इमारत बांधली. त्यावेळी दारात मोठे कारंजे होते. त्यावर त्यांनी, ‘प्रकाशकांच्या दारात कारंजी उडू लागली आहेत’, असा थोडा मार्मिक टीकात्मक लेख लिहिला. आजोबांनी त्यांना बोलावून हे कारंजे का बांधले हे समजावून सांगितले. बिल्डिंगमध्ये पुस्तकांचा प्रचंड साठा असणार आहे. त्याला चुकून आग लागली, तर ती विझवण्यासाठी पाणी असलेलं बरं या विचारातून हे कारंजे बांधले आहेत, असं त्यांना अनंतरावांनी सांगितल्यावर त्यांनी ते सहज मान्य करून टाकलं.
अर्थात या गोष्टी घडल्या तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. पुढे मी जेव्हा प्रकाशन व्यवसायात आले तेव्हा मला काही काही लेखकांची पुस्तके आपल्या ग्रंथ सूचित का नाही याचं फार वाईट वाटायचं. त्यापैकी अनिल अवचट आणि गौरी देशपांडे. पुढे एका कार्यक्रमात मी अवचटांना हे सांगितलं तेव्हा त्यांनी मला लवकरच ‘आपलेसे’ या पुस्तकाचं हस्तलिखित दिलं. पुस्तकाच्या कामाच्या वेळी अनिल अवचटांचा ‘बाबा’ कधी झाला कळलंच नाही. तो अनेकांचा ‘बाबा’ आहे. मला बिलकुल अहो म्हणायचं नाही, अशी तंबीही त्याने मला दिली. माझी आणि बाबाची छान मैत्री जुळत गेली. तो अनेकदा कॉण्टिनेण्टलमध्ये यायचा. पुस्तकाच्या कामाचं बोलून झालं की, त्याचं सुरेल बासरी वादन असायचं. संध्याकाळी अनेकदा कॉण्टिनेण्टलच्या इमारतीत किंवा त्याच्या घरी आम्ही गाणी म्हणायचो. फरीदा खानूमची ‘आज जाने की जिद ना करो’ ही गझल आणि आशाताईंचं ‘सांज ये गोकुळी, सावळी सावळी’ हे गाणं ही आमची आवडती गाणी. कधी एकत्र म्हणायचो, तर कधी तू मला म्हणून दाखव असा प्रेमळ आग्रह तो करायचा. खूप साधीशी सुरेल मैफल असायची ती. कधीकधी तो स्वतःच्या मध्येच हरवलेला वाटायचा. एकदा अगदी उत्साहाने त्याने माझं फोटो सेशन केलं आणि भले मोठे प्रिंटाऊट पाठवून दिले. माणसांचे फोटो काढताना त्यांची डोकी पूर्णपणे काढायची नाही, हे त्याचं वैशिष्ट्य. आपल्या मनोगतात बाबाने लिहिलं आहे की, ‘मी माझ्या मुलीला नेहमी सांगतो की, माझे धन बँक अकाउंटमध्ये नाही. मी जोडलेली माणसं हे माझं धन आहे. पैसे संपतील, पण प्रेम करणारी माणसं अखेरपर्यंत राहतील’ या वाक्याप्रमाणे बाबा जगला.
माझा नवरा देवेश खूप मोठ्या आजारपणातून चालला होता. एकदा बाबा घरी हजर. ‘मी आज तुला नाही, तर देवेशला भेटायला आलोय, असं सांगून बासरी वादन, गप्पा, हास्यविनोद गाणी असं सगळं सगळं झालं. अक्षरशः काही तासांच्या त्याच्या अस्तित्वाने तो आमचं दुःख, टेन्शन दूर करून गेला. अक्षरशः भर उन्हाळ्यात थंड हवेची झुळूक यावी, असं.
त्याच्या पुस्तकातही त्याने त्याच्या जवळच्या माणसांविषयी लेख लिहिले होते. गौरी, सुनीताबाई, सरोजनीबाई, भीमसेनजी, निळू फुले त्याबरोबरच अगदी मुक्तांगणमधील सगेसोयरे, साधी सर्वसामान्य माणसं. पुस्तकाच्या मनोगतात तो लिहितो, ‘ही माणसे आदर्श होती का? निर्दोष होती का? तसंही नाही. इतरांसारखे काही स्वभावदोष त्यांच्यातही असतील. पण एकमेकांजवळ असल्याने चांगुलपणाच व्यक्त होत गेला. दोष दोषांच्या जागी निष्प्रभ होऊन गेले. प्रत्येक माणसात एक चांगला माणूस दडलेला असतोच, या अनुभवाला बळकटी आली. कधी माणसे वाईट वागली, काही वाईट अनुभव आले तर मी हे त्याचं एक वाक्य नेहमी आठवते. साधेपणा, उदात्तता, दुसऱ्यांसाठी जगणं किती शिकवून गेला तो छोट्या छोट्या गोष्टींतून.
पुस्तकाचा प्रकाशन समारंभ तरी किती गोड आणि साधा. आम्ही चार-पाच जणं. त्याच्या बाल्कनीत झाला आमचा पुस्तक प्रकाशन समारंभ.
इथून पुढे बाबाचा, ‘देवू, किती दिवस झाले भेट नाही. एकदा गप्पा मारायला ये’’ असा फोन येणार नाही. ‘कुपितलं गुपित’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला तो आला होता. अगदी थकलेला. गोंधळलेला. तुझ्याकडे किती हस्तलिखित आहेत माझी, कधी प्रकाशित करणार आहेस असं विचारत होता, वास्तविक एकही हस्तलिखित नाहीये माझ्याकडे त्याचं. पण आमची दोघांचीही इच्छा होती अजून एकत्र काम करण्याची लेखक-प्रकाशक म्हणून. एकच पुस्तक केलं मी पण मैत्र घट्ट झालं. आयुष्य संपन्न करून गेला. अगदी आपलंसं करून गेला बाबा!
(लेखिका पुणे येथील कॉण्टिनेण्टल प्रकाशनच्या संचालिका आहेत.)





























































