ठसा – डॉ. जनार्दन वाघमारे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभय मिरजकर

ज्येष्ठ विचारवंत जनार्दन वाघमारे यांच्या निधनाने शैक्षणिक, राजकीय व सामाजिक क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. डॉ. वाघमारे काय होते, हे सांगण्यापेक्षा ते काय नव्हते, असा प्रश्न विचारावा लागेल. साहित्यिक, माजी खासदार आणि पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा शिक्षणातील ‘लातूर पॅटर्न’चे जनक, माजी कुलगुरू अशी एक ना अनेक विशेषणे या व्यक्तित्वाला लावावी लागतात. डॉ. जनार्दन वाघमारे यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1934 रोजी झाला. केवळ विद्वत्तेच्या जोरावर त्यांनी जीवनात यश, कीर्ती मिळवली. हैदराबाद येथील निजाम कॉलेजमधून त्यांनी बी.ए.ची पदवी घेतली, तर पुणे विद्यापीठातून एम.ए.ची पदवी मिळवली. मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर एलएलएम आणि पीएच.डी. पदवी त्यांनी संपादन केली. 2004 मध्ये त्यांना पंजाब विद्यापीठाने डी.लिट मानद पदवी प्रदान केली. लातुरातील नामवंत राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले, तर लातूर पॅटर्नचे जनक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. त्याचप्रमाणे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून त्यांनी 17 सप्टेंबर 1994 ते 16 सप्टेंबर 1999 पर्यंत काम पाहिले. 17 डिसेंबर 2001 ते 16 डिसेंबर 2006 या कालावधीत ते जनतेमधून थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. शरद पवार यांनी त्यांना राज्यसभेवर संधी दिली आणि 2008 ते 2014 पर्यंत त्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून काम केले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळावर 1999 ते 2004 या कालावधीत यांनी काम केले. जिल्हा नियोजन समिती बीड, जिल्हा नियोजन समिती परभणी, जिल्हा नियोजन समिती धाराशिव, जिल्हा नियोजन समिती लातूर, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, समाज प्रबोधन संस्था पुणे, पुणे विद्यापीठ प्राध्यापक निवड समिती पुणे, संपादक मंडळ महाराष्ट्र शासन गॅझेटियर्स डिव्हीजन मुंबई, डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती मुंबई, क्वालिटी अॅश्युरन्स सेल, महाराष्ट्र शासन, महात्मा फुले स्मृती शताब्दी समिती, इंडिया चायना फेंडशिप सोसायटी मराठवाडा विभाग, यशवंतराव चव्हाण लोकविकास प्रतिष्ठान लातूर, विद्या परिषद सोलापूर, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र लातूरचे अध्यक्ष, समाज प्रबोधन संस्था पुणे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे, सल्लागार उच्च शिक्षण परिषद मुंबई, विद्यार्थी सहायक मंडळ अशा विविध ठिकाणी त्यांनी काम केले. त्यांचे मूठभर माती आत्मचरित्र, चिंतन एका नगराध्यक्षाचे, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अमेरिकन निग्रो साहित्य आणि संस्कृती, महाराष्ट्रातील राजकारण व समाजकारण, हाक आणि आक्रोश, शिक्षण समाज परिवर्तन व राष्ट्रीय विकास, प्राथमिक शिक्षण स्वप्न आणि वास्तव, स्वातंत्र्य एक चिंतन, गुलामी एक दृष्टीक्षेप, यमुनेचे पाणी, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, बखर एका खेडय़ाची, स्वामी रामानंद तीर्थ यांचा शिक्षक धर्म, विचारमुद्रा, महर्षी दयानंद सरस्वती विचार कार्य और कृतित्व-अनुवादित, लोकशाही आणि शिक्षण, सहजीवन, दलित साहित्याची वैचारिक पार्श्वभूमी, बदलते शिक्षण स्वरूप आणि समस्या, ज्ञान विज्ञानाच्या देशात, अमेरिकन ब्लॅक लिटरेचर आदी 75 पेक्षा जास्त ग्रंथांची निर्मितीही त्यांनी केली, शिवाय विविध संशोधन पत्रिका, नियतकालिकांमधून मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत लिखाण केलेले आहे. विविध असे दोन डझनपेक्षा अधिक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे पाचवे अस्मितादर्श दलित साहित्य संमेलन कोल्हापूर, दुसरे विदर्भ जनसाहित्य संमेलन काटोल, राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक न्याय परिषद सोलापूर, दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन बार्शी, परिवर्तन साहित्य संमेलन मुंबई, मराठवाडास्तरीय साहित्य संमलेन हदगाव, राज्यस्तरीय दलित साहित्य संमेलन बार्शी, साहित्यिक कलावंत संमेलन पुणे, महाराष्ट्र राज्य तत्वज्ञान परिषद 22 वे अधिवेशन लातूर, 14 वे नवोदित मराठी साहित्य संमेलन उदगीर, अध्यक्ष 11 वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन नागपूर, 38 वे मराठवाडा साहित्य संमेलन सोयगाव, मराठवाडा विकास परिषद लातूर अध्यक्ष अशा 14 विविध साहित्य संमेलनांची, परिषदांची अध्यक्षपदेही त्यांनी भूषवली आहेत. नगराध्यक्ष असताना संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानाचे प्रथम पारितोषिक त्यांच्या कार्यकाळात लातूर जिल्हय़ाला मिळाले होते. नगर परिषदेच्या माध्यमातून फिरता दवाखाना, पाणीपुरवठा योजना, जलपुनर्भरण योजना, एक खिडकी योजना, स्मशानभूमी व दफनभूमींचा विकास, कचऱयातून खत निर्मिती, मागासवर्गीयांचा अनुशेष भरून पदोन्नती, 408 सफाई कामगारांना सेवेत कायम करीत नगर परिषद प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे शहर स्वच्छतेची मोहीम राबवणे, नाना नानी पार्कची निर्मिती, साई पर्यटन केंद्राचा विकास, लातूर व्हिजन- 2005 पथदर्शी विकास आराखडा, अक्षय नागरी विकास योजना शहरात आणली, तर राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान योजनेखाली 108 कोटी 47 लाखांचे अनुदान केंद्राकडून मिळवले. निवडणुकीत अतिशय खालच्या पातळीवरची टीका त्यांच्यावर करण्यात आली; परंतु लातूरकरांनी नगराध्यक्ष म्हणून थेट त्यांचीच निवड केली आणि चांगल्या व्यक्तीच्या पाठीशी लातूरकर खंबीरपणे उभे राहतील हे दाखवून दिले. असा विचारवंत, कर्ता समाजसेवक व सर्वव्यापी माणूस होणे नाही.