ठसा – डॉ. प्रमोद चिटगोपेकर

780

>> गणेश उदावंत

विघ्नहर्त्या श्रीगणेश मूर्तींचा अमोल संग्रह करणारे संभाजीनगरातील सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद चिटगोपेकर अलीकडेच काळाच्या पडद्याआड गेले. त्यांनी मोठय़ा कष्टाने आणि श्रद्धेने गणेशमूर्तींचा संग्रह साधत श्रीवरद गणेश मंदिर व श्रीराम मंदिराच्या जडण-घडणीसाठीही योगदान दिले. वैद्यकीय सेवेतील व्याप सांभाळून त्यांनी वैयक्तिक कलागुणांची जोपासना केली खरी, पण त्यांची खरी ओळख राहिली ती श्रीगणरायाच्या वैविध्यपूर्ण अमोल संग्रहाची. त्यांच्या संग्रहामध्ये तब्बल 450 गणेशमूर्तींचा समावेश आहे. महागडे सोने, चांदी, हिरे, स्फटिक, तांबे-पितळ, टेराकोटा, फायबर, काच, गन मेटल, पंचधातू, संगमरवर, काळा पाषाण, चंदनी लाकूड, शंख-शिंपले, ग्रॅनाईट, गोल्डन डस्ट, सिरॅमिक, बोनचायना, हस्तिदंत अशा अनेक प्रकारच्या माध्यमांतून घडवलेल्या दुर्मिळ अन् महागडय़ा मूर्तींचा संग्रह प्रभावित करणारा आहे.

मैंदर्गी (ता. अक्कलकोट) येथील मूळचे रहिवासी असलेल्या डॉ. चिटगोपेकर यांचे वडील निजाम सरकारच्या बांधकाम विभागात पर्यवेक्षक पदावर कार्यरत होते. 1957 मध्ये बदली झाल्याने ते संभाजीनगरात आले आणि कायमचे येथेच स्थायिक झाले. डॉ. चिटगोपेकर यांचे शिक्षण शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात झाले. पुढे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेतले. याच परीक्षेत ते 1963 मध्ये उत्तीर्ण होऊन आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्त झाले. यादरम्यान, त्यांची शासनातर्फे पदव्युत्तर शिक्षणासाठी निवड झाली. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय (पुणे) येथे नेमणूक झाल्यानंतर, पुणे विद्यापीठातून प्रथम क्रमांकाने एम.एस. परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्याबद्दल त्यांना सुवर्ण पदक मिळाले. 1981 मध्ये ते सावंतवाडी (जि. सिंधुदुर्ग) येथे सिव्हिल सर्जन पदावर नियुक्त झाले. तेथीलच वास्तव्यात त्यांना श्रीगणेश मूर्तींचा संग्रह करण्याचा छंद जडला. आरोग्य सेवा निष्ठsने करीत असतानाच ते छंदात रममाण झाले. डॉक्टरसोबतच मूर्ती संग्राहक अशी नवी ओळख त्यांची झाली ती कायमची. महाविद्यालयीन जीवनात त्यांनी बॅडमिंटन, क्रिकेट आणि नाटकांत हिरीरीने भाग घेतला. 1960 मध्ये विद्यापीठस्तरीय अ.भा. युवक महोत्सवासाठी त्यांनी नाटकात भूमिका वठवली होती.

‘आवड असेल तर सवड मिळते’ या म्हणीप्रमाणे डॉ. चिटगोपेकर यांनी देशपातळीवरील कश्मीरपासून कन्याकुमारी, गुजरातपासून कोलकात्यापर्यंतच्या विविध शहरांमधून श्रीगणेश मूर्ती संग्रहित केल्या. शिवाय पर्यटन व अभ्यास दौऱयानिमित्त परदेशात जात असताना त्यांनी गणेशमूर्ती जमवल्या. नेपाळ, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया व युरोपियन देशांतूनही त्यांच्या संग्रहात गणेशमूर्तींचा समावेश झालेला आहे. त्यांच्या घरातील प्रत्येक कप्पा, कपाट, शोकेस गणेशमूर्तींनी व्यापलेले आहे. घराच्या चारही कोपऱयांत गणेशमूर्तीच समाविष्ट आहेत. लहानातील लहान पाच ग्रॅम, तर सर्वात मोठी साडेबारा किलो वजनाचीही मूर्ती संग्रहात आहे. याप्रमाणे 450 श्रीमूर्तींचा संग्रह पूर्णत्वास आलेला आहे.
संग्रहाचे वैशिष्टय़ ध्यानी घेऊन मूर्तींची सीडी तसेच दृकश्राव्य माध्यमातून माहितीपर कार्यक्रम राबविला. संग्रहावर आधारित ‘देवा तूंचि गणेशु!’ हे पुस्तक संपादित केले. संभाजीनगरातीलच श्रीसमर्थ राममंदिराचे आश्रयदाते असलेल्या डॉ. चिटगोपेकर यांनी श्रीवरद गणेश मंदिराच्या विश्वस्त समितीवर कार्य केले. ज्येष्ठ नागरिक संस्था, रोटरी क्लब या स्वयंसेवी संस्थांचेही त्यांनी यशस्वीपणे कामकाज हाताळले.

गणेशमूर्तींचा अमोल संग्रह केल्याबद्दल अमरेंद्र गाडगीळ यांच्या ‘श्रीगणेश कोश’ या प्रसिद्ध ग्रंथामध्ये डॉ. चिटगोपेकर यांचा गौरवपूर्ण समावेश झालेला आहे. वैयक्तिक पातळीवर वैशिष्टय़पूर्ण गणेशमूर्ती संग्रह करणारे डॉ. चिटगोपेकर हे विभागात अद्वितीय होत. मात्र तीन दिवसांवर येणाऱया श्रीगणेश जयंतीपूर्वीच डॉ. चिटगोपेकर यांना वयाच्या 78 व्या वर्षी गणेशैक्य प्राप्त झाले, ते धक्कादायक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या